- जिंगल बेल्स जिंगल बेल्स
- जिंगल ऑल द वे
- सांताक्लॉज इज कमिंग
- रायडिंग डाऊन धिस वे
बालपणी शाळेतील इंग्रजीच्या तासाला म्हटलेल्या या कवितेची नाताळ दिवशी हमखास आठवण येते. नाताळ किंवा क्रिसमस हा ख्रिस्ती बांधवांचा सण. तो २५ डिसेंबरला जगभर साजरा केला जातो. कारण याच दिवशी ख्रिस्ती लोकांचे प्रभू येशूचा जन्म झाला होता. काही ठिकाणी हा सण ६ किंवा ७ जानेवारीला एपिफानी म्हणून साजरा करतात.नाताळ हा सण १२ दिवसांचा असतो. जगभरात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. काही ठिकाणी मध्यरात्री साजरा करतात. नाताळ हा शब्द मूळचा लॅटिन. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला असे मानले जाते. प्रभू येशूच्या जन्मदिनाच्या अनेक कथा सांगितल्या जातात. ‘बेथलहेम’ हे इस्त्राईल देशातील छोटेसे गाव आहे. याच गावात येशूचा जन्म झाला. त्या दिवशी इथून लोकं रात्रीच मिरवणूक काढतात अन पहाटेला जेरुसलेमला पोहोचतात.
नाताळ सणांमध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. लहान मुले या सणाची आतुरतेने वाट पाहतात. रात्री झोपल्यावर सांताक्लॉज येऊन मुलांना भेट वस्तू आणि खाऊ देतात अशी वदंता आहे. त्यामुळे लहान मुले आपल्या बेडजवळ सॉक्स टांगून ठेवतात.सांताक्लॉजचे चित्रण सामान्यतः बुटकी, वृद्ध, पांढऱ्या दाढीची, लाल अंगरखा घातलेली, चष्मा लावलेली, पाठीवर भलीमोठी पोतडी घेऊन फिरणारी, पोतडीतल्या वस्तु लहान मुलांना वाटत फिरणारी व्यक्ती असे केले जाते. सकाळी सांताक्लॉजने काय काय भेटवस्तू दिल्या हे पाहतात. मिठाई, केक आणि चॉकलेटस् वाटून आनंद साजरा केला जातो. नातेवाईक, मित्रमंडळी एकमेकांकडे शुभेच्छापत्र आणि मिठाई घेऊन जातात. सर्वजण आपल्या घरात रोषणाई करतात. क्रिसमस ट्री बनवून (सूचिपर्णी वृक्ष) तिला विद्युत रोषणाईने सुशोभित करतात.लहान मुलांचे मोजे, छोट्या प्रतीकात्मक काठ्या, छोट्या घंटा, भेटवस्तू अशा गोष्टी लावून हा वृक्ष सजविला जातो. फुगे आणि तऱ्हेतऱ्हेचे कंदील लटकवून घराची, अंगणाची सजावट करतात.क्रिसमस ट्री हे स्वर्गातल्या ईडन बागेतील झाड आणि क्रुसाचे झाड यांचे प्रतिक आहे.
येशूचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला होता. त्याची स्मृती म्हणून गोशाळा किंवा गायीचा गोठा तयार करण्याची परंपरा आहे. सर्वजण चर्च या ख्रिस्ती बांधवांच्या धार्मिक स्थळांमध्ये एकत्र येऊन मास प्रार्थना करतात आणि येशूचे दर्शन घेतात. साऱ्यांना एकत्र आणण्याचा हा सण आहे.लहान-थोर सर्वजण खूप आनंदात असतात. इ.स.३४५ वर्षात या वेळच्या पोप पहिला ज्युलियसने २५ डिसेंबर हा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. तेव्हापासून जगभरात हा दिन नाताळ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला. भारतातील सर्व ख्रिस्ती बांधव एकत्र येऊन हा सण उल्हासाने साजरा करतात. सांताक्लॉजच्या वेशभूषेत फिरून बरेच जण दिवसभर मुलांना चॉकलेटस् , भेटवस्तू आणि केक वाटत असतात. त्यांच्या पाठीवरच्या मोठ्या पिशवीमध्ये भरपूर भेटवस्तू असतात. नाताळनंतर थोड्याच दिवसात नवीन वर्षाचे आगमन होणार असल्याने नववर्षाच्या शुभेच्छा ही आदान प्रदान केल्या जातात.
ख्रिसमस म्हणजे ख्रिस्तमहायज्ञ
मिस्सा होय. ख्रिसमसच्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करण्याची परवानगी दिली गेली. ख्रिस्ताच्या जन्मघटकेचे स्मरणार्थ पहिला मिस्सा मध्यरात्री अर्पण केला जातो. ख्रिस्ताचा जन्म मध्यरात्री झाला. दुसरा मिसा पहाटे व तिसरा मिस्सा दिवसात अर्पण केला जातो.काही ठिकाणी नाताळ सणापुर्वी आठवडाभर लहान मुले घरोघरी जाऊन येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. त्यांना कॅरॉल असे म्हणतात. या दिवशी गायन, वादन, नृत्य, सहभोजनाचा आस्वाद अशा गोष्टी आनंदाचा भाग म्हणून साजरा केल्या जाऊ लागल्या. काही ठिकाणी विशेषत: प्रार्थनास्थळी येशूच्या जन्माचा देखावा मांडला जातो.
- सौ.भारती सावंत
- मुंबई
- 9653445835