मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत तालुक्यातील धनज माणिकवाडा या लहानशा खेड्यात राहणारा डॉ.मिर्झा रफी अहमद बेग आज महाराष्ट्र मधील लोकप्रिय कवींच्या पदवीला आणि झी टीव्हीच्या हास्य सम्राट पदवीला पात्र झाला आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड मानधन घेणारे जे कवी आहेत त्या कवीमध्ये आज मिर्झा रफी अहमद बेग याची गणना होते. हा कवी फक्त कवितेवर जगत होता. जगत आहे आणि जगत राहणार आहे. अगदी आड वळणाच्या माणिकवाडा नावाच्या गावात राहणारा व आता अमरावतीला स्थायिक झालेला हा कवी सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय झाला असून कोट्यावधी रसिकांच्या हृदयात त्याने स्थान मिळविले आहे.
हा कवी कुणी प्राध्यापक नाही. अध्यापक नाही .व्यावसायिक नाही. पण आज कवितेच्या बळावर अमरावतीच्या वलगाव रोडवर त्याचा दोन मजली बंगला आहे .याशिवाय खालच्या मजल्यावर मुलाचे स्टील सेंटर आणि हार्डवेअरचे प्रशस्त मोठे दुकान आहे. नुकताच मिर्झा रफी अहमद बेग हजची यात्रा करून परतला आहे. हजचा खर्च हा प्रचंड लाखात असतो. तो त्याची पत्नी आणि आपल्या मुलांसह नुकताच हजला जाऊन आलेला आहे.
मिर्झा रफी अहमद बेग यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व आहे. मराठी आणि व-हाडी भाषेचा सुरेख संगम त्यांच्या कवितेमध्ये झालेला आहे. विशेष म्हणजे त्याचे सादरीकरण हे अनन्यसाधारण आहे. मिर्झा बोलायला लागला की ऐकतच राहावेसे वाटते. तो कवितेबरोबर किस्से पण सांगतो .पण त्याची ही सांगण्याची शैली इतकी जबरदस्त आहे की लोक तो मागील तेवढे प्रचंड मानधन द्यायला एका पायावर तयार होतात.
मिर्झाची माझी भेट झाली तेव्हा तो धनज माणिकवाड्याला होता. त्याच्याजवळ फोनही नव्हता. माझ्या फोनवर त्याचे सर्व फोन यायचे .त्याचे सगळे बुकिंग मी करायचा. त्याचा पहिला कवितासंग्रह देखील सध्याचे खासदार व तेव्हाचे व आताचे मिर्झाचे चाहते माजी कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या पुढाकाराने मिर्झा एक्सप्रेस या नावाने मीच प्रकाशित केला.
मिर्झाच्या नावावर आज दोन डझन पुस्तके आहेत. एवढे पुस्तके एखाद्या प्राध्यापकाच्या नावावर नाहीत. तो कविता लिहीत नाही. कविता जगतो. ज्या घटना त्याच्या सभोवताली घडतात त्या घटनांना तो काव्यमय आकार देतो आणि तो स्टेजवरून त्या अतिशय समर्थपणे सादर करतो.
एक काळ असा होता की मिर्झा .विठ्ठल वाघ .शंकर बडे. नारायण कुलकर्णी कवठेकर ही मंडळी एकत्र कार्यक्रम करायची. त्याला नाव होते वऱ्हाडी कवी संमेलन. नारायण कुलकर्णी कवठेकर यांचे संचलन असायचे. अमरावतीचे आझाद हिंद मंडळ श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय नगर वाचनालय बडनेरा येथील आरडीआयके कॉलेज असे कितीतरी कार्यक्रम या संयुक्त वराडी कवींनी केले.
पुढे मिर्झाने मिर्झा एक्सप्रेस हा स्वतंत्र एकपात्री कार्यक्रम सुरू केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. तीन-चार जणा मिळून कार्यक्रम केला तर मानधन कमी मिळायचे. परत सर्वांच्या तारखा जुळून यायला वेळ लागायचा. पण मिर्झाने स्वतंत्र कार्यक्रम सुरू केल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. त्यातच त्यात नागपूरच्या दैनिक लोकमतने मिर्झाजी कहीन हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम मिर्झाच्या मार्गदर्शनाखाली सुरू केला. त्याला त्या काळात प्रचंड प्रतिसाद मिळाला. हजारोच्या संख्येने मिर्झाला पत्र यायची. आणि तो त्याच्या वराडी पद्धतीने विनोदी पद्धतीने निश्चितपणे दैनिक लोकमत मधून त्या प्रश्नांची उत्तरे द्यायचा. मिर्झाजी कहीन हे सदर खूपच गाजले.
मिर्झा खरा लोकांच्या समोर आला तो झी टीव्हीच्या हास्य सम्राट या कार्यक्रमामुळे. त्याच्या कवितेचा आशय त्याच्या कवितेची मांडणी त्याची शैली आणि त्याचे साधेपण झी टीव्हीच्या माध्यमातून हास्य सम्राट रूपाने जेव्हा महाराष्ट्रातील लोकांनी पाहिले तेव्हा लोकांनी अक्षरश: मिर्झाला डोक्यावर घेतले. पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र यांनी तर मिर्झाला प्रचंड मोठी साथ दिली .प्रचंड मानधन दिले. मिर्झाची तारीख मिळत नव्हती अशी परिस्थिती झाली. एक काळ असा होता की मिर्झा धनज माणिकवाडा या गावावरून बसने नेरपरसोपंतला यायचा . तेथून बस बदलून अमरावतीला यायचा. राजापेठला उतरायचा. आणि माझ्या भारतीय महाविद्यालयामध्ये यायचा. मग आमची भ्रमंती सुरू व्हायची.
पण हास्य सम्राट ह्या कार्यक्रमाने त्याला संपूर्ण महाराष्ट्रत चांगलीच प्रसिद्धी दिली. त्याच्या कार्यक्रमाला कोट्यावधी लोकांचा सोशल मीडियावर प्रतिसाद मिळाला . कार्यक्रमाला जाण्यासाठी वेग यावा म्हणून त्याने चार चाकी गाडी घेतली आणि ही गाडी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात वराडी भाषेला घेऊन गेली .
स्वतः मुस्लिम असून त्याने मराठीवर केलेले प्रेम आणि त्याने अवगत केलेली मराठी भाषा हे खरोखरच नोंद करण्यासारखे आहे. तो मराठी जेव्हा बोलतो तेव्हा त्या मराठीमध्ये तसेच तो बोलणाऱ्या मराठीमध्ये गोडवा आहे आणि म्हणूनच हा गोडवा आपल्या अंतर्मनाचा ठाव घेतो. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात मिर्झाचे कार्यक्रम झालेले आहेत. त्याचे चाहते संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरले आहेत. एक काळ असा होता की वऱ्हाडी कवी संमेलन म्हटले की विठ्ठल वाघ शंकर बडे मिर्झा रफी यामध्ये हे त्रिकूट ठरलेले असायचे. शंकर बडे हे अल्पायुशी ठरले. विठ्ठल वाघ प्राचार्य पदाच्या तावडीत सापडले .उरला सुरला मिर्झा. त्याने मात्र कवितेला आपले घरच मानले आणि आपले काव्य प्रेम वृद्धिंगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
मिर्झा नुसतं कविता लिहूनच थांबला नाही. तर तो चळवळीत देखील काम करीत होता. आम्ही स्थापन केलेल्या बहुजन साहित्य परिषदेच्या कार्यकारणीमध्ये तो होता. पहिले बहुजन साहित्य संमेलन त्याने यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत येथे घडवून आणले. पुढे आम्ही त्याला यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे झालेल्या बहुजन साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल केले. सुरुवातीच्या काळात मिर्झाच्या कार्यक्रमाला तिकीट लागायचे. तिकीट लावून कार्यक्रम करणारे जे काही निवडक लोक महाराष्ट्रामध्ये आहेत त्यामध्ये मिर्झाचा क्रमांक अव्वल आहे.
एक कवी कुठल्याही प्रकारची नोकरी न करता कुठल्या प्रकारचा व्यवसाय न करता फक्त आणि फक्त कवितेवर जगात आलेला आहे .तो नुसतच साधे जगला नाही तर आपले मिर्झा एक्सप्रेसचे व्यावसायिक कार्यक्रम करून त्याने स्वतःचा दोन मजली मिर्झा एक्सप्रेस हा बंगला तर उभारलाच पण आपल्या मुलांनाही पोटापाण्याला लावण्यासाठी त्याने त्यांना चांगले अमरावती वलगाव मेन रोडवरील दुकान थाटून दिले. आपले जाण्या येण्याची सोय व्हावी म्हणून चार चाकी गाडी पण घेतली. खरं म्हणजे एका कवीच्या आणि त्याही विदर्भातल्या कवीच्या वाट्याला एवढे चांगले दिवस येणे ही खरोखरच आगळीवेगळी बाब आहे.
मिर्झाच्या सुरुवातीच्या काळात मी मिर्झा बरोबरच होतो. आमचे घर म्हणजे त्याचे अमरावतीचे कार्यालय झाले होते .त्याचे सगळे कार्यक्रम मीच बुक करायचा . आता पण मिर्झा पूर्वी जसा होता तसाच आजही कायम आहे. आज तो प्रसिद्धीच्या एव्हरेस्ट शिखरावर आहे .पण त्याचे पाय मात्र जमिनीवरच आहेत .कुठेही अहंकार नाही . कुठलाही बडे जाव नाही . तोच पांढरा पैजामा व तेच नेहरू शर्ट त्याच्या अंगावर आहे .पैजामा आणि शर्टाची जागा फुलपॅन्टने कधीच घेतली नाही आणि मिर्झाचा स्वभाव पाहता तो घेणारही नाही. मिर्झाने आता वयाची सत्तरी गाठी आहे. तो ज्या गावात गेला त्या गावात त्याने आपले मित्र मंडळ तयार केलेले आहे. आपल्या या वाटचालीमध्ये तो प्राचार्य डॉ विठ्ठल वाघ प्रा.मधुकर वाकोडे बबन नाखले डॉ.अनिल बोंडे व माझ्या नावाचा उल्लेख करतो. आम्ही सर्वांनी मिर्झाला त्याच्या पडत्या काळात मनापासून साथ दिली आहे .आज मिर्झा समर्थपणे मराठी कवितेच्या प्रांतात स्वतःच्या पायावर कोणाच्याही कुबड्यांचा आधार न घेता अतिशय बिनधास्तपणे उभा आहे आणि असाच उभा राहणार आहे. मिर्झाच्या या साहित्यिक वाटचालीला आमचा मनापासून सलाम .मिर्झा पुढे पुढेच जायचे आहे .आम्ही तुझ्याबरोबर होतो .आहोत. आणि राहणारही आहोत.
प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक.
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प 9890967003