गनीम : शत्रूच्या छावण्या उध्वस्त करणारी कविता…

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    उत्तम अंभोरे हे एक संवेदनशील कवी आहेत. त्यांच्या सुक्ष्मतासुक्ष्म सेंद्रिय विचार प्रगल्भतेतून काव्याचा सुजन झरा वाहतो आहे. हा झरा फक्त शीतलतेची चांदणे देत नाही. तर क्रांतीचे नवे विद्रोही गीत गात आहे. त्यांची कविता समकालीन वर्तमानाचे आक्रंदन मानणारी आहे . त्यांचा गनीम हा कवितासंग्रह नुकताच वाचण्यात आला. माझे मित्र दीपक कुमार खोब्रागडे यांनी हा ग्रंथ मला भेट दिलेला आहे. गनीम कवितासंग्रहातील भाषा ही अत्यंत साधी , सोपी, सरळ व आंतरिक मनाला छेद देणारी आहे. बनावटीचे सारे क्षेत्र उध्वस्त करून आपला खरा मित्र कोण व खरा शत्रू कोण याची ओळख करून देणारा हा कवितासंग्रह आहे.

    गनिम म्हणजे मानवमुक्तीच्या लढायाला खोडा घालणाऱ्या प्रवृत्ती होत. असे मत अर्जुन डांगळे यांनी यांनी मांडले आहे. पण मला गनीम म्हणजे अदृश्यजंताचा विकृत चेहरा होय असे वाटते .तर आपल्या सोबत राहून आपलाच पाडाव करणारा हा गनीम म्हणजेच लोकशाही व्यवस्थेला गड्यात घालून पुरोणोक्त व्यवस्थेला खतपाणी घालणारा अदृश्यजंत आहे.

    गनीम कवितासंग्रहात एकूण शंभर कविता आहेत. काही दीर्घवती तर काही मध्यवती कविता आहेत. कवीने ज्या अंगाने समाजातील घटनांचा परामर्श घेतला आहे तो अत्यंत क्रांती दर्शी आहे. आपले व दुसरे हे न पाहता खरे वास्तव मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. दोबल्या नीतीचा त्यांनी निषेध केला आहे. विविध प्रतिमा व प्रतीकांच्या माध्यमातून सत्य स्वरूप मांडले आहे. फक्त शब्दजंजाळ व गूढरम्य या शब्द जाणीवाच्या भानगडीत न पडता व्यवहारातील शब्दाच्या आधारेच आपले चिंतन मांडलेले आहे. त्यांची कविता नव्या निरपेक्ष समाजाची निर्मिती करणारी वाटते.कविता ही एक उर्जादायी क्रांती आहे. काही समीक्षक कवितेने जीवनात बदल घडवला नाही अशी उपरोधात्मक टीका करतात .पण कवितेने जनमानसाला प्रभावित केले आहे .प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन कवितेत मानवी मनाला सदोदीत जिवंत ठेवले आहे .पण यातही एक भेद आहे जी कविता मानवमुक्तीची लढाई लढत आहे तिच कविता चिरकाल टिकणारी आहे .मुसिमुसित, डौलदार ,मनोरंजनात्मक ,नाजूक कोमलकांती ,विनोदी ,शृंगारिक हे काव्य क्षणिक असते.

    कवी उत्तम अंभोरे यांची कविता मानवमुक्तीची लढाई लढणारी असल्याने या कवितेला मृत्यू नाही. आंबेडकरवादी कविता मुळातच प्रेरणादायी व प्रकाशगर्भी आहे .म्हणून कवीने अधोरेखित करताना जी खंत बाळगली ती एका दृष्टीने बरोबर असली. तरी आपण हताश होऊ नये. काळाच्या चक्रीवादळात अनेक घटना घडत असतात. आपण लढणे सोडता कामा नये. मूलतत्त्ववादी कितीही मुजोरी करत तरी बुद्धाची क्रांतीध्वज कधीही सोडायचा नाही. आपण नक्कीच जिंकू हा आशावाद आपल्या पिढीला कवीने द्यावा असे मला वाटते.

    गनीम हा कवितासंग्रह चांदण्याच्या शितलतेची सावली प्रदान करत नाही. तर सूर्यकंकनाची ज्वाला मनी रुजवत आहे. शब्दात हा कवि अंगार झाला आहे. शत्रूचा अचूक वेध घेण्याची त्याची कसब नक्कीच क्रांतिकारी आहे. ते कविता अपरिहार्यतेच्या यामध्ये लिहितात की, आपण गर्क भूतकाळातील संघर्षाचे अर्क काढून काढून चढवण्यात नि शत्रु आपल्याच घोषणेसह आपल्या अंकुरांनाही उध्वस्त करीत जातो पुढे पुढे

    आगेकूच करण्या अगोदर
    वेळीच सावध व्हायला हवं
    शत्रू शुगरकोटेड असतो नि
    नेहमीत आपली फसगत होते …..
    पृ क्र २६
    या कवितेतून आपली होणारी फसगत उलगडून दाखवलेली आहे.

    कवी हा समाजाला नवविचार प्रधान करणारा कलाकार असतो. कविता साधी असो की तत्त्वज्ञानी ती मानवी मनाचा वेध घेणारी असवी. कवी आणि कविता ही एक भावजीवन असते. पूर्णांगयुक्त असे मिश्रण असते. समागमी द्रावणातील द्रव्यकण जसे संश्लिष्ट करता येत नाही. तसेच कवीला कवितेपासून वजा करता येत नाही. कवी आणि कविताचे नाते अतूट असते. कवीचे जीवन अखंड दुःखमय असते. कवितासंग्रह काढल्यावर त्याला जी मदत करावी लागते .ती मदत मिळत नाही.त्याचे सत्यकथन बिनव्याजी या कवितेतून मांडलेले आहे.

    तो बनेल नावाडी नि
    एकमेकातील दोघेही एकमेकांच्या
    हाका
    कवी वाटत जातो संग्रह सपासप निर्विकार…

    आज फुकट खाण्याची पद्धत वाढत चाललेली आहे. त्याचप्रमाणे कवी किंवा लेखक पुस्तक काढतात तेव्हा काही माणसे हे पुस्तक फुकटात मिळेल त्यांची वाट पाहत असतात. ज्या व्यक्तीकडे ग्रंथ घेण्याची ऐपत असते तरी पण ते लेखक आणि कवीला त्यांचा मोबदला देत नाही. कवी हा आपल्या शब्दातून समाजाला नवे जीवनमुल्ये देत असतो. यासाठी कवींनी आपले जीवन संघर्षमय केले असते म्हणून त्यांनी काढलेल्या कवितासंग्रहाला आपण सन्मानाने केली पाहिजे.

    देशातील आजचे वातावरण नक्कीच भयग्रस्त विरोधाभासाचे आहे. पुराण गढ्यांना उखडून आपला इतिहास पाहण्याच्या नादात सारीकडे बुद्धच दिसतो. कारण भारताच्या कणाकणात बुद्धच पेरला आहे. तो त्यांच्या पूर्वजांनाही मिटवत आला नाही. पुढेही मिटवता येणार नाही. कारण सत्य हे निखळ सत्य असते. चाटूगिरी करणाऱ्याच्या गांडीवर हंटर बसल्याशिवाय ते वठणीवर येणार नाही .म्हणून कवी तथागत या कवितेत लिहितात की,

    तू असतोस
    काजळी झटकून
    माती उजळणारा
    तू परंपरा मोडून
    नवी पायवाट
    मानवी हृदयापासून माणसा माणसा पर्यंत
    जाण्याचं सांगणारा,
    म्हणूनच
    शांतीच्या गाथेतच
    क्रांतिगीत पेरीत जाणारा
    अंधार यात्रेच्या प्रवाशांना
    प्रकाशवाट दाखवणारा
    बुद्धा…
    पृ क्र १९१

    देशातील समाजव्यवस्थेला समरसतेच्या नावाखाली विकृत केले जात आहे. संविधानातील समता ही मूल्य संकल्पना नाकारून समरसता ही संकल्पना आज रुढ होत आहे. आणि आमची षंडयुक्त माणसे समरसतेच्या पायावर मस्तक ठेवत आहेत. त्यांच्या छावण्या मजबूत करत आहेत. पण हा कवी समरसतेचे सारे बॅरिकेट्स उध्वस्त करीत आहे. त्यांचा दांभिक समरसतेचा चेहरा उघड करत आहे. ही या कविची जमेची बाजू आहे.

    समरसता एक निमित्त
    बाकी तेच ते
    पुराणसुक्त ….!

    अतिशय मार्मिक व सत्यनिष्ठ कविता आहे .देशातील भारतरत्न हा पुरस्कार चिल्लर झाला आहे. ज्यांनी काही केले नाही त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे .महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हा मरणोत्तर पुरस्कार दिला आहे. पण या पुरस्काराचे गांभीर्य आज कमी होत आहे .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न च्या यादीत समाविष्ट करून त्यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न होतो का हा प्रश्न मला पडला आहे. तसेच आज महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा अशा प्रकारचे आंदोलन केली जात आहे. पण मला सांगा या महामानवांना भारतरत्न या पुरस्काराने गौरविले म्हणजेच त्यांचे मोठेपण सिद्ध होईल काय.? त्यांचे कार्य आहे महान आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.म्हणून कवी व लेखकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न उपाधी न लावता क्रांतीसुर्य किंवा विश्वरत्न अशीच उपाधी लिहावी .कारण भारतरत्न या पदवीतून त्यांना आपण मर्यादित करीत जातो असे मला वाटते. हाच धागा पकडून अत्यंत सत्यान्वये जाणिवांची कविता लिहिली आहे. रिॲक्शनची कविता : भारतरत्न यामध्ये ते लिहितात की,

    तसं त्याचं हे गणित नवं नाही बुद्धालाही त्यांनी असंच
    अवतार चक्राचं लेबल दिलं तुकारामाचं गोलमटोल अध्यात्मिकिकरण
    राजा शिवाजीचं ही गो ब्राह्मण प्रतिपालकतत्व
    नि
    भारतरत्न
    यात तसा
    थोड्याफार फरकानेही फरक वाटत नाही.
    त्यांचे मोठेपण बहाल करण्याची पद्धतच
    आता पटत नाही….!

    आज देशातील आंबेडकरी समाजाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दैवतीकरण सुरू केले आहे .जयंतीला ढोल-ताशात नाचून आपण खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवणार आहोत का ..?आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला विचार/ संदेश आपण विसरत तर चाललो नाही ना..! त्यांच्या डावपेचात आपण फसत चाललो तर नाही ना …! ते जसे करतात तशी नक्कल आपण करत आहोत का..? हे आपण समजून घेतले पाहिजे. या कवितासंग्रहाने एक सचेत संदेश देण्याचे काम केलेले आहे. आपला शत्रू घरभेदी होतांना त्याला आपण जवळ करत आहोत हेच आपल्या नुकसानीला कारणीभूत आहे. अशा गनिमांच्या फौजेवर सम्येक विद्रोहाची अग्निज्वाला पेरून उध्वस्त केले पाहिजेत ….बेकीवर मात ही कविता एकाच चिंतनगर्भी भूमिका पटवून देते.

    हे रमत-गमत
    स्वदेशी तालावर
    सारे जहाॅसे अच्छा
    सारे सारे गोल गोल म्हणू लागला
    झिंगा पिंगा पोझेस
    पॉकेट फुल ऑफ पोझेस
    हशा बुशा
    वुई ऑल फॉल डाउन…..
    तर ओझोन लेअर या कवितेत कवी लिहितात की,
    आपला बाप सबंध बुद्धिभेदी वलयांना
    अवतारचक्रांना भेदून फक्त माणूस होता
    हाडारक्तमासासह तो होत उभा होता हे वास्तव
    म्हणूनच बाबासाहेब,
    तुमचं असं कधी कधी नाडीपरीक्षा एवढं नाजूक
    तर कधी
    ज्वालामुखीसारखं विस्फोटक
    तुम्ही एक जगण्याचा आधार
    तुम्ही साधार स्वर असण्या -नसण्याचा..

    आज आपली लढाई पारंपारिक अवजाराने लढता येणार नाही. यासाठी आपण नवे शस्त्र धारण केले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड करून त्यांच्यावर मात केली पाहिजे. पण आमचे काही बुद्धिवादी स्वतःला श्रेष्ठ समजतात. कपाट बंद करून ठेवलेल्या पुस्तकाला वाळवी लागते. पण डोक्यात पुस्तकातील एकही शब्द जात नाही. कवीने मान या कवितेत पुस्तकाच्या महत्त्व सांगितलेले आहे. ते लिहितात की,

    नुसते विचार वाचून वाचून
    ते क्रांती करीत नसतात
    पुस्तकातले घोडे कधी
    युद्ध खेळत नसतात
    माणसे माती होतात
    मस्तकही मातीचीच असतात
    पुस्तक तर नाशिवंत कागदाची
    ती फडफडवताना पानं विजय झेंड्याची तेव्हा
    पुस्तक वाचून माणूस गती घेतात…..

    ही कविता अत्यंत विचार वेधक आणि विचार जाणिवेने युक्त आहे. अकलेच्या चड्डीत बक्कल तुटलेल्या बुद्धिवादी ही मानवी नात्याचे विविध पदर समजावून देणारे कविता आहे. नीतीमानाने वागणारी माणसे जेव्हा अनीतिमान वागतात तेव्हा बुद्धिवादी नसतात.पण ते स्वतःला बुद्धिवादी म्हणतात. ते ह्या कवितेत म्हणतात की,

    या आत्मतुष्ट
    स्वबलिष्ठ
    होऊ पाहणाऱ्या बुद्धिवाद्याचे दाखले गावोगावी
    गिरीडोंगरी
    पांदनवाट ते चंदणघाट
    व्हाया
    राजघाटापर्यंत
    सगळीकडे आबादीआबाद
    निखालस बर्बादी
    वारे वारे बुद्धीवादी …

    या कवितासंग्रहातील बऱ्याच कविता नवा आकृतीबंधाने प्रकटझाल्या आहेत. विषयांच्या व आशयाच्या अनुषंगाने उत्कट भावनेच्या विद्रोही बाणा घेऊन निर्मिलेल्या आहेत. समाज परिवर्तनाचा नवा वसा घेण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे .संभ्रमित या कवितेतील भावार्थ नक्कीच मनोवेधक आहे. ही कविता विचारप्रवर्तक अशी आहे.

    विद्रोहाची माय रडते ढसाढसा मी बाप होतो हतबुद्ध
    स्वातंत्र्याची गाणी
    हम होंगे काम्याब/कामयाब
    क्रिकेटचे स्कोअर
    चित्रपट नट्यांचे गोडवे …

    गनीम कवितासंग्रह एकूणच जागतिक व राष्ट्रीय प्रश्नांना घेऊन वाचा फोडणार आहे. कवीचे अंतस्थ मन सदोदित अस्वस्थ होते. त्यांना भीती वाटते येणाऱ्या पिढीची कारण गद्दारांच्या फौजा नवे नवे डाव रचित आहेत. पण आपण अस्वस्थ झालो तरी आपली येणारी पिढी नक्कीच वाट काढणारी आहे. आपला आपल्या पिढीवर नक्कीच भरवसा ठेवायला हवा. या कवितासंग्रहात बदलत्या वातावरणाचा अचूक वेध घेतलेला आहे. भारतीय संविधानाचे महत्त्व व त्याची यशस्विता अनेक कवितांमधून व्यक्त केलेली आहे. आपले गनीम आपण शोधले पाहिजेत.

    वनव्यातल्या कवीने आता रणांगणावर आपले आयुध घेऊन आमने-सामने ची लढाई लढली पाहिजे .आपल्या छावण्या उद्ध्वस्त करणाऱ्या मुजोरवृत्तीचा बिमोड आपण केलाच पाहिजेत. हा विचार पेरणारा हा कवितासंग्रह उद्याच्या पिढीला दिशादर्शक ठरेल अशी आशा आहे. गनीम कवितासंग्रहातील कविता ही शत्रूच्या छावण्या उध्वस्त करणारी आहे .या कवीचे यश वादादीत आहे कवीच्या पुढील काव्य प्रवासाला माझ्याकडून लाख लाख मंगलकामना…..

    -संदीप गायकवाड
    नागपूर
    ९६३७३५७४००

Leave a comment