पावसाळ्यात केस सुकवणं हे एक जिकरीचं काम असतं. केस सुकविण्यासाठी ड्रायरचा वापर केला जात असला तरी या उपकरणाचा कमीत कमी वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून कायमच दिला जातो. पण काही दिवसांपूर्वी एका संशोधनातून सिद्ध झालं आहे की, हेअर ड्रायरने सुकवलेले केस नैसर्गिकरित्या सुकवलेल्या केसांपेक्षा जास्त निरोगी राहतात. अर्थात असं असलं तरी ड्रायरचा वापर र्मयादित ठेवावा हे देखील त्यांनी अधोरेखित केलं आहे. तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात केस सुकण्यास वेळ लागतो.
या दरम्यान केसांमध्ये पाणी राहून स्काल्पला सूज येऊ शकते. म्हणूनच नैसर्गिक पद्धतीने लवकरात लवकर केस सुकविण्यासाठी काही टिप्स अनुसरता येतील. शॉवर घेतल्यानंतर सर्वात आधी टॉवेलने केसांमधील पाणी टिपून घ्यावं. त्यानंतर हलक्या हाताने केस पुसावे. खसखसून पुसल्यास केसांना इजा होण्याचा संभव असतो. केस थोडे दमट असले तरी कंगव्याने विंचरू नयेत. यामुळे केस तुटण्याचा धोका वाढतो. पण पर्याय नसेल तर सर्वात कमी तापमान ठेवून ब्लो ड्रायर वापरावा. यामुळे केस सुकतात आणि मोकळे होण्यास मदत होते.