अमरावती : सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रचा तिसर्या तिमाहीतील नफा दुप्पटीने वाढून 325 कोटी रुपये झाला आहे. या तिमाहीत बँकेला अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यात यश मिळाले आहे. बरीच थकलेली कर्जे वसूल झाल्यामुळे बँकेचा ताळेबंद सुधारला असल्याचे दिसून येते.
गेल्या वर्षी दुसर्या तिमाहीत बँक ऑफ महाराष्ट्रला केवळ 154 कोटी रुपयाच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते.डिसेंबर अखेर संपलेल्या तिसर्या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढवून 3,893 कोटी रुपये इतके झाले आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न 3,582 कोटी रुपये होते.असे बँकेने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
बँकेला व्याजातूून मिळालेल्या उत्पन्नात 17 टक्क्यांची वाढ होऊन हे उत्पन्न 1,527 कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत व्याजातून बँकेला केवळ 1,306 कोटी मिळाले होते. खराब कर्जाची वसुली वाढल्यामुळे बेँकेची ढोबख अनुत्पादक मालमत्ता तिसर्या तिमाहीत कमी होऊन 4.73 टक्के म्हणजे 6,104 कोटी रुपये इतकी झाली आहे.
गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत बँकेची अनुत्पादकता मालमत्ता 7.69 टक्के म्हणजे 8,072 कोटी रुपये इतकी होती. निव्वळ अनुत्पादक मालमत्ता 1.24 टक्के म्हणजे 1,545 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी तिसर्या तिमाहीत निव्वळ अनुतपादक मालमत्ता 2.59 टक्के म्हणजे 2,579 कोटी रुपये इतकी होती.मात्र या तिमाहीत बँकेला करासाठी 762 कोटी रुपयाची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी ही रक्कम 502 कोटी रुपये होती. बँकेचे कामकाज वेगाने पूर्वपदावर येत असून आगामी काळातील ताळेबंद आणखी चमकदार होण्याची शक्यता बँकेला वाटत आहे.