नारायणराव मुंद्रे यांचे जाणे दुःखद आहे. एक आदर्श शिक्षक , संस्कारी पिता आणि धम्मानुयायी अशी आपली ओळख आपल्या सादगीने त्यांनी समृद्ध केली. मीतभाषी कोणाच्याही अस्तित्वाचा स्वीकार करणे . ऐकून घेण्याची क्षमता फार थोड्या शिक्षकांना लाभते. आपले मुले आपण मोठ्या पदावर नेऊन पोहचवली याची दर्पोक्ती त्यांच्या स्वभावाला शिवली नाही. शुभ्र सदराआणि धोतर अशी निटनेटकी वेशभूषा. अनाग्रही व संतुष्ट व्यक्तीमत्व त्यांनी कमावले होते.
रविंद्र मुंद्रे यांची जडणघडण ज्या मुसीतून झाली तो पारदर्शीपणा स्पष्टपणा हे गुण त्यांच्या वडिलांचा वारसा आहे. मातीशी नाते जपून जगणे हे मातीच्या माणसाला मुश्किल होत चालले. तो संवाद आणि सौहार्द कसा टिकवून ठेवावा? हा कळीचा प्रश्न आहे. अशाही काळात व्यापक समाजहितास जाणीवेच्या केंद्रस्थानी ठेवणे भल्या भल्यांना जमत नाही.पण ही जाणीव आपल्या अवघ्या कुटुंबातील व्यक्तीच्या ठायी उतरवणे सोपे नसते. एक कुटुंबवत्सल काळजीवाहू कार्यकर्ताच ते करु शकतो.
एखादे मोठे ध्येय तुम्हाला साध्य नाही झाले तरी चालेल पण तुमचे ध्येय हे संकुचित नसावी. हा विचार त्यांनी अनन्यभावे अंगीकारला. मुलांना तीच दिशा दिली. ते जन्मभर नैतिकतेचे उपासक राहले. त्यांनी आपला माथा कुठेच झुकवला नाही. जे तत्व त्यांनी स्वीकारले ते त्यांनी जपले. त्यामुळे त्यांचा नैतिक प्रभाव होता. त्यांच्या पुढे जाण्याचे धाडस कोणी करत नव्हते. त्यांच्यात वात्सल्य नव्हते असे नाही पण शिस्तेचे ते भोक्ते होते. मुलांना त्यांच्या कलाने उमलू द्यावे.ते खरे उदारमतवादी होते. त्यामध्ये अत्तदीप होणे अनुस्यूत होते. स्वतःचा उजेड एक दिवस आपण स्वतः च व्हावे. कुठलेही अवलंबित्व दुःखदायीच! स्वतंत्रपणे उभे राहायचं. अस्मितेशी तडजोड करायची नाही.त्यांचे जगणे हेच सांगत राहील अजूनही.
धम्मचळवळीची धुरा खांद्यावर घेऊन ते चालत राहले. तनमनधनाने जीव ओतून त्यांनी ते काम केले. असे स्वतःच्या प्रतिमेच्या प्रेमात ते पडले नाही. लाभ प्रसिद्धी आणि सत्काराचे जग हे आभासी आहे , जे सतत आपणास ठकवते. त्यापासून दूर राहणे चिंतनगामी असणे ते त्यांना जमले होते. नारायण हे सूर्याचे एक नाव आहे. हे त्यांना ठावूक होते. कर्मानेच माणूस ते साध्य करतो. प्रज्ञासूर्याचे एक प्रकाशकिरण होता यावे ही उत्कट धडपड हजार सूर्य जन्मास घालते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षक व शिक्षकेतर मागासवर्गीय पतसंस्था, अमरावती व नागसेन ज्ञान प्रसारक मंडळ, अमरावती या दोन संस्था प्रस्थापित करित असताना रक्षित गुरुजींच्या पाठीशी समर्थपणे उभे राहिले. समाजास अर्थसंपन्न व ज्ञानसंपन्न करण्याचा तो प्रयोग त्यांनी केला. त्यानंतर त्रैलोक्य बौद्ध महासंघाची चळवळ धम्मशिबिरे आणि आपल्या बौद्ध असण्याचा अर्थशोध सुरू झाला. तत्व आणि आकलन याचा प्रवास सुरु झाला. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक चळवळीचा मेळ घालून बाबासाहेबांचे समाजाच्या नवनिर्माणाचे स्वप्न साकार व्हावे. असे त्यांना वाटायचे. पण काळाचे बदलते गतीशास्त्र कुठे नेत आहे ? याचा विचार सर्वानीच करणे आवश्यक आहे. त्यांनी कधीही हे कर. ते कर. म्हटले नाही. पण कोणीही नाव ठेवू नये असे वागावे. कार्य करत राहावे. नुसताच आव आणू नये. बाबासाहेबांच्या आभाळभर ऋणातून कसे उतराई होता येईल? वडिलांच्या आठवणी सांगत रविंद्र म्हणाले.
मोझरी गुरुकुंजात आपल्या निवृत्तीच्या काळात ते रमले. त्याच दरम्यान त्यांची भेट झाली.जाने, २००७ मध्ये. तेव्हापासून मग भेट नाही. त्यांची तीच प्रतिमा डोळ्यापुढे येते. त्यांचे आकस्मिक जाणे व्यथीत करते. वृद्धापकाळ जरी असला तरी ते हवे होते. त्यांची पोकळी ही कायम राहील. ती कशाने भरुन काढता येईल का? आठवणी तेवढ्या शिल्लक आहेत. सांप्रत काळात शिक्षणाचे क्षितीज धुसर होताना ते गहिवरले असतील.
आनिच्चावत संक्खारा….हेच परम सत्य स्वीकारावे लागते. जीवन मृत्यूचे द्वंद्व …मानव जात अनुभवत राहते. देह हा धूळीत मिळतो. परंतु व्यक्तीची जाणीव ,शब्द आणि कर्म हे चिरकाळ आपल्यातच टिकून असतात. हे अस्तित्वा पलिकडचे अस्तित्व असते. ज्याला स्थळकाळाच्या मर्यादा राहत नाही. त्यांच्या इहलोकीच्या समृद्ध सात्विक जगण्याला आभिवादन..! त्यांचे कुशलकम्माचे पुण्यानुमोदन..!
- सुभाष गडलिंग
- ९५४५२६५२७९
- किनवट जि.नांदेड