* राज्यपाल कोश्यारी शेतकरी समस्यांकडे लक्ष देतील का. – प्रदीप बाजड
अमरावती : महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्या स्वागतासाठी आम्ही अमरावतीकर सज्ज आहोत. मात्र राज्यपाल दौऱ्यावर येत असतांना त्यांनी शेतकऱ्यांसाठी नगदी पिकं म्हणून आधार असणाऱ्या पिकांकडे अधिक लक्ष देत डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्राची स्वतः पाहणी करून अंतिम श्वास घेत असलेल्या संशोधन केंद्राची अवस्था पाहावी, विशेष म्हणजे १५१ एकर शेत जमिनीपैकी २०-२५ एकर जमीन सोडली तर उर्वरित शेतजमीन पडीतात रूपांतरित झाल्याचे पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर संशोधन केंद्रात असलेले अधिकारी-कर्मचारी व मजूर वर्ग निवृत्त झाल्याने सध्याच्या परिस्थितीत ५५ पैकी ७ मजूर कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. एवढचं काय संशोधन केंद्राच्या महत्वपूर्ण बाबीकडे दुर्लक्ष झाल्याने असंख्य आजाराने अंतिम श्वास घेण्याच्या स्थितीत संशोधन केंद्र आले आहे. त्यामुळे राज्यपालांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत प्रादेशिक संशोधन केंद्रातील सर्व आवश्यक गरजा पूर्ण करीत केंद्राचे वैभव पूर्व पदावर आणून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत कार्यरत करावे, प्रादेशिक संशोधन केंद्राबाबतची लेखी मागणी शिवसेनेचे माजी सहसंपर्क प्रमुख व आधार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांनी दिनांक १२ ऑक्टोबर रोजी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्या मार्फत मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांना केली होती.
डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अमरावती येथील प्रादेशिक संशोधन केंद्र (आर.आर.सी.) सन-१९६८ पासून कार्यरत आहे. हे केंद्र एकूण १५१ एकर क्षेत्राचे असून शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व गरजेचे आहे. या ठिकाणी गडीत पीक व तृणधान्य पिकांचे जास्त उत्पन देणाऱ्या रोगमुक्त बियाणांचे संशोधन तसेच आकस्मिक पिकांवर रोगांचे सावट आलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत त्यांच्या शेतात जाऊन परीक्षण करून योग्य मार्गदर्शन करणे हि महत्वपूर्ण बाब निरंतर होत होती.
गत 2 हजार सालापासून अमरावती विभागातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा जिल्ह्यातील क्षेत्रात दिवसेंदिवस सोयाबीन पिकाच्या लागवडीचे क्षेत्र सतत वाढल्याने डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शेतकऱ्यांच्या मुख्य सोयाबीन पिकांवर संशोधन व्हावे याहेतूने अमरावती येथे सन २००९ मध्ये केंद्राची स्थापना केली. परंतु हळू-हळू असंख्य संशोधक, सहाय्यक संशोधक व मजूर वर्ग या संशोधन केंद्रातून निवृत्त झाले असल्याने त्याचबरोबर कृषी विद्यापीठाचे दुर्लक्ष झाल्याने १५१ एकर जमिनीपैकी ३-४ एकर जमीन सोडून बाकी पडीत शेतात रुपांतर झाले आहे. जुने वैभव हरवून असंख्य समस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळते, परिसराचे कुंपण शिकस्त झाल्याने मोकाट जनावरांचा सुळसुळाट, बियाणे साठविण्यासाठी अत्यंत आवश्यक गोडाऊन व ओपन शेड नसणे, दैनंदिन मजुरांचा मोठं अभाव, शेतकऱ्यांच्या तक्रारीचे पाहणी करण्यासाठी जाण्या-येण्यासाठी केंद्रावर वाहन नसणे, अत्यंत महत्वाचे म्हणजे रसायन शास्त्रज्ञ, वनस्पती रोग शास्त्रज्ञ, वरिष्ठ संशोधक, सहाय्यक संशोधक, कृषी सहाय्यक, ग्रेट वन मजूर, कायम मजूर, ५५ पैकी केवळ ७, यंत्र सामुग्रीचा अभाव, विहिरीची व इमारतीची दुरुस्ती नसणे, या सर्व महत्वपूर्ण बाबींकडे दुर्लक्ष झाल्याने असंख्य आजाराने अंतिम श्वास घेण्याच्या स्थितीत संशोधन केंद्र आले आहे.
राज्यपालांनी शेतकऱ्यांसाठी नगदी पिकं म्हणून आधार असणाऱ्या या महत्वपूर्ण सोयाबीन संशोधन केंद्राची स्वत: पाहणी करून स्थानिक सर्व आवश्यक गरजा पूर्ण करून या संशोधन केंद्राचे वैभव पूर्व पदावर आणून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत कार्यरत करण्याची मागणी या पत्रकातून प्रदीप बाजड यांनी केली आहे.