- “काळ्या अंधाराला आता तुडवत गेलो
- दुःखालाही मी सोन्याने मढवत गेलो !”
आयुष्यातील अंधार पायदळी तुडवून, दुःखाला सोन्याने मढवित जाणारा मु.पो.शृंगारतळी, त.गुहागर,जि.रत्नागिरी येथील दिलदार,जिगरबाज गझलकार, कवी, कादंबरीकार प्रा.डाँ.बाळासाहेब लबडे यांचा ‘एक कैफियत’ हा पहिलाच गझलसंग्रह ,महाजन पब्लिकेशन हाऊस, पुणे यांनी प्रकाशीत केला आहे. यात छोट्या बहरपासून मोठ्या बहरातील एकूण 87 गझलांचा समावेश आहे. याची प्रस्तावना प्रख्यात जेष्ठ गझलकार ए.के.शेख, पनवेल यांनी लिहीली आहे. ते डाँ.लबडे यांचे गझलेविषयी व्यक्त होताना म्हणतात…” साहित्यकृतीतील ताल-तोल, लय, प्रतिमा, भाषा त्यांच्या व्यासंगावर अवलंबून असतो. लबडेसरांचं मन कलासक्त आहे. त्यांच्या गझलेची भाषा,आशय, सामान्य सर्वसामान्य माणसाच्या अंतर्मनाचा ठाव घेणारा आहे. आपल्या अनुभवाचे, विचारांचे,भावनांचे, प्रतिमांचे शब्दसिद्धीचे, स्वरसंहितेचे सर्व संचित सरांनी गझलेसाठी खुले केले आहे. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधीत्व त्यांची गझल करते.”
ए.के.शेख सरांनी लबडे यांच्या गझलेविषयीची आपली भूमीका अगदी तंतोतंत वास्तवाची मांडलेली आहे. तसेच पाठराखण करताना प्राचार्य डाँ.अविनाश सांगोलेकर म्हणतात…” कैफियत मांडताना त्यांनी ती टोकदार भाषेतनं मांडली आहे.ही गझल उपरोध,उपहास,मिश्किलपणा, सडेतोडपणा ह्यांनी युक्त असून नवा ढंग आणि नाविन्यपूर्ण अविष्कार करत तिनं गझलकाराच्या अंतरीची सल/ फिर्याद अनेकविध वृत्तातून मांडली आहे. मानवी जीवनाच्या अनेकविध पैलूंना आपल्या कवेत घेताना ती सर्व नव्या परिवर्तनवादी , सामाजीक बांधीलकीच्या,सर्जनात्मक, जाणिवांना प्रतिमा, प्रतीक, रूपक ह्यांच्या माध्यमातून मांडते. तिचा अधिक भाव हा वास्तवादी आहे.” हे सांगोलेकर सरांचे निरीक्षणही अगदी यथोचित आहे.
डाँ. लबडे यांचे यापुर्वी ‘महाद्वार’ आणि ‘ मुंबई..बंबई..बाँम्बे’ हे दोन कवितासंग्रह व ‘पिपिलिका मुक्तिधाम’ ही बहुचर्चीत कादंबरी त्यांच्या नावावर आहे. गझलकार गझलेविषयी बोलताना म्हणतात…” गझलेची छंदोबद्धता आणि तिचा आकृतिबंध तिला ‘वाह!’ म्हणावयास भाग पाडतो. तिचा राबताच तसा असतो. सुट्या शेरातील हे सौंदर्य,नजाकत,आपणाला भुरळ पाडते. तिची गझलीयत देशांच्या सीमा पार करून जाते. तिचे सादरीकरण ही अनोखी ठसठसीत बाब आहे.” गझलकारांचे हे गझलेविषयीचे मत अगदी बरोबर आहे. या तिच्या गुणांमुळे वाचक, कवी, लेखक तिचेकडे आकर्षीत होताना दिसतात. परंतु गझलकार तिला कसा आकार देतात, कसं अलंकृत करतात ? यावरही तिची वाहवा ! अवलंबून असते.
गझलकार लबडे आपल्या गझलेत समाजातील वास्तव मांडण्याची भूमीका घेताना दिसतात. सर्वसामान्य माणसाचं जगणं एक कैफियतच्या निमित्ताने मांडताना दिसतात. माणसं तेवढ्या प्रवृत्तीनुसार प्रत्येकच माणूस आपणास आंतर्बाह्य ओळखता येतोच असे नाही . त्यासाठी आपल्याला त्याचे अंतरंग जाणून घ्यावे लागेल. त्याची व्यथा समजून घ्यावी लागेल. याविषयीची भूमीका विशद करताना त्यांच्या गझलेतील मतला आणि शेर मला बोलका वाटतो.
- “वरवर जशी खरी नसतात माणसे
- जर खोदली भुते असतात माणसे
- मी बोलतो खरे व्यथाच मांडतो
- अफवेस का तरी फसतात माणसे ?”
- (‘माणसे’ पृष्ठ क्र.16)
काही लेखक, कवी, गझलकार हे समाजातील वास्तव रेखाटत असतात. ते चांगल्या,वाईट गोष्टींवर आपली भूमीका स्पष्ट करीत असतात. हे त्यांचं व्यक्त होणं म्हणजे सजगतेचं लक्षण आहे. या त्यांच्या भूमीकेचं मूल्यमापन समाजमन करीत असतं. कवी, लेखकांच्या सर्जनशील मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. ते व्हायलाही पाहिजेत. ज्या मनात हे प्रश्न निर्माण होत असतात ते मन म्हणजेच त्याची भूमीका असते. प्रत्येक लेखक, कवी आपापली भूमीका जगत असतो. ही भूमीका जगताना त्याने कोणत्याही परिस्थितीला शरण न जाता, ती जपली पाहिजे. आणि लबडे आपली भूमीका जपताना दिसतात. ही बाब त्यांच्या लेखनासाठी कौतुकास्पद ठरेल. गझलकार शेतक-यांची वास्तव परिस्थिती अधोरेखीत करताना,व्यवस्थेला इशारा देत आपली भूमीका स्पष्ट करताना दिसतात.
- “सावधानी बाळगा रे शेकताना
- ना फुकट देणार आता जाळ आम्ही
- सांगणे थोडे कडू वाटे मनाला
- हाणतो माथ्यावरी नाठाळ आम्ही”
- (‘आम्ही’ पृष्ठ क्र.21)
- किंवा
- “शोषुणी ते रक्त मालामाल झाले
- माणसांचे रक्त का बेजार झाले ?”
- (‘गार आहे’ पृष्ठ क्र.23)
आपल्या कृषीप्रधान देशामध्ये, पंशींद्याचेच हाल होताना आपण बघतो. विविध संकटाने त्याची शेती नेहमीच तोट्यात जाते. कष्टक-यालाच दोन वेळचे पुरेशे जेवन मिळत नाही. दलाली, भांडवलदारी व्यवस्था त्याला लुटून स्वतः मालामाल होत आहेत. कष्टक-यांच्या मनातील सल शब्दबद्ध करण्याची गझलेची ही भूमीका मला योग्य दिशेने जाणारी वाटते. सामाजीक जाणीवेतून गझलकारानी घेतलेलं व्रत मला अभिनंदनीय वाटतं. आम्ही समाजाचं देणं लागतो, ही जाणीव बाळगणं, कृतज्ञपनाचा भाव जपणं, हे लक्षण मी माणुसपणाचं समजतो.
लबडे यांची शब्दयोजनशैली ताकदीची आहे. त्यांच्या सर्वच रचना आशयघन आहेत. त्यांची गझल नवपरिवर्तनवाद मांडताना दिसते. तसेच ती मानवी जीवनमुल्यांचा उद्घोष करतानाही दिसते.
- “एवढा रक्तात माझ्या स्फोट व्हावा
- प्रेम देण्या बंधुता प्रस्फोट व्हावा
- वाढता अंधार पाहिला म्हणालो
- तू उजेडीचा जगी गडकोट व्हावा !
- (‘व्हावा’ पृष्ठ क्र.24)
- किंवा
- “बाकी काही नाही एकच करतो आहे
- माणुसकीचा देव्हारा मी भरतो आहे !”
- (‘फुलण्याचे मज वेड’ पृष्ठ 27)
संवैधानीक मूल्यांचा विचार मांडणे म्हणजे उजेडप्रवाही विचार जोपासण्यासारखंच आहे. समता,स्वातंत्र्य बंधुता,न्याय ही मूल्ये माणुसकी जपणारी मूल्ये आहेत.जगा व जगू द्या, ही भावना समाजमनात रुजविण्याकरीता जेव्हा गझल पुढे सरसावते तेव्हा लोकशाहीला पोषक माणुसकीचा विचार जपत असते. हा गझलकाराच्या अभिव्यक्तीचा एक भाग आहे, ही कृतार्थपणाची भावना, हा जिगरबाजपणा मनाला भावतो. गझलकार स्वतःच्या बाबतीतील काही आकलनही मांडताना दिसतात.
- “मनाजोगे काल घडले नाही
- तरी माझे आज अडले नाही
- मिरवली दुःखे कडेवर माझ्या
- सुखांनी मजला निवडले नाही !”
सुख-दुःख ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. ऊन-पावसाचा खेळ आयुष्यात सुरूच असतो. त्यापासून कुणीही सुटणार नाही. परंतु सुख आले की, हुरळून जाऊ नये आणि दुःख आले तर कोमेजून न जाता दोघांचेही सहर्ष स्वागत करून, डोई, खांद्यावर, कडेवर त्यांची पालखी वाहून आयुष्याची वारी करायला ज्याला जमतं, तोच माणूस जीवनात यशस्वी होतो. गझलकार हे तंत्र सहजरीत्या हाताळताना दिसतात. तसेच समाजकारण, अर्थकारण,राजकारण यावर आपली भूमीका मांडतानाही दिसतात. माणूस समाजशील प्राणी आहे. तो समाजाशिवाय जगू शकत नाही. तसेच कुणावर अन्याय होत असेल तर तोही त्याला खपत नाही. हे डोळसपणाचं आणि जीवंतपणाचं लक्षण आहे.
- “लोकसेवा काम करतो व्यर्थ त्याचा जन्म म्हणतो
- स्वप्न विकतो भाषणांनी लोकनेता तो शहाणा
- थांबले रांगेत मेले ते कधीचे ब्लँक होते
- आमच्यासाठीच होता नोटबंदीचा कुटाणा !”
- (‘माणसांना’ पृष्ठ 35)
आपण सर्वच प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष व्यवस्थेचा भाग असतो. तरीही समाजात घडणा-या अनुचित घटनांचं समर्थन न करता, त्याविरोधात एल्गार पुकारनं,हा या गझलेचा मला स्थायी भाव वाटतो. संविधानाने सर्वांना समान अधिकार बहाल केले आहे. व्यवस्थेमध्ये जर कुणी कुणाच्या अधिकाराचं हनन करीत असेल तर त्यावर व्यक्त होणं, म्हणजे जागल्याची भूमीका पार पाडणं होय. राजकारणात राहून समाजसेवेच्या नावाखाली घेतलेले सर्वच निर्णय जनतेच्या हिताचेच असतात असेही नाही. जागृक नागरीकाने चुकीच्या निर्णयाचं समर्थन न करता त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदविणे म्हणजे आपले हक्क अबाधित राखण्यासाठी केलेली डोळस धडपड ठरू शकते . व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतात. सर्वच लोक समविचारी नसतात. प्रत्येकजन एकमेकांकडे बोट दाखवित, मी कसा शहाणा ? हे दाखविण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. हा मानवी स्वभाव म्हणावा लागेल. यावर गझलकार मार्मीक भाष्य करताना दिसतात.
- “वरवरी हो शांत माझे वागणे अन्
- अंतरी या माजलेले रान आहे
- हा निराळा तो निराळा बावळा जर
- मी कुठे तर सद्गुणांची खाण आहे ?”
- (‘माणसांना’ पृष्ठ क्र.47)
येथे अशा वैचारीक प्रवृत्तीला उपरोधीकपणे गझलकार टोला लगावताना दिसतात. अनेक रचनांमधून गझलकार उपरोधीक, उपहासात्मक, सडेतोडपणे, आपलं मत व्यक्त करतात. मानवी स्वभावाच्या विविध पैलूंचं दर्शन ही गझल वाचकांना घडवताना दिसते. लबडे यांच्या या पुस्तकात दोन गझला ‘पावसाळा’ रदीफ़ वापरून, दोन गझला ‘झुरळ’ रदीफ़ वापरून व दोन गझला ‘माझ्या मना’ रदीफ़ वापरून आलेल्या आहेत. रंजल्याच्या कातडीला, उजेडाचा गडकोट, माणुसकीचा देव्हारा, हिरवा ऋतू, दुःखे कडेवर, वा-याचा झोका चाखितो, तालावर नांदतो, सुगंधी घाव, अशा अनेक प्रतिमांनी लबडे यांची गझल अलंकृत व समृद्ध होत गेलेली आपणास दिसते.अनेक रुपकं आणि प्रतीकांचाही मोठ्या खुबीने वापर केलेला दिसतो. गझलकार हे मराठी भाषेचे जाणकार आहेत. त्यांना शब्दांना फिरविण्याची कला अवगत आहे. आशयघनता त्यांच्या रचनेचा स्थाईभाव आहे. काही रचनांमध्ये गझलकारांनी पलके पलके, छमके छमके, हलके -हलके, झलके- झलके, जलके जलके, ढलके ढलके, सोपे सोपे, झुरळे झुरळे, अशा शब्दांचा पुनर्वापर करून, नव प्रयोग केलेला आढळून येतो. अलिकडे खाजगीकरणामुळे तरुणाईवर बेकारीचे मोठे सावट आच्छादित झालेले दिसते. यावर उपहासात्मकपणे टिप्पणी करताना, गझलकार ‘कोणा पुढेही’ या गझलेत सांप्रतस्थितीचं वास्तव मांडताना दिसतात.
- “कोणापुढेही लाचार होतो
- कोणी तसाही बेकार होतो
- माळून पदव्या आम्ही जगावे
- ज्ञानी असा हा भंगार होतो !”
- (‘कोणा पुढेही’ पृष्ठ 49)
“शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे, जो ते प्राषण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही”. असं बाबासाहेबांनी म्हटलं आहे.ते खरं आहे.शिकलेल्या लोकांना संधी मिळाली तर ते देश हिताच्या दृष्टीने संधीचं सोनं करू शकतील. पण देशात वाढत चाललेल्या बेकारीला आळा बसत नसल्याने तरुण पिढी सध्या संभ्रमावस्थेत आहे . नेमके का ,कशासाठी व कोणते शिक्षण घ्यायचे ? हा प्रश्न सद्या विद्यार्थी आणि पालकांच्या डोक्याला ताप देणारा ठरताना दिसतो. कारण सद्यातरी शिक्षण म्हणजे नोकरी, असे समीकरण झाल्याने व नोकरी मिळत नसल्याने शिकायचे कशाला ? असाही विचार तरुणाईच्या मनात रुंजी घालताना दिसतोय. पण शिक्षणाची परिभाषा ही नोकरीपुरती मर्यादित न ठेवता, ते आपलं जीवनमान सुधारण्यास्तव, कला- कौशल्य अवगत होण्यास्तव, हक्काची जाणीव होण्यास्तव उपयोगाचं ठरू शकतं. हा सकारात्मक दृष्टीकोण गझल देताना दिसते. लबडे यांच्या गझला लयबद्ध आहेत, साध्या, सहज स्वभावाच्या दिसत असल्या तरी गर्भीत आशयाच्या आहेत. त्या समाजमनाची ठणक स्पष्ट शब्दात अधोरेखीत करताना दिसतात. तिचं धोरण गुळमुळीत नसून स्पष्ट आहे. तीच्यात साचलेपणा नसून प्रवाही आहे. तिच्यात जनमनाचं प्रतिबिंब अंकीत होताना आपणास दिसतं. त्यांची गझल म्हणजे वैचारीक परिपक्वता व उजेडप्रवाहीत असलेली अभिव्यक्ती आहे.
- “तोडतो माणूस का माणसापासून तू
- धर्म जो मोठा तणाएवढा मज वाटतो
- (मज वाटतो’ पृष्ठ 98)
- किंवा
- दंगलींनी पोसल्या त्या खूप जाती रोज इथल्या
- भेकडांनो त्या पुरूनी रोज उरते ना भिमाई”
भारत हे धर्मनिरपेक्ष तत्व अंगीकारलेलं लोकशाही (गणराज्य) राष्ट्र आहे. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा अधिकार आहे. विविध राज्यांनी बणलेल्या देशाची एकात्मता अबाधित राखण्याची संविधानकर्त्यांनी पुरेपर घेतलेली काळजी, नियमबाह्य कृतींना संविधानाने लावलेला अंकूश. ह्या बाबी यशस्वी लोकशाहीचं मोठं उदाहरण आहेत. संविधानापेक्षा या देशात कुणीही मोठं नाही. या दृष्टीने मला हा मतला महत्वाचा वाटतो.
- “मी उद्याच्या जगाचे, पाहतो स्वप्न आहे
- खूप नांदेल समता, माळतो स्वप्न आहे !”
- (‘स्वप्न आहे ‘ पृष्ठ 58)
प्रत्येकानेच समतेचं स्वप्न उराशी बाळगलं तर भेदभाव निर्माण होणार नाही. प्रत्येकाने माणूस म्हणून जगलं पाहिजे. शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय असतं ? एका शून्यापासून तर दुस-या शून्यापर्यंतचा प्रवास असतो आयुष्य. कुणीही काहीही सोबत घेऊन जाऊ शकत नाही. येतो तसाच जातो. तेव्हा आयुष्यातून अहंकार,लोभ वजा करता आला तर सकलांचे जगणे सुकर होईल.
- “दुस-याच्या मरणापायी हळहळतो आम्ही
- सुख पाहूनी दुस-याचे जळफळतो आम्ही !”
- (‘आम्ही ‘ पृष्ठ क्र. 64)
हे मानवी जीवनातील गुपीत लबडे यांची गझल उपहासात्मक पद्धतीने मांडते. तिचा स्वभाव केवळ दोष दाखविणेच नाही तर मानवाला सजग करण्याचा आहे. ती अंधश्रद्धा, भोंदूगिरीवरही बोट ठेवताना दिसते. तसेच भ्रष्टाचारीवृत्ती, बोलघेवडेपणा व दोगलेपणाच्या प्रवृत्तीचाही समाचार गझलकार घेतात. तद्वतच त्यांच्या मनाचा निर्मळपणाही वाचकांना जाणवल्याखेरीज राहत नाही.
- “मी कुणाला नाडले नाही,मी कुणाला पाडले नाही
- मी असा हा मोकळा आहे,मी मलाही गाडले नाही
- माणसे जी आपली होती,दूर गेली जायची होती
- आठवांच्या त्या सलांनाही,मी रितेही धाडले नाही !”
- (‘पाडले नाही’ पृष्ठ क्र.89)
- गझलेचा हा मोकळेपणा यातून व्यक्त होतो.
- कुठलाही आडपडदा ठेवलेला दिसत नाही.
आतलं-बाहेरचं हा या गझलेचा स्वभाव नाही. जेव्हा एखादा माणूस स्पष्टपणाची भूमीका घेतो तेव्हा, ज्याला ती पटते तो सोबत राहतो, ज्यांना ती पटणार नाही तो आपली वेगळी वाट चोखाळेल. याची खंत बाळगायचं काहीच कारण नाही. हा परखडपणा मनाला भावणारा आहे.
- “मी किती करणार हो एकटा एल्गार हा?
- जन्म सारा आजही तोकडा मज वाटतो !”
गझलकार ‘एक कैफियत’ मांडताना बरंच काही सांगून जातात. स्वातंत्र्य लढा हा सार्वजनीकरीत्या लढला गेला. त्यानंतरच तो यशस्वी झाला. एका काठीपेक्षा काठीचा गठ्ठा अधिक महत्वाचा ठरतो. म्हणून परिवर्तनाची ही चळवळ सर्वसमावेशक व्हायला पाहिजे. हा एकतेचा, बंधुतेचा विचार लबडे यांची गझल मांडते. जेव्हा कोणतेही काम एकट्याने सहज शक्य होत नाही तेव्हा सकलांनी हातात हात घालून क्रांतीच्या वाटेवरचा प्रवाशी व्हायचा विचार योग्य वाटतो. हे गझलकारांचं मत अगदी रास्त ठरते. संविधान आणि लोकशाही टिकवायची असेल, शोषणमुक्त समाज व भेदाभेदविरहीत विज्ञानयुक्त विचारांचा नवसमाज घडवायचा असेल, तर प्रत्येकाने मनावर घेतले पाहिजे. हा एकसंघतेचा विचार देत ही गझल नवविचाराची पेरणी करू इच्छिते. या नवविचारच मला तिचं बलस्थान वाटतं. काही गझलांमध्ये संत तुकाराम महाराजांच्या जीवनकार्याचाही उल्लेख आला आहे . कारण त्यावेळी त्यांनी आपल्या अभंगातून परिवर्तनवाद पेरून समाजाला जागविण्याचं क्रांतीकारी कार्य केलं आहे. गझलकार स्वतःच्या व्यथा,वेदना, दुःखाचं भांडवल न करता लढाऊ बाणा गझलेत रुजवितात. गझलेतील आशावाद, सकारात्मक भाव मला लबडेंच्या गझलेचा पाया वाटतो. या झंझावाताबद्दल गझलकार प्रा. डाँ. बाळासाहेब लबडे यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक सदिच्छा देऊन येथेच थांबतो.
- -अरुण हरिभाऊ विघ्ने
- मु.पो.रोहणा,त. आर्वी
- जि.वर्धा 442302
- ◾️गझलसंग्रहाचे नाव: ‘एक कैफियत’
- ◾️गझलकार : प्रा.डाँ.बाळासाहेब लबडे
- ◾️प्रकाशन :महाजन पब्लिशिंग हाऊस,पुणे
- ◾️प्रस्तावना: ए.के.शेख, पनवेल
- ◾️मुखपृष्ठ : संतोष धोंगडे
- ◾️पृष्ठसंख्या : 104
- ◾️मूल्य : 210/-₹
- ◾️मो.9145473378