- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
नाशिक (प्रतिनिधी) : दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान, चेंबूर यांचे राज्य साहित्य पुरस्कार (२०२१-२२) नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. मराठी वाङ्मयक्षेत्रामध्ये हा पुरस्कार मानाचा समजला जातो. सर्व वाड्:मय प्रकारातील उत्कृष्ट साहित्यकृतीस हे पुरस्कार दिले जातात. सांडू प्रतिष्ठानच्या पुरस्कार प्राप्त साहित्यिकांमध्ये नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक, वक्ता, एकपात्री कलाकार डॉ. प्रतिभा जाधव यांच्या ‘अस्वस्थतेची डायरी’ ह्या बहुचर्चित वैचारिक लेखसंग्रहाचा समावेश आहे.
‘अस्वस्थतेची डायरी’ ह्या पुस्तकास २०२२ ह्या वर्षात मिळणारा हा सातवा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार आहे. संकीर्ण विभागात त्यांच्या पुस्तकास प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे असून नोव्हे. २०२२ मध्ये सदर पुरस्कार प्रदान सोहळा चेंबूर येथे संपन्न होणार आहे अशी माहिती संयोजक आनंद श्रीधर सांडू यांनी दिली आहे.
‘अस्वस्थतेची डायरी’ ह्या लेखसंग्रहास यापूर्वी अहमदपूर येथील महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्कार, नागपूर यथील पद्मगंधा प्रतिष्ठान पुरस्कार, नांदेड येथील प्रसाद बन पुरस्कार, अमरावती येथील पोटे पुरस्कार, मसाप दामाजीनगर, कळमनुरी येथील श्रीचक्रधर स्वामी साहित्य इ. नामांकित राज्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत. पुरस्कार्थी साहित्यिक डॉ.प्रतिभा जाधव सामाजिक अंगाने वर्तमानावर विचारप्रवृत्त करणारे परखड वैचारिक स्तंभलेखन विविध नामांकित वृत्तपत्रात नियमितपणे करत असतात. त्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र, मुक्त विद्यापीठातील कुसुमाग्रज अध्यासनाच्या सल्लागार समिती सदस्य आहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सदस्य आहेत. त्यांची ललित, नाट्य, काव्य, वैचारिक, समीक्षा या साहित्य प्रकारात आजवर आठ पुस्तके प्रकाशित असून त्यांच्या ‘संवाद श्वास माझा’ ह्या काव्यसंग्रहाची इंग्रजी व हिंदी भाषेतील अनुवादित पुस्तके दिल्ली येथील नामवंत प्रकाशन संस्थेने नुकतीच प्रकाशित केलेली आहेत.