नवी दिल्ली : कोरोनाच्या डेल्टा प्रकाराविरुद्ध कोव्हिशिल्ड लस परिणामकारक असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. जागतिक कोरोना संकटाच्या सावलीत सार्स-सीओव्ही-२ ने २0 कोटींहून अधिक लोकांना प्रभावित केले असून जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात ५0 लाखांहून अधिक यामुळे मृत्यू झाले आहेत. सार्स-सीओव्ही -२ विषाणूच्या उत्परिवर्तित प्रकारांमध्ये वाढ झाल्यामुळे लसीच्या परिणामकारकतेबाबत चिंता निर्माण झाली आहे. डेल्टा (बी.१.६१७.२) प्रकार हा भारतातील प्रामुख्याने आढळणारा प्रकार आहे.
भारतातील लसीकरण कार्यक्रमात मुख्यत्वे कोविशिल्ड लस दिली जाते.ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या नेतृत्वाखालील भारतीय संशोधकांच्या बहु-संस्थात्मक चमूने भारतात एप्रिल आणि मे २0२१ दरम्यान सार्स -सीओव्ही -२ संसर्गाच्या वाढीदरम्यान कोविशिल्डच्या परिणामकारकतेचे मूल्यांकन केले होते. त्यांनी संरक्षणाची प्रणाली समजून घेण्यासाठी लसीकरण झालेल्या निरोगी व्यक्तींमधील व्हेरिएन्ट विरुद्ध सेल्युलर रोगप्रतिकारक प्रतिसादांचे देखील मूल्यांकन केले होते.
द लॅन्सेट इन्फेक्शिअस डिसिज या र्जनलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात सार्स-सीओव्ही-२ संसर्ग झालेले २३७९ रुग्ण आणि नियंत्रणांत आलेले १९८१ रुग्ण यांची तुलना समाविष्ट आहे, पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींमध्ये सार्स -सीओव्ही-२ संसर्गाविरूद्ध लसीची परिणामकारकता ६३ टक्के असल्याचे आढळून आले. मध्यम-ते-गंभीर रोगांविरूद्ध संपूर्ण लसीकरणात लसीची परिणामकारकता ८१ टक्के इतकी होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शास्त्रज्ञांना असेही आढळून आले की स्पाइक-विशिष्ट टी-सेल प्रतिसाद डेल्टाव्हेरिएन्ट आणि सार्स -सीओव्ही-२ या दोन्ही विरूद्ध सुरक्षित आहे.
अशा सेल्युलर रोगप्रतिकारक संरक्षणामुळे विषाणूच्या प्रकारांविरूद्धची प्रतिकारशक्ती भरून निघण्यास संधी मिळू शकते आणि मध्यम ते गंभीर स्वरूपाचा आजार रोखण्याबरोबरच रुग्णालयात दाखल होणे टाळता येते. हा अभ्यास प्रत्यक्ष लसीची परिणामकारकता आणि लसीकरणाला रोगप्रतिकारक प्रतिसाद यावर सर्वसमावेशक माहिती पुरवतो ज्यामुळे धोरण आखण्यास मदत होईल.