सध्या दिवाळी मुळे माझ्या साड्यांच्या दुकानामध्ये गर्दी सुरूय. परवा अशाच गर्दी मधे एक २७_२८ वर्षाचा तरूण दुकानात आला. सुरवातीला तो दारातच उभा राहून आतमधे उचकून उचकून पाहू लागला. माझ लक्ष होतच. अर्थातच पहरावावरून तो शेतकरी वाटत होता. मी म्हटलं काय म्हणताय दादा. काय हवय. हळूच शब्दात तो ओठातल्या ओठात बोलला साडी हवीय… मी म्हटले थांबा थोडा वेळ. तो म्हटला हो हो आटपून घ्या तुमचं. थोडी शांतता झाल्यावर दुकानात एक दोनच बायका होत्या तेव्हा मी त्या तरूणाकडे वळून म्हटले की हा दादा सांगा कशी साडी हवी तुम्हाला… काय रेंज मधे हवी. तो म्हटला या ताईंच होवून जाऊ द्या…
मी म्हटले त्या अजून पसंत करताय आणि कोणी न कोणी कस्टमर येणे सुरूच राहील. सांगा तुम्हाला काय हवय. थोड बिचकत तो म्हटला की ताई मला माझ्या बायको साठी ५००_६०० पर्यंत जरी काठाची साडी हवीय. त्याचे बोलणे ऐकून दुकानात असलेल्या त्या बायका माझ्याकडे पाहू लागल्या. मी पण विचारात पडले की या रेंज मधे जरी काठ कोणते दाखवू. पण माझ्यातील माणूसपणाने मला लगेच हिंट दिली की या बायकांच आटपून घेवू मग या तरूणाला वेळ देवू. त्या बायकांची खरेदी हिशोब आटपून मी त्या तरूणाला म्हटले की दादा माझ्याकडे जरा हेवी मालच असतो त्यामुळे तुमच्या रेंज मधे हवी तशी साडी मिळणे कठीण आहे.
तेव्हा तो म्हटला की ताई माझ्या बायकोची पहिली दिवाळी आहे. माझ्यासोबत ती पण दिवसभर शेतात राबते. तिचा हट्ट नाही पण तिने तिची इच्छा एक वेळ बोलून दाखवली होती की शेतातील भाजीपाला मस्त बहरलाय. भाव छान मिळेल….फार तर बाजारात मी बसून भाजी विकेल पण दिवाळीत मला पिस्ता रंग आणि राणी काठांची येवला पैठणी सारखी साडी हवीच….
पुढे तो म्हणाला पण काय करता ताई….मागील आठवड्यात रात्रभर भयानक पाऊस पडला त्याने सर्व भाजीपाला जमिनदोस्त केला. जो काही थोडाफार होता तो आज सकाळी काढला आणि सावदा गावच्या बाजारात बसून विकला… १४००/ रूपये मिळाले. त्यात बायको साठी साडी आणि दिवाळी साठी तेलधार भरू घरात. पुढे तो म्हटला की बाजारात माझ्याकडून नेहमी भाजी घेणा-या मनिषाताईंना विचारले मी की बायको साठी अशी साडी इतक्याच रूपयात हवीय तर त्यांनी तुमचे नाव सुचवले. हे ऐकून मझ्या मनात विचार आला की मनिषा ताई माझ्या नेहमीच्या कस्टमर आहेत…माझा स्वभावही माहित आहे….एका कष्टकरी माणसाला त्यांनी विश्वासाने माझ्याकडे पाठवलेय …
मी हसून म्हटले ठिक आहे दादा मलाही आणि तुम्हांला ही परवडेल अशा साड्या दाखवते पण कलर तुम्ही म्हणताय तोच मिळणे कठिण आहे…हे ऐकून तो तरूण पुन्हा बिचकत म्हणाला की ताई जर थोडे पैसे उधार ठेवाल तर जरा महाग ही चालेल…. मी बाजारात नेहमी बसतो. आता भाजीपाला गेला तरी पुढिल आठवड्यात मी काकडी आणि ओल्या तुरीच्या शेंगा आणणार आहे….मी थोडे थोडे पैसे करून देईल…. कस आहे ताई की माझी बायको मला इतकी साथ देतेय त्यामुळे तिची ही इच्छा पूर्ण करावी असे वाटतेय. बाहेरच्या मोठमोठी दुकानांमध्ये माझ्यासारख्या गरीबाला उभ पण करणार नाही. मोठ्या आशेने तुमच्याकडे आलोय.
हे ऐकून माझ्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्याच… विचार आला की खरच किती ढोरछाप मेहनत घेतो शेतकरी राजा…. पण गेल्या काही वर्षांपासून निसर्गांने साथ सोडून आणि व्यापारपेठांनी भाव पाडून शेतकरी राजाला पूर्ण हतबल करून सोडलेय…. स्वत: च्या भावना आवरत आणि मनाशी एक निर्णय ठरवत मी दुकानाच्या त्या कप्प्यात हात घातला ज्यात सेमी येवला पैठणी असतात. कॉम्बिनेशन तेच पण काठांच्या वेगवेगळ्या डिझाईन असलेल्या तीन साड्या मी त्याच्या समोर ठेवल्या…त्यातील सर्वात कमी किमतीची साडी १५००/ ची होती. त्याने ती हातात घेतली आणि शून्य नजरेने किमतीच्या लेबलकडे पाहू लागला….नंतर माझ्याकडे पाहिले…मी म्हटली दादा माझ्याकडे साड्यांचे रेट योग्यच असतात…. पण तरी तुम्हाला जे योग्य वाटेल तसे कीतीही रुपये द्या. तो तरूण म्हटला ताई १५००/ रूपये माझ्या अवाक्याच्या बाहेर आहे… आणि कितीही कसे काय देवू… तुमचे नुकसान करवून घेता का…
● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!
नुकतेच पावसाने ज्याच्या रोजीरोटीचे नुकसान केले होते…. तो माझ्या नुकसानाची काळजी करत होता….’ खरच शेतक-याची बरोबरी देवही करु शकणार नाही….’ साडी काउंटरवर ठेवून तो म्हटला ताई जावू द्या मी नंतर पैसे येतील तेव्हा घेईल…मी चटकन म्हटली हे बघा दादा तुम्ही ही साडी घेवून जा बर….नाही तर त्या साडीला पाहून पाहून माझ मन मला खात राहील. माझ नुकसान होवू नये असे तुम्हाला वाटतेय न तर मी तुम्हाला मुद्दल भावात देते साडी…. तो विचारात पडला… मग मी पुन्हा म्हटली की तुम्ही ५००/ रुपये आता जमा करा आणि मी तुरीची डाळ डी मार्ट किंवा कोणत्याही धान्यदुकातून घेत नाही. डाळी मी घरकोनी शेतक-याकडूनच घेते .. उरलेल्या पैश्याची तुम्ही तुरीची डाळ कराल तेव्हा मला आणून द्याल… हे ऐकून त्या तरूणाचे डोळे आनंदाने विस्फारले आणि मन भरून तो हसला… मी साडी पॅक करत होते तेव्हाच मनिषाताईचा फोन आला की हेमांगी तो एक मुलगा येणार आहे… मी म्हटले हो आलाय…ताई म्हटल्या अग तो देईल ते घे बाकीचे पैश्यांची मी पाहून घेईल…मी म्हटले ताई आपण सख्ख्या मैत्रिणी आहोत कारण आपले विचार जुळतात… मी त्याचे काम व्यवस्थीत केलेय…एखाद्या मेहनती, प्रामाणिक माणूस माझ्या दुकानातून सणासुदीला नाराज होवून गेला असता तर माझी दिवाळी आनंदाची कशी झाली असती… मनिषा ताई मी पण तुमच्या सारखीच सर्वांसोबत आनंद वाटून जगणारी आहे… फोन ठेवला. तो तरूण निघाला… त्याच्या पाठमो-या आकृतीला पाहून प्रचंड आनंद होत होता… कारण मी मनिषाताईंच्या विश्वासाला आणि त्या तरूणाच्या आशेला पात्र ठरले होते….
* एक टीप: सुपर मॉल, सोनार, पेट्रोल पंपावर आपण नेहमी हजारो रुपये भाव न करता पे करतो ….त्याचप्रमाणे शेतकरी आणि रस्त्यालागतच्या विक्रेत्यांकडे भावाची घासाघीस करू नये.
*एक शेअरिंग :– मोठ्या अभिमानाने सांगावेसे वाटते की मी बिझनेस करते पण तो फक्त साडी घ्या आणि पैसे द्या इतका व्यवहारीक नसून त्या सोबत मी प्रचंड जीवलग मैत्रिणींचा परिवार जोडलाय….मी फक्त पैसाच कमवला नाही तर मी सोन्यासारख्या मैत्रीणीही कमवल्याय. काही जण असे ही आहेत की भलेही ते माझ्याकडून जास्त खरेदी करत नाहीत पण ते माझे प्रचंड हितचिंतक आहेत. मला हे त्यांच्या बोलण्यातून आणि नजरेतून कळते….ब-याच जणी मला दुकानातील पसारा आवरू लागायला येतात….कोणी कुठे पर्यटनाला गेले तर मला भेटवस्तू आणतात…ज्याचा वृत्तांत या लेखात केलाय त्या तरुणाने दुस-याच दिवशी लिटर भर दुधाचे घट्ट दही आणून दिले…दोन चार जणी तर अशा आहेत की त्या जॉइन फॅमिलीतील असून मन मोकळे करायला आणि रिलॅक्स व्हायला माझ्याकडे येतात… असे सर्वांच्या आनंदाचे माहेरघर म्हणजे माझ “लक्ष्मी सारीज”….
- – सौ. हेमांगी फिरके
- (छाया : संग्रहित)
- (सत्य घटनेवर आधारित आहे. त्यांनी मला काही दिवसापूर्वीच मेसेज करून सांगीतले होते की मी पण माझा अनुभव शेअर करेन. आणि आज पुर्ण लेख लिहून माझ्यापर्यत आला.)
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- – बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–