- * कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला वेग
अमरावती : आरोग्य व विविध विभागांच्या समन्वयाने ‘मिशन मोड’वर कामे केल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची दैनंदिन आकडेवारी आता सुमारे 30 हजारांवर जाऊन ठेपली आहे. गत दोन आठवड्यात तीन लाखांहून अधिक पात्र व्यक्तींचे आरोग्य पथकांनी यशस्वी लसीकरण केले.
जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले होते. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आरोग्य विभागाबरोबरच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व विविध विभागांना सहभागी करून घेत लसीकरण मोहिम हाती घेतली. मान्यवर पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था यांचाही या मोहिमेत सहभाग मिळविण्यात आला. प्रशासनाकडून नियोजनबद्ध पद्धतीने मोहिम व्यापक करण्यात आली. त्यानुसार सुरुवातीला 10-12 हजारांपर्यंत होणा-या प्रतिदिन लसीकरणाचा आकडा आता 30 ते 35 हजारांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. दोन आठवड्यांत तीन लाखांहून अधिक व्यक्तींचे लसीकरण झाले आहे.
अनेक ठिकाणी घरोघर लसीकरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. एकही पात्र व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट आदेश पालकमंत्री श्रीमती ठाकूर, जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिलाभगिनी सर्व घटकांपर्यंत पोहोचून लसीकरण करण्यात येत आहे. मेळघाटातही भरीव जनजागृतीमुळे चांगला प्रतिसाद मिळत आहे. आरोग्य पथके पाड्यापाड्यांवर पोहोचून लसीकरण करत आहेत.
—–