- * एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती म्हणजे सुखी संसाराचे रहस्य
पती-पत्नीमध्ये प्रेम आणि आदर असेल तरंच कुटुंबात आनंद नांदतो. कोणत्याही नात्यामध्ये प्रेम आणि आदर अत्यंत महत्त्वाचा असतो. पण कुटुंब सुखी, सुसंस्कृत आणि समृद्ध करण्यात महिलांचा मोठा वाटा असतो. घरातील स्त्रीमध्ये काही विशेष गोष्टी असतील तर घर स्वर्गासारखे बनते, म्हणून पत्नीला लक्ष्मीचे रूप म्हटले जाते. चाणक्य नीतीमध्ये स्त्रीची अशी काही वैशिष्ट्ये सांगण्यात आली आहेत, ज्यामुळे पतीचं आयुष्य फुलून जातं. पण यामध्ये पतीची देखील साथ अत्यंत गरजेची असते. स्त्री सुशिक्षित, सुसंस्कृत असेल तर संपूर्ण कुटुंब चांगल्या वातावरणात तयार होतं. अशा कुटुंबातील नवीन पिढी सुसंस्कृत आणि चांगली होते. सुसंस्कृत स्त्रीच आपल्या मुलांना चांगले संस्कार देऊ शकते. स्त्री जर धार्मिक असेल, तर अत्यंत उत्तम.
प्रत्येक व्यक्तीने रागावणे आणि भांडणे टाळले पाहिजे. पण विशेषतः पत्नी शांत स्वभावाची असेल तर घरात नेहमी सुख-शांती नांदते. शांत आणि आनंदी स्वभावाची स्त्री घराला सकारात्मकतेने भरते. ती सर्वांना प्रेम आणि आदर देते. अशा स्त्रीशी लग्न करणारी व्यक्ती खूप भाग्यवान असते. आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येत जात राहतात, पण जर पतीच्या वाईट दिवसांत ठामपणे उभी राहणारी स्त्री जोडीदाराचं नशीब फुलवून टाकते. पतीला कोणत्याही संकटातून बाहेर काढण्यास मदत करते.
विवाहानंतर दोन वेगवेगळ्या वातावरणातल्या वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या व्यक्ती एकत्र येतात. एकत्र येतात म्हणजे काय? तर जन्मभरासाठी एकमेकांच्या सुखदु:खाचे भागीदार होतात. विवाह होईपर्यंत आपल्या कमावत्या मुलावर आई-वडिलांचे जे बंधन नसते, मुलगा म्हणून ज्या अनेक सवलती मुलाला मिळालेल्या असतात, त्या सर्वावर आता मात्र नववधूची बंदी आलेली असते. उठण्या-बसण्याच्या वेळेपासून तर जेवणा-फिरण्याच्या बाबतीतही पत्नीची रोकटोक हळूहळू सुरू होते. सुरुवातीला पतीला सुध्दा बरे वाटते. आपल्याला कुणीतरी हक्काने, प्रेमाने सांगते, आपल्याला विनंतीवजा आज्ञा करते यातही पतीला सुख मिळत असते.
परंतु याच्या उलट पत्नीचे होते, पतीच्या आवडी-निवडी संदर्भात… पतीच्या आवडत्या रंगाची साडी, कुणाकडे जायचं? कुठे जाणे टाळायचे? वगैरे बाबतीत पतीची मर्जी… कुठे काय बोलायचे? यावर पतीचा लगाम… ‘फर्स्ट इंप्रेशन इज द लॉस्ट इंप्रेशन’ ही म्हण मनात घोटूनच पत्नीने पहिले पाऊल पतीगृही टाकलेले असते. कारण तिला हे चांगलेच माहीत असते की, आता काही दिवस आपण यांचे ऐकून घ्यायला हवे. एकदा का आपण यांना आपलंस केले की, मग जन्मभर हे आपले ऐकणार. नव्हे, आपण यांना ऐकायला लावणारच… म्हणून ती सुध्दा सुरुवातीला ‘यांच्या’ तालावर नाचायला खुशीने तयार असते. पण किती दिवस? महिना-दोन महिने-लवकरच प्रेमाचा ज्वर उतरतो. तिला व त्याला दोघांनाही मग आठवण होते की, आपल्यालाही एक मन आहे, त्याच्या काही अपेक्षा आहेत. यामुळे दोघांमधील ‘स्व’ जागृत झाला की, इथूनच वादावादीला सुरुवात होते.
अनेकदा पती-पत्नीतील वादाचं कारण इतकं क्षुल्लक असतं की त्यावर त्यांनी शांतपणे विचार केल्यास त्याचं त्यांना हसू येईल आणि आपण विनाकारण एवढ्या क्षुल्लक गोष्टींसाठी भांडत बसलो हे कळेल. शिवाय ही चूक परत होणारही नाही. पण पती-पत्नी स्वत:च्या चुकांकडे त्रयस्थ भूमिकेतून बघतच नाही आणि वारंवार त्याच त्या चुका त्यांच्याकडून घडत राहतात. परिणामी, संसारात उगाचच कटुता निर्माण होते.
खरे तर विवाह हे जसे एक बंधन आहे, तसेच तो आपसातला एक सलोखा आहे, नव्हे असावा. कधी पतीला तर कधी पत्नीला एकमेकांनी एकमेकांची बाजू समजून घ्यावी लागते. ज्या दाम्पत्याजवळ समजून घेण्याची शक्ती जास्त असेल त्यांच्यात कलह फार कमी प्रमाणात होतात. पण मुळीच भांडण झालेले नाही किंवा होतच नाही, असे एकही दाम्पत्य या पृथ्वीतलावर सापडणार नाही हे विधान ठामपणे करता येते. कारण दोन भिन्न व्यक्ती एकत्र आल्यात की, प्रत्येक गोष्टीत फरक असणारच. विवाह सलोखा असतो. कधी याला तर कधी तिला आणि अनेकदा दोघांनाही थोडंफार बदलावेच लागते.
मात्र प्रत्येकदा पत्नीनेच झुकते माप घ्यावे असं बहुतांशी सगळ्यांचेच मत असते. पण हा नियम नाही. वेळ व परिस्थिती बघून जो कोणी सलोखा करील त्याचा संसार सुखाचाच होतो. प्रत्येक स्त्री-पुरूषाच्या मनात आपल्या भावी जीवनाबद्दल स्वप्न असतात. पण स्वप्न नेहमीच सत्यात उतरतील असंही नाही. आपला जीवनसाथी आपल्याला हवा तसा मिळाला नाही, हा राग त्याच्यावर काढणे कितपत योग्य आहे? शिवाय कॉलेज मुलींच्या बहुतांश जीवनसाथी बद्दलच्या कल्पना म्हणजे पिक्चरमधला हिरोच… ज्यात सगळेच गुण चांगले असतात. परंतु एकाच व्यक्तीत सगळे चांगले गुण निघणे हे फक्त पिक्चर व कथा-कादंब-यातच शक्य आहे. पिक्चर व प्रत्यक्ष जीवन यात खूप तफावत आहे, हे प्रत्येक तरुणींनी लक्षात घ्यायला हवे.
आपल्या नेहमी असे बघण्यात येते की, ज्या घरात आई-वडीलांमध्ये प्रेम आणि वैचारिक साम्य असेल त्या घरातील मुले मानसिकरीत्या निरोगी असतात. त्यांच्या वागण्या-बोलण्यात मोकळेपणा असतो, धारिष्ट्य असते आणि त्यांच्याजवळ आत्मविश्वासही भरपूर असतो. घरातले वातावरण मोकळे व उत्साहपूर्ण असते. कुठेही गेलेत तरी त्या वातावरणात ते नेहमीच लवकर मिसळतात आणि आपल्या मोकळ्या स्वभावामुळे लवकर लोकप्रिय होतात.
याच्या अगदी उलट दृष्य ज्या घरात पती पत्नीमध्ये नेहमी कलह असेल, भांडणे होत असतील, अशा घरातली मुले नेहमी उदास आणि शांत दिसतात. ही मुले एकदम कुणातच मिसळण्याची हिंमत करीत नाहीत. त्यांना आई-वडीलांची मोकळीक न मिळाल्यामुळे ते नेहमी कुढतात, असंतुष्ट असतात. पुढे जाऊन त्यांना प्रेम मिळाले तरी ते मात्र कुणावरच मोकळेपणाने प्रेम करू शकत नाही. दुसरा आपल्यावर खरंच प्रेम करतो यावर त्यांचा विश्वास बसत नाही. अशा व्यक्तीचा स्वभाव बदलणं कठीण असतं. जर का त्यांना जीवनसाथी कठोर स्वभावाचा किंवा ज्याला आपण बाळबोध भाषेत शिष्ट म्हणू असा मिळाला तर तो त्याला भावनात्मकदृष्ट्या समजून घेऊ शकत नाही. अशावेळी त्या दोघांच्या संसारात चांगलीच दरी निर्माण होते आणि त्यांचं जीवन नैराश्यपूर्ण बनते.
आपल्याकडील विवाहपध्दती ही एखाद्या जुगारासारखी आहे. मोठे लोक लग्न जुळवतात. वर-वधू एकमेकांना फार कमी वेळ बघतात. मुलीला तर एखादा कटाक्ष टाकूनच मुलाला बघावं लागतेे, मोठेच लोक सगळा पुढाकार घेतात. वर वधूला एकमेकांना पाहण्याची, बोलण्याची, एकमेकांची आवड-निवड समजून घेण्याची कोणतीच संधी त्यांना बहुतेक मिळत नाही. कितीही सुधारणा झाल्या म्हटलं तरी लग्न जुळल्यावर एकमेकांची ओळख करून घेण्याची, एकमेकांशी वैचारिक देवाणघेवाण करण्याची संधी फक्त १० टक्के लोकांनाच मिळते आणि उरलेल्या ९० टक्के लोकांना विवाहानंतर एकमेकांच्या स्वभावाची ओळख होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग जसे आहे तसेच स्वीकारणे भाग पडते. पण अशावेळी चिडचिड करून, जोडीदारासोबत भांडण करून काहीही उपयोग होत नसतो. जो अशा वातावरणात वाढलेला असेल तशा सवयी त्याला लागतात. म्हणून हळूहळू प्रेमानेच त्याला वळवता येते.
खूपदा पती खूपच अव्यवस्थित असतात तर पत्नी म्हणजे स्वच्छतेची भोक्ती. कोणतीच वस्तू त्याला नीट जागेवर ठेवाविशी वाटत नाही, तर याच बाबतीत पत्नीचा कटाक्ष… या गोष्टी दिसायला फार छोट्या असल्या तरी अनेकदा याच गोष्टींचा दोघांनाही मन:स्ताप होतो. यावर नुसती चिडचिड करून किंवा दुस-याजवळ तक्रारी करून चालायचे नाही, तर त्याची वस्तू नेहमी त्यालाच शोधायला लावायची. दोन-चारदा त्रास झाला म्हणजे व्यवस्थितपणाचे महत्त्व पती राजांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. टोकाची भूमिका घेण्यापेक्षा प्रेमाने पतीला लवकर जिंकता येईल यावर सगळ्यांनीच विश्वास ठेवायला हरकत नाही. घराच्या टापटिपीसोबत स्त्रियांनी स्वत:कडेही जातींनी लक्ष पुरवावं. शारीरिक स्वच्छतेने मानसिक समाधान मिळतं. अनेकदा घर साफ करता करता स्त्रिया स्वत:कडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतात. रात्री झोपायला बेडवर आल्यात की त्यांच्या साडीला मसाल्याचा वास व शरीराला घामाचा वास येतो, अशा पत्नीला जवळ घेण्याची कोणत्या पतीला इच्छा होणार?
एक गोष्ट मात्र दोघांनीही आयुष्यभर लक्षात ठेवायला हवी. एकमेकांमध्ये काय वाट्टेल ते महायुध्द घडो. पण एकमेकांचे दोष दुस-यांसमोर मुळीच काढू नये. यामुळे तिच्या आत्म्याला धक्का लागतो. पती किंवा पत्नी कधीच दुस-यासमोर स्वत:चा अपमान सहन करू शकत नाही. कुणी एकाने आधी दुस-यासमोर अपमान केला की, ते तिच्या मनात पक्केपणी रूतून बसतं आणि ती पण मग त्याचा अपमान करण्याची संधी बघत असते. अशाने उगाचच तेढ निर्माण होऊन संबंध बिघडतात. अर्थातच संसारात हा सूर मुळीच नको. एकरूप होऊन संसार करण्याच्या उमेदीत सुरुवातीचे दिवस सुरू होतात आणि हळूहळू असे कटू रंग त्यात भरले जातात आणि संसाराची घडी विस्कटल्या जाते. पण यात संयम, थोडा धीर, मनाचा मोठेपणा, झालं गेलं विसरून जाण्याची भावना, अशा छोट्या छोट्या गोष्टींच भान ठेवलं तर प्रत्येकाचा संसार नक्कीच सुखाचा होईल.
प्रेम करताना सुखी संसाराची अनेक स्वप्न रंगवणा-या प्रेमीयुगुलांची प्रेमविवाहानंतर अगदी सहा महिन्यातच मने दुभंगत आहेत. गेल्या पाच वर्षांत २ हजार ८६२ दाम्पत्यांनी प्रेमविवाहानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ८० टक्के प्रेमविवाहास कुटुंबीय तयार होत नाहीत. जात-धर्म, मुलाचे वय, आर्थिक स्थिती, उत्पन्नाचे साधन, आईवडिलांची प्रतिष्ठा अशा अनेक कारणांमुळे प्रेमविवाह नाकारला जातो.
त्यामुळे अनेक प्रेमीयुगुल कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन विवाह करतात. काही प्रेमीयुगुल तर थेट घरातून कपडे, पैसे, दागिने घेऊन पळून जाऊन बोहल्यावर उभे होतात. लग्न झाल्यानंतर मात्र अडचणींचा ससेमिरा सुरू होतो. त्यासाठी तडजोड करताना खटके उडायला लागतात. वाद-विवाद वाढून संसार मोडण्याची स्थिती निर्माण होते. प्रेमविवाह झाल्यानंतर अनेकदा प्रेमीयुगुलांचा अटी व शर्थीनुसार संसार सुरू होतो. लग्न झाल्यानंतर दोघांत सासरच्या मंडळींचा हस्तक्षेप नको असतो. सध्या बाळ नको, माहेरचे येणार तर सासरचे नको, नोकरी करणार किंवा नाही करणार, मित्रांसोबत पार्टी हवी की नको, अशा अनेक कारणातून वाद विकोपाला जातात.
लग्नापूर्वी तू असा वागायचा, आता तुझ्यात खूप बदल झाला… तू मला वेळ देत नाही, तुझे कुठे बाहेर कुणाशी संबंध तर नाहीत ना… अशा अनेक संशयांचे जाळे अधिक घट्ट होत जाते. काही प्रकरणात मुलेही प्रेयसी असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतात. चारित्र्यावर संशय हा सर्वात मोठा घटक घटस्फोटासाठी कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. प्रेमविवाह केल्याच्या अगदी काही महिन्यानंतर पती-पत्नींमध्ये वाद होतात. अशी अनेक जोडपी भरोसा सेलमध्ये समुपदेशनासाठी येतात. भरोसा सेल त्यांच्या अडचणी आणि समस्या समजून घेत त्यांचा संसार पुन्हा फुलविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतात.
- शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
- कमळवेल्ली,यवतमाळ
- भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९