असे दुर्दैव लेखकाच्या वाट्याला येऊ नये. २०१० मध्ये कवी देवानंद गोरडे गेला. आयुष्यातले एक मैत्रीचे नाते विस्कटले. शेवटची काही वर्षे आजारपणात गेली. त्याची आई गेली तेव्हा त्याला धड उठता बसताही येत नव्हते. स्वतःच्या प्रकृतीला जपणारा देवानंद. शेती करायचा. शेतातली काळी माती ओली करून सर्वांगाला चोपडून घ्यायचा. मातीचा गिलावा सुकेपर्यंत पडून राहायचा. याला निसर्गोपचारात मडबाथ म्हणतात.
काही दिवसांसाठी अमरावतीच्या हनुमान व्यायाम शाळेच्या निसर्गोपचार केंद्रात तो भरती झाला. संध्याकाळ होताच झोपणे आणि पहाटे उठणे. सकाळ संध्याकाळ नुसतेच उपचार. वाळूत फिरणे. काढे प्राशन करणे, स्टीम बाथ, बबल बाथ, एनिमा, तेल मालिश, योग, चहा बंदी, जेवणात मीठ मसाला विरहित भाज्या आणि केवळ दोन फुलके…असे अनेक प्रयोग तो स्वतःवर करत राहायचा. हे उपचार करताना तो ना आजारी होता, ना त्याला कोणती व्याधी होती. अकस्मात वाट्याला आलेल्या आजारपणामुळे या सगळ्या प्रयोगांवर पाणी फेरले गेले.
मोर्शीच्या रामजी बाबाचा तो परम भक्त. आई तेथे शिक्षिका. त्यामुळे वारंवार त्याचे रामजी बाबांच्या मंदिरात जाणे व्हायचे. तसा तो नास्तिक. पण या बाबांनी त्याच्यावर काय जादू केली, त्याने उमलत्या वयातच त्यांच्यावर एक पोथी लिहून काढली. हे त्याचे पहिलेवहिले लेखन. त्यानंतर तो अतिशय गंभीर आणि काहीशा गूढ कविता लिहू लागला. कधीही वाचनातून न गेलेले शब्द आणि प्रतिमा यांच्यातून त्याची आगळी वेगळी कविता निर्माण झाली. कवितेच्या एका एका योग्य शब्दासाठी तो झुलत राहिला. केवळ एका शब्दासाठी त्याने एक कविता सहा महिने प्रकाशित केली नाही. (जोंधळमंथनी… वारा आला की ज्वारीची कणसे एकमेकांना घासतात.) आपल्या शब्दांवर तो ठाम होता. एका विख्यात कवीने त्याला कवितेतला एक शब्द बदलायला सांगितला तेव्हा त्याने स्पष्ट नकार देण्याची हिंमत दाखवली!
अर्थातच त्याच्या कवितेची दर्जेदार नियतकालिकांनी दखल घेतली. १९७४ मध्ये मित्र परिवाराच्या सहकार्याने त्याचा कविता संग्रह निघाला. संग्रहाचे शीर्षक त्याच्या कवितेसारखेच गूढ, अगम्य. (आकाश ÷ माती = ?)
पुढे लिहून ठेवलेल्या कवितांचा त्याने एक संग्रह बांधला. शीर्षक द्यायचे राहून गेले. कदाचित असेच एखादे शीर्षक सुचण्यासाठी तो थांबला असावा. आपला पुन्हा एक तरी संग्रह निघाला पाहिजे हे त्याच्या मनात होते. पण त्यासाठी दर्जेदार प्रकाशक मिळाला पाहिजे ही त्याची अट. असा प्रकाशक मिळाला नाही तर संग्रहच काढायचा नाही हा त्याचा अट्टाहास. अनेकांनी त्याला सांगून पाहिले. पण तो आपल्या मतांवर ठाम राहिला. एक दिवस त्याला पाहिजे तशा मोठ्ठ्या प्रकाशकाशी माझी गाठ पडली.
- “विदर्भात एक कवी आहे, त्याच्या कविता सत्यकथासारख्या मासिकातून येतात. तुम्ही प्रकाशनाच्या दृष्टीने एकवार या कविता नजरेखालून घालाव्यात”, मी त्यांना विनंती केली तेव्हा ते म्हणाले,
- “मी प्रकाशनातून लक्ष काढून घेतले आहे. आता ते काम बाकीची मंडळी सांभाळतात.”
- “पण एकदा तुम्ही वाचाव्यात असे मला वाटते.”
- नको म्हणाले. देवानंदला सांगितले.
- “विनाकारण वेळ दवडू नकोस. मोठ्या प्रकाशकाने संग्रह नाही घेतला तरी काही फरक पडत नाही. कुणी दुसरा मिळेलच. आपण विचारू.”
- त्याचाही ‘नकोच.’
- त्याच्या कवितेतली एक ओळ आठवते,
- ‘झाड वठायला येईस्तोवर माझा एकही नेम का बसू नये?’
- पुस्तक प्रकाशनाच्या संदर्भात त्याचे सारे नेम चुकतच गेले. संग्रहाचे राहून गेले आणि आजारपणाची ब्याद पाठीशी लागली.
देवानंदला राजकारण आवडायचे. राजकारणात घुसायचे असेही त्याला वाटायचे. लहानसे का होईना, एखादे पद मिळावे अशी त्याची इच्छा होती. यातूनच त्याचे काही आमदार, खासदार आणि मंत्र्यांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित झाले. पण म्हणावे तसे यश या क्षेत्रात त्याला मिळाले नाही. टाकरखेडा मोरे हे एक छोटेसे खेडे, त्याचे जन्मगाव. अंजनगाव सूर्जी पासून चार किमी. तेथून थोड्या अंतरावर मुऱ्हा देवी हे एक लहानसे गाव. देवानंदने स्वतःच्या अध्यक्षतेखाली समाज प्रबोधन शिक्षण संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून दोन्ही गावात शाळा उभ्या केल्या. (समाज प्रबोधन विद्यालय). नित्यनेमाने विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना भाषणांसाठी शाळेत पाचारण केले. दरवर्षी कविसंमेलन ठरलेले. डॉ सुखदेव ढाणके, बबन सराडकर, रमेश मगरे, राम देशमुख आणि मी ही त्याची ठरलेली माणसं. कविसंमेलनासाठी आणिक बरेच. नित्याच्या भेटीमुळे अख्खं गाव आम्हाला ओळखायला लागलं. तेथल्या एका मंदिरात तर बबन सराडकरांच्या चार ओळी आतल्या भिंतींवर चक्क पेंट केल्या आहेत.
देवानंदचा त्याच्या शाळेत घडलेला सुरुवातीचा स्मृती समारंभ. आणखी दीड वर्षे जगला असता तर इथेच आज त्याच्या षष्ट्यब्दीपूर्तीचा जंगी कार्यक्रम झाला असता. आम्ही सारे गेलो. भाषण देताना अनेकांना भडभडून आले. सारे गाव जमा होऊन मूकपणे ऐकत राहिले. देवानंदची मुलगी प्राचीने धीर एकवटून त्याच्या काही कविता म्हटल्या. तोच धागा पकडून रेषाने आपली कविता सादर करून या गंभीरावस्थेला आणखी गडद केले. बबनच्या कवितेचा स्वर सारा भवताल गहिरा करून गेला. सुखदेवचा काळजाला भिडणारा अभंग. अशा वेळी सुखदेवला भरभरून व्यक्त होता येत नाही. मगरेंना सुद्धा पूर्ण कविता म्हणताच आली नाही. कविता म्हणायला कंठातून शब्द फुटायला हवेत! आणि शेवटी मी सर्वांना आवाहन केले,
“त्या माणसाने तुमच्या गावासाठी काय नाही केलं? तुमच्या मुलांची पायपीट थांबवली. त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा म्हणून कार्यक्रम भरवले. अडल्या नडल्यांना मदतीचा हात दिला. इथे शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण केले. तुमच्या गावाची दूरपर्यंत ओळख निर्माण केली. तुम्ही त्याच्यासाठी काय केले? काहीही नाही! त्याचा एक कविता संग्रह पडून आहे. त्याच्या हयातीत तो निघू शकला नाही याचे दुःख आहे. परंतु आता तो निघायला हवा. आम्हा मित्रांची इच्छा आहे की लोकवर्गणीतून तो निघावा. तुमचा आर्थिक सहभाग असेल तर आनंद आहे. नसेल तर आम्ही मित्र काढूच. पण तुम्ही त्या देवानंदसाठी काहीएक केले नाही याची नेहमीच खंत वाटेल.”
- झाले, श्रोत्यातून एक माणूस उभा राहिला.
- “माझे दहा हजार.”
- लोकांनी टाळ्या वाजवल्या. एकजण भारावल्यासारखा स्टेजवर चढला.
- “हे पुस्तक तुम्ही काढा. पैसै आम्ही देऊ. माझेही दहा हजार.”
- आणि समोरच्या गर्दीतून बोली लावावी तसा एकेक माणूस उभा रहात गेला. माझे पाच हजार. दोन हजार. एक हजार. मी गरीब आहे तरी पण माझे पाचशे रुपये.
- मी मनातल्या मनात बेरीज करीत गेलो. चाळीस हजार पुरेसे. त्याच्या वर आकडा जाऊ लागला तशी मी मनातली बेरीज थांबवली.
- “पुरे, एवढे पुरे. थांबा आता. शाळेशी संबंधित एका व्यक्तीने ही देणगी जमा करण्याची जबाबदारी घ्यावी.”
- भारावलेपणातच आम्ही परत निघालो. सगळ्यांच्या भावभावनांचे आकाश ओथंबून आलेले.
- यातूनच देवानंदच्या दुसऱ्या कविता संग्रहाची निर्मिती झाली.
- शीर्षक, फकीर आणि विजेता (जानेवारी २०१२). प्रकाशक, सुखदेवचे सर्वमंगल प्रकाशन.
- मुखपृष्ठ, देवानंदची मुलगी मृण्मयी आणि प्रस्तावना, राम देशमुख व मी.
- पुस्तक निघालं. प्रकाशन झालं. गणमान्य व्यक्तींपर्यंत पोचलं.
- आता पुढे काय ?
- आणि या प्रश्नातूनच पुढे पुरस्काराची मुहूर्तमेढ रोवली गेली.
- मातोश्री लक्ष्मीबाई मगरे प्रतिष्ठान, दर्यापूर.
- कवी देवानंद गोरडे काव्य पुरस्कार.
- (यंदाच्या पुरस्काराविषयी, पुढील लेख)
- -सुरेश आकोटकर,
- अमरावती
- ५ जून २०२२
- (साभार फेसबुक)