तो दिवस होता 31मे 1974 चा. दिवस उजाडला नेहमीप्रमाणेच पण काहीतरी वेगळं घेऊन.पहाटे शेतात फेरी मारण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याला नदीपात्रात जे दिसलं ते बघून त्याला हर्षवायू झाला नाही हेच नवल! समोरील दृश्य बघून सुर्य उगवेपर्यंत ”सुर्य -भानावरच ” आला नाही. काय काय नेऊ ….किती किती नेऊ ….आणि कसं कसं नेऊ …या संभ्रमात असतानाच त्याने आपल्या सदऱ्याभोवती कंबरेला दोरी बांधली; आणि हाती लागतील तितक्या सोन्याच्या गिन्न्या त्यात भरल्या आणि घराकडे निघाला. हळूहळू ही वार्ता शेजाऱ्यांमधे पसरली. बघता बघता सारा पातूर गाव नदीपात्रात उलटला. ज्याला जे नेता येईल , जितकं नेता येईल तितकं तो वाट्टेल तसा नेऊ लागला. मे महिन्याच्या भर उन्हाळ्यात गावकरी दसऱ्याच्या सोन्यासारखं खरंखुरं सोनं लुटत होते. प्रत्येक घरात एक अलीबाबा तयार झाला होता.
हळूहळू बातमी वाऱ्यासारखी पोलीस स्टेशन पर्यंत गेली. त्यावेळी पातूरचे ठाणेदार राजे साहेब होते. त्यांनी लगेच DSP पद्मनाभन यांना संदेश पाठवला. पद्मनाभन यांनी महाराष्ट्र राज्याचे त्यावेळी गृहमंत्री असलेले रत्नाप्पा कुंभार यांना हा संदेश पाठवला. त्यांनंतर ही बातमी थेट मुख्यमंत्री श्री वसंतराव नाईक यांच्या पर्यंत गेली . तेथून थेट पंतप्रधान कार्यालय दिल्ली येथे पोहोचली. नंतर ही बातमी केवळ भारतापूरती मर्यादीत न राहता पुढे BBC लंडन पर्यंत जाऊन पोहचली आणि या खजीन्याने पातूरला जागतिक पातळीवर नेऊन ठेवले.”कलम 144 लागू करा ” हा आदेश येईपर्यंत जवळपास ९० टक्के खजिना लुटला गेला होता .पोलीस बंदोबस्तात केवळ 36 किलो वजनाच्या 3262 सोन्याच्या गिन्न्याच शासन दरबारी जमा होऊ शकल्या.त्या दिवशीचा तो प्रसंग नुसता डोळ्यासमोर आणला तरीही आपण थक्क होतो. ज्यांनी तो अनुभवला असेल त्यांचं काय झालं असेल ! याची आपण कल्पनाच केलेली बरी..
होय ! पाहटेच्या स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट स्वप्नातील नाही तर खरीखुरी आहे. अकोला जिल्ह्यातील पातुर या तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बोर्डी नदीपात्रात 31 मे 1974 च्या पहाटे बादशहा शहाजहाँ यांच्या काळातील सोन्याची शेकडो किलो नाणी अचानक सापडली. ही नाणी तिथे कशी आली ? याचा शोध घेतला असता इतिहास हाती लागला तो असा ….
इ. स. 1628 ते 1658 हा मुघल सम्राट शहाजहाँचा काळ. त्यावेळी भारतावर अनेक ठिकाणी मुघल साम्राज्य पसरलेले होतें किंवा त्यांचे मांडलिक राजे राज्य करत होते. शहाजहाँ बादशहाचा सरदार ख्वाँजाजहाँ गोवाळकोंडा येथून खंडणी वसूल करून ती सुरतच्या ठाण्यात जमा करण्यासाठी निघाला. (तिच सुरत जी महाराजांनी स्वराज्यासाठी दोनदा लुटली होती.) मजल -दर -मजल करत सैन्य हत्ती , घोडे, बैल, उंटांवर लादलेली ही खंडणी घेऊन प्रवास करता करता विदर्भातील पातुर या गावात पोहोचले.
पातूर येथील हिरवागार परिसर बघून त्यांनी बोर्डी नदीच्या काठावर आपल्या सैन्याचा पाडाव (मुक्काम) टाकला. साधारणत: पाण्याची मुबलकता जिथे असेल तिथे त्यावेळी मुक्कामाचे ठिकाण निवडले जाई. परंतु हा खजिना इथे जमिनीत कसा गाडला गेला याबद्दल काही कयास लावले जातात. हा भला मोठा खजिना घेऊन सैन्य येथून जात आहे ही वार्ता शत्रू सैन्याला कळली असावी. शत्रूच्या हाती खजीना लागू नये म्हणून तो जमिनीत लपवला असेल.कदाचीत घनघोर लढाई होऊन त्यात खाँजाजहाँचे सैन्य मारले गेले असावे किंवा खजिना नंतर काढून नेऊ या विचाराने सैन्य तेथून पळून तरी गेले असावे.खजिना सापडला त्या ठिकाणाहून काही अंतरावर गिन्नीवर असलेली नाममुद्रा कोरलेले काही शिलालेख होते व त्यावर ज्या ठिकाणी गिन्न्या सापडल्या त्या ठिकाणाकडे अंगुली निर्देश करणारे काही दगड रोवलेले होते असे लोक सांगतात. आपल्याला आज काय ते नेमकं सांगता येणार नाही. सर्व अंदाज किंवा किवदंता आहेत तसा पुरावा उपलब्ध नाही.
1628 ते 1658 या दरम्यान बोर्डी नदीकाठावर गाडला गेलेला हा सोन्याच्या नाण्यांचा खजीना जवळपास 328 वर्ष जमिनीच्या पोटातच राहीला. 1971 साली तब्बल 36 तास पडलेल्या संततधार पावसाने नदीला भला मोठा पूर आला. नदीचे दोन्ही काठ पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले पण खजीना उघडा पडायला 1974 सालचा मे महिना उजाडावा लागला.
पुढील दोन-तीन वर्षात पुराच्या पाण्यामुळे नदीचे काठ खचत खचत खजिन्यापर्यंत गेले आणि शेवटी मे महिन्यात जमिनीच्या होणाऱ्या धूपे मूळे अचानक काठाची माती खचली आणि जमिनीच्या पोटातील घबाड उघडे पडले. भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता असे म्हणतात परंतु चक्क मे महीण्याच्या कडक उन्हात पातूरच्या बोर्डी नदीपात्रात सोन्याच्या गिन्न्यांचा पिवळा पूर वाहत होता. या सोन्याच्या नाण्यावर फारसी भाषेत लिहिलेले फरमान असे आहे …
बादशाह गाझी मोहम्मद शाहजहाँ शहाबुद्दीन के साहब फरमान… (गाझी म्हणजे युद्ध जिंकलेला) तसेच गिन्नीच्या दुसऱ्या भागावर कुरान-ए-शरीफ मधील पहिला सुरा लिहिलेला आहे. जवळपास 11 ते 12 ग्रॅम वजनाच्या ह्या एका नाण्याची आजची बाजार किंमत 55 ते ते 60 हजार रुपये आहे.त्यावेळी नागपूरहून CRPF ला खास बंदोबस्तासाठी पाचारण केले होते. यानंतर पोलीसांनी गावात छापे मारले. श्री चौबे साहेब यांच्या नेतृत्वात पातूर येथून काही लोकांना बयान नोंदवण्यासाठी दिल्ली येथे नेले गेले.पोलीसांच्या भीतीने लोकांनी केवळ २०० ते ३०० रुपयाला ह्या गिन्न्या चोरून-लपून विकल्या. ज्यांच्याकडे त्यावेळी पैसे होते यांनी हे 24 कॅरेट असलेलं सोनं कवडीमोलाने विकत घेतलं. ज्यांनी विकलं ते कंगाल झाले व ज्यांनी घेतलं ते मालामाल झाले. हे अस्सल सोनं विकत घ्यायला त्यावेळी सोन्याच्या दागिण्यांसाठी देशात प्रसिद्ध असलेल्या जळगाव खान्देश येथील व्यापारी पातूरला ठाण मांडून बसत.
फुकटात सापडलेल्या ह्या सोन्याचे पोलिसांच्या भीतीने कागदी पैसे करून काही महाभाग कागदाच्या 50, 100, 200 रुपयांच्या नोटेची पुंगळी करून त्यात गांजा ओढत असत किंवा कागदाच्या पैशाचा पतंग बनवून त्याचे पेच लढवत.अशा पद्धतीने एक प्रकारची उतमात सुरू होती. “फुकाचं चंदन उगाळ नार्या ” असेच काहीसे.
आजही ‘ती’ जागा गिन्नी खदान म्हणून ओळखली जाते. बोर्डी नदीपात्रात त्या जागेवर आणखी बराच खजिना लपलेल्या असेल असा लोकांचा गैरसमज आहे आणि तो मिळवण्यासाठी व आपले नशीब आजमावण्यासाठी लोकं आजही चोरून-लपून तिथे खोदायला जातात. रात्र-रात्रभर खोदतात. कुणाच्या नशिबात काहीच लागत नाही तर कुणाला एखादं दुसरी सापडल्याची वार्ता/ अफवा गावभर पसरते.
खरं काय ! खोटं काय ! हे शहाजहाँ बादशहा त्याचा सरदार खाँजाजहाँ, खजीना वाहून नेणारे ते शेकडो उंट, हत्ती,घोडे, बैल व खजिन्याची सुरक्षा करणारे सैन्य, खजिना जमिनीत गाडणारे सैनिक ह्यांनाच माहिती…!
- ON THE SPOT
- वाटसरू
- -प्रा.निलेश पाकदुने
- पातूर.
- (Images Credit : Lokmat)