वामनदादा कर्डक यांच्या नंतर तेवढ्याच ताकदीने आणि सशक्त प्रतिभेने आंबेडकरी गीतांमधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना घरा घरा पर्यंत पोहचविण्याचं काम प्रतापसिंग बोदडे यांनी आयुष्यभर केलं.राजनन्द गडपायले यांच्या पासूनची ही आंबेडकरी गीतांची परंपरा अलीकडच्या वाशीमच्या राहुल कांबळे पर्यंत सातत्याने खळाळते आहे. माझ्या दहा भाषणांचं काम एक गीतकार आपल्या एका गाण्यातून करतो,असं बाबासाहेब स्वतः सांगायचे ; किंबहुना त्यांना प्रोत्साहन द्यायचे, या लोकगीतकारांच्या कार्यक्रमांना हजेरी देखील लावायचे.
प्रतापसिंग बोदडे यांचा जन्म पूर्वीच्या एदलाबाद ( आताचे मुक्ताईनगर) या अतिशय दुर्गम आणि उपेक्षित गावातला ; मात्र या गावाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला असल्याने या मातीने साधारणतः १९७० च्या आसपास महाराष्ट्राला प्रतापसिंग बोदडे यांच्या सारखा प्रतिभाशाली गीतकार दिला. मिलिंद महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालेलं असल्यानं त्यांना आंबेडकरी चळवळ जवळून पाहता आली, अनुभवता आली.त्यांची मुळात विद्यार्थी दशेतच अशी वैचारिक जडणघडण झाल्यानं आणि दरम्यानच्या काळात वामनदादा कर्डक यांच्या सारखा प्रतिभावान गुरू आणि मार्गदर्शक लाभल्यानं त्यांच्या गीतांना बहर आला. आंबेडकरी गीतांचे चळवळीत खूप मोठे योगदान आहे. कोणत्याही प्रिंट, डिजिटल किंवा सोशल मीडिया सारख्या माध्यमांचा वापर न करता वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंग बोदडे हे लोकांच्या जिभेवर आहेत.आणि पुढेही राहतील. ‘उद्धरली कोटी कुळे….भीमा तुझ्या जन्मामुळे…’ म्हटलं किंवा ऐकलं, की लगेच वामनदादा कर्डक यांचं नाव नजरेसमोर येतं.तसंच ‘भीमराज की बेटी मै तो जयभीम वाली हू।’हे गाणं ऐकलं की प्रतापसिंग बोदडे यांचं नाव समोर येतं. या गाण्याने केवळ आंबेडकरी समूहाला किंवा स्त्री ला प्रेरित केलेलं नाही. तर समस्त महिला वर्गाला चेतना देण्याचं काम सातत्यानं केलं आहे. बोदडे यांचं हे गीत महाराष्ट्राची सीमा कधीच ओलांडून देशभर विविध कार्यक्रमातून आवर्जून गायिलं जातं. अलीकडे तर सर्वच समाजातल्या आनंदाच्या प्रसंगी तरुण वर्ग या गीताची मागणी करून वाद्याच्या तालावर आपला ठेका धरताना दिसून येतो.
मी अगदी ९-१० वर्षाचा होतो तेव्हापासून त्यांना ऐकत आलो आहे.पाहत आलो आहे. माझे वडील बोदवड जवळच्या नाडगाव रेल्वे स्टेशनवरील आंबेडकर जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमातील प्रतापसिंग बोदडे यांच्या गीत गायन कार्यक्रमास (भोपलू इंगळे, आर. पी. तायडे, सेवा निवृत्त गट विकास अधिकारी या लोकांच्या पुढाकाराने आयोजीत) मला बोदवड ते नाडगांव असा ३-४ किलोमीटर पायी प्रवास करायला लावून घेऊन जायचे. त्या वेळी रात्रभर गायक आणि गायिका यांचा सामना व्हायचा. प्रतापसिंग बोदडे आणि वैशाली शिंदे यांची जोडी असायची. एक आंबेडकरी गीत झालं ,की दुसरं लोक गीत व्हायचं, प्रबोधनाबरोबर मनोरंजन असं त्याचं एकूणच स्वरूप असायचं.प्रतापसिंग बोदडे यांना गीत गायनाचं तर अंग होतंच ; त्यांचा भारदस्त आवाज होताच : मात्र त्याहूनही ज्या पद्धतीनं ते आपलं गीत लोकांना समजावून सांगायचे त्याला तोड नसायची.त्यांचा अभ्यास अतिशय दांडगा होता. इंग्रजीत त्यांचं पदव्युत्तर शिक्षण झालेलं होतं. त्यांनी इंग्रजी, हिंदी आणि मराठी बरोबरच उर्दुतलंही साहित्य वाचलं होतं. अभ्यासलं होतं. त्यांच्या प्रत्येक गीतातून ते व्यक्त व्हायचं. मराठीतील महत्वाचे गायक : आंनद शिंदे,मिलिंद शिंदे सारखे गायक त्यांना अभिवादन करायचे, त्यांच्या प्रती आदर व्यक्त करायचे, त्यांची गीतं गायचे.
प्रतापसिंग बोदडे यांच्या गीतातून एकूणच आंबेडकरी चळवळीचं विराट दर्शन व्हायचं. माझ्या सारख्या लेखकाची जडणघडण त्यांच्या गीतांनी केली आहे.मला माझ्या वडिलांनी त्यांची गीतं ऐकवली नसती तर मी आज लिहू शकलो नसतो. माझे आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होते. अलीकडे एखादं नवीन गाणं लिहिलं की ते मला मोबाईल वरून ऐकवायचे. – दोनच राजे होऊन गेले कोकण पुण्य भूमीवर …हे त्यांनी लिहिलेलं गीत प्रथम मला ऐकवलं होतं.मला ते आपल्या गीतावर कधी कधी प्रतिक्रिया विचारायचे. मी गेल्या पाच वर्षांपूर्वी त्यांच्या गीतांचं डॉ.मनोहर जाधव, प्रमुख, डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुढाकाराने पुस्तक केलं. त्या वेळी त्यांचा सतत संपर्क आला. त्यांच्या निवडक गीतांचा ‘पाषाणावरील कंगोरे’ हा सुविद्या प्रकाशनामार्फत एकमेव गितसंग्रह प्रकाशित करण्याची संधी मला त्या निमित्तानं मिळाली. माझी पत्नी रत्ना हिने या पुस्तकाच्या डी टी पी चं काम केलं होतं. मला ते पुस्तक आल्यानंतर नेहमी म्हणायचे, ‘लोक माझ्या गीतांचे चाहते आहेत. गायला बसलो की माझ्यावर पैसेही उधळतात ; मात्र माझं पुस्तक काढायला कुणी पुढं येत नाही. तुम्ही मला पुस्तकाचा आंनद दिला, त्या बद्दल मी तुमचा आभारी आहे.’ त्यांच्या बोलण्यातून एकूणच आंबेडकरी गितकारांच्या मनातल्या भावना व्यक्त व्हायच्या. खरं तर प्रतापसिंग बोदडे यांची गीतं ही पुस्तक रूपानं यायलाच हवीत. त्याच बरोबर अभ्यासकांनी स्वतः लक्ष घालून आपापल्या परिसरातील अश्या गितकारांच्या गीतांची दखल घेऊन हा ऐवज ग्रंथ रूपानं प्रसिद्ध करायला हवा ; मात्र कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही. हे वास्तव आहे.
प्रतापसिंग बोदडे अनेक दिवसापासून आजारी होते. मी अधून मधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी जायचो.; मात्र ते असे अचानक आपल्यातून निघून जातील ,असे वाटत नव्हते. अखेर त्यांच्या मृत्यूची बातमी धडकलीच. माझा बातमीवर सुरवातीला विश्वासच बसला नाही; प्रतापसिंग बोदडे सारख्या कलावंताने आपल्यातून असे अचानक निघून जाणे म्हणजे आंबेडकरी चळवळीची ही मोठी हानीच आहे. ती कधीही भरून निघणारी नाही, मात्र प्रतापसिंग बोदडे हे आपल्या गीतातून कायमच आपल्या समरणात आणि चळवळीत राहतील, त्यांची गीतं ही नेहमीच आंबेडकरी चळवळीला उजेड दाखवण्याचं काम करीत राहतील, त्यांना मी भरलेल्या हृदयाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो…
- -दीपध्वज कोसोदे
- ९४२३९५४६४०