सर्वप्रथम इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!परीक्षेला जाताना व पेपर सोडविताना लक्षात ठेवावयाच्या सूचना अगदी लहान असतात पण त्या उत्तम गुणांसाठी महान असतात. त्याचाच आपण येथे परीक्षार्थीं विद्यार्थ्यांसाठी विचार करणार आहोत.या महत्त्वपूर्ण सूचना विद्यार्थ्यांना वाचायला वेळ नसेल तर पालकांनी वाचून त्या आपल्या पाल्यांना सांगून पेपर सोडविताना तसे आचरण करण्यास सांगितले तर त्याचा गुणवृद्धिसाठी फायदाच होईल. परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी पेपरच्या दिवशी शांत चित्त ठेवावे .पेपरच्या दोन तास अगोदर हलकासा आहार घ्यावा. पूर्ण जेवण करून पेपरला जाऊ नये कारण परीक्षा हॉलमधील प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो.पेपरच्या पूर्वीच्या रात्री पाच ते सहा तास झोप घेणे आवश्यक आहे कारण अधिकच्या जागरणाने उत्तरपत्रिका लिहिताना पेंगण्याचा त्रास होऊ शकतो.परीक्षा हॉलमध्ये मिळालेल्या ग्लासमधील पाणी पूर्ण प्यावे ,अर्धवट पाणी पिऊन डेक्सवर ग्लास ठेवला तर धक्का लागून तो पडल्यास तुमची उत्तरपत्रिका पाण्यात भिजू शकते म्हणून पाण्याची बॉटल सोबत घेऊन जा हवे तेव्हा पाणी प्या व सुरक्षित राहा.
परीक्षेच्या चार तास अगोदर स्वत:च्या पेपरसाठी आवश्यक असलेल्याकंपासपेटी मधील सामान व्यवस्थित करून ठेवा. उदाहरणार्थ पेन ,पेन्सिल, खोडरबर, लहान व मोठी स्केल इत्यादी तसेच प्रवेशपत्र व पाण्याची बाँटल इत्यादी .परीक्षा केंद्रावर पोहचल्यानंतर कोणत्याही गोष्टीवर जास्त चर्चा करु नका. जास्त बोलू नका. बोर्डावरील सिटिंग प्लॅान बघून आपला नंबर कोणत्या रुममध्ये आहे ते बघणे.लघुशंका आटोपूनच परीक्षा हॉलमध्ये जाणे. कारण परीक्षा सुरू झाल्यानंतरचा प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो.परीक्षा हॉलमध्ये गेल्यानंतर स्वत:च्या नंबरचा डेक्स – बेंच व्यवस्थित आहे की नाही ते बघणे . तो जास्त हलतो का ? ते बघणे. लिहिण्यासारखा नसेलच तर बदलवून मागणे .सर्वप्रथम बेंचच्या पायाखाली काही कागद वगैरे आहे का ते बघणे.डेक्स-बेंचच्या आतील सर्व बाजू चाचपून पाहणे जर काही कागद आढळले तर ते पर्यवेक्षकांजवळ देणे आणि लिहिताना आपल्या डेक्स-बेंचखाली कोणी काही फेकून दिलेले कागद असल्यास ते पर्यवेक्षकाच्या लक्षात आणून देणे. पेपर सोडवित असताना परीक्षा हॉलमध्ये काही गडबड सुरू असल्यास तिकडे आपण लक्ष न देता फक्त उत्तरपत्रिका सोडवणे कारण परीक्षा हॉलमधील एक सेकंद एक गुण मिळवून देऊ शकतो हे लक्षात ठेवणे. पेपर सोडविताना लक्ष विचलित होऊ देऊ नये.
उत्तरपत्रिका मिळाल्यावर तिचे पूर्ण पृष्ठ व्यवस्थित आहे का? नंबरप्रमाणे पूर्ण पृष्ठ आहेत का? एखादे पृष्ठ फाटलेले आहे का? एखादे पृष्ठ कोरे आहे का? पूर्ण रेषा आहेत की अर्धवट आहेत .पहिल्या पृष्ठावरील प्रिंट व्यवस्थित आहे का? अशी फॉल्टी उत्तरपत्रिका आढळल्यास लगेच ती पर्यवेक्षकांजवळ देणे व दुसरी घेणे ,दुसरी घेतल्यावरही ती तशीच तपासून घेणे. उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर उत्तरपत्रिकेतील उत्तरपत्रिकेच्या दुसऱ्या पृष्ठावरील सूचना काळजीपूर्वक वाचणेव आणि त्या पेपर सोडविताना आचरणात आणणे. उत्तरपत्रिकेत ओळखीच्या खाणाखुणा, पत्ता,फोन नंबर इत्यादी लिहू नये.उत्तरपत्रिका उत्तम आहे असे समजल्यावर सर्वप्रथम आपल्या प्रवेशपत्रावरून रोल नंबर अक्षरात व आकड्यात बिनचूक लिहिणे,स्वत:ची सही करणे, केंद्र क्रमांक, दिनांक ,विषय, माध्यम, पेपर क्रमांक इत्यादी बिनचूक लिहिणे. हे सर्व लिहिल्यावरही एक भाग लिहायचा राहतो तो म्हणजे पुरवण्यांचा.या भागात पूर्ण उत्तरपत्रिका सोडून झाल्यावर जर मुख्य उत्तरपत्रिका सोडून दोन पुरवण्या घेतल्या असतील तर मुख्य उत्तरपत्रिकेच्या पहिल्या पानावरील “नंबर ऑफ सप्लिमेंट” या रकाण्यात दोन असे लिहून टोटलच्या रकाण्यात तीन हा आकडा लिहिणे कारण मुख्य उत्तरपत्रिकेचा एक आकडा पहिल्या रकाण्यात लिहिलेला असतोच.
रोल नंबर व इतर माहिती लिहिल्यावर उत्तरपत्रिकेचे डाव्या बाजूला बोर्डाने आखलेल्या समासाच्या आत एक सेंटीमीटरच्या अंतराने प्रत्येक पृष्ठावर उपप्रश्न नंबर लिहिण्यासाठी समास आखावा.पृष्ठाच्या उजव्या बाजूला समास आखू नये.प्रश्नपत्रिका मिळाल्यावर ती पूर्ण प्रश्नांची आहे का ? ते बघणे नंतरच वाचणे.पण ती प्रश्नपत्रिका पूर्ण प्रश्नांची नसेल तर ते पर्यवेक्षकांच्या लक्षात आणून देणे व दुसऱ्या प्रश्नपत्रिकेची मागणी करणे नंतर वाचणे. पहिल्या प्रश्नातील जो उपप्रश्न उत्तम येत असेल तेथून सोडविण्यास सुरूवात करणे.प्रत्येक प्रश्नातील उपप्रश्न जेवढे विचारले तेवढेच सोडविणे व ते एकापाठोपाठ एक सोडविणे, अतिरिक्त सोडवून व्यर्थ वेळ घालवू नये.
पेपर सोडविताना १०० गुणांच्या पेपरसाठी एका गुणाला ९९ सेकंद याप्रमाणे गुण विभागणी केल्यास शंभर गुणाला ९९०० सेकंद लागतात म्हणजेच १६५ मिनिट, उरलेल्या पंधरा मिनिटात शेवटी स्वत:ची उत्तरपत्रिका स्वत: तपासावी अर्थात शीर्षक ,मुद्दे व परिच्छेदातील महत्त्वाचा एक शब्द अधोरेखित करणे,अवतरण चिन्ह दिले नसल्यास देणे, उत्तर संपल्यानंतर रेषा आखणे.रिकाम्या जागेत डावीकडून उजवीकडे आडवी रेषा देऊन पी.टी.ओ.लिहिणे असा शेवटच्या पंधरा मिनिटांचा उपयोग करावा. दीर्घ प्रश्नांची उत्तरे दीर्घ व लघु प्रश्नांची उत्तरे लघु लिहावी. येत असेल तरीही अतिरिक्त उत्तर लिहून व्यर्थ वेळ घालवू नये .उत्तम गुणांसाठी पूर्ण पेपर सोडविणे आवश्यक आहे हे लक्षात ठेवावे. उत्तरे लिहिताना अक्षर खूप लहान अथवा मोठे नको.वळणदार व एकसारखे असावे.लिहिताना वळणदार हस्ताक्षरांचे काही नियम आचरणात आणल्यास अक्षर वळणदार येतील उदाहरणार्थ अक्षरांची जाडी व उंची समान असावी, अक्षरे शिरोरेषेला चिकटलेली असावी, अक्षरांची वेलांटी ,उकार व मात्रा अक्षराच्या निम्मे असावी, दोन शब्दांमधील अंतर करंगळीएवढे असावे, अक्षरांची वेलांटी व मात्रा अक्षराच्या आकाराला चिकटलेली असावी, अक्षराला विशिष्ट वळण असावे इत्यादी.
कोणत्याही विषयाच्या प्रश्नांचे उत्तर लिहिताना प्रथम प्रश्नांमधूनच शीर्षक तयार करावे व ते उत्तर लिहिताना प्रारंभी मधोमध लिहून अधोरेखित करावे व त्याला डबल अवतरण चिन्ह द्यावे . दीर्घ अथवा निबंधात्मक प्रश्नांची उत्तरे सोडविताना प्रस्तावनेतील व प्रत्येक परिच्छेदातील एक महत्त्वाचा शब्द अधोरेखित करावा .पुरवणी घेतली असल्यास ती पक्की बांधावी .पुरवणी मिळाल्याबरोबर तिच्यावर प्रथम रोल नंबर व इतर माहिती लिहावी. आण होलोक्राँफ्ट स्टिकर चिकटवावे. उत्तरपत्रिकेचे शेवटचे पृष्ठ लिहिण्याचा प्रारंभ करतानाच पर्यवेक्षकांना पुरवणी मागावी कारण मुख्य उत्तरपत्रिका पूर्ण सोडवल्यानंतर जर मागितली व पुरवणी मिळायला उशीर झाला तर व्यर्थ वेळ जाऊ शकतो .शेवटच्या अर्ध्या तासामध्ये मुख्य उत्तरपत्रिकेवर होलोक्राँफ्ट स्टिकर चिकटवावे.
विद्यार्थ्यांचा असा पक्का विचार असावा की कॉपी करून पास होण्यापेक्षा मी नापास होणे पसंत करेल कारण कॉपी करणारा पुढे उच्च शिक्षणाच्या स्पर्धेत टिकू शकत नाही. वरील सर्व सूचनांचे आचरण करण्यात तसेच पूर्ण पेपर उत्तम सोडविण्यात व पूर्ण पेपरमधील पूर्ण प्रश्नांची उत्तरे उत्तम सोडवण्यातच प्रावीण्याचे गुपित दडलेले आहे.म्हणून वरील आवश्यक सूचनांचे विद्यार्थ्यांनी आचरण करून परीक्षेत भरपूर यश मिळवावे आणि गुणवंत व यशवंत व्हावे. अशा प्रकारचे आचरण विद्यार्थी वाचक करतील या आशेत या हितगुजाला मी पूर्णविराम देतो.
- आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
- – प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
- रुक्मिणीनगर, अमरावती.
- भ्र.ध्व.:-८०८७७४८६०९
- (Images Credit :The Business Post)