- * ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’चा होणार मेळघाटात शुभारंभ
- * कृषी मंत्र्यांचा साद्राबाडी येथे आज शेतकऱ्याच्या घरी मुक्काम
- * प्रत्यक्ष शेतात जाऊन करणार शेतकऱ्यांशी चर्चा
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पदाधिकारी, अधिकारी यांनी संपूर्ण एक दिवस शेतकऱ्यांसोबत राहून संवाद साधणे, प्रत्येक अडचणी समजून घेणे यासाठी कृषी विभागातर्फे “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम दि. 1 सप्टेंबरपासून दि. 30 नोव्हेंबरपर्यंत राज्यात राबविण्यात येत आहे. त्याचा राज्यस्तरीय शुभारंभ राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळघाटातील धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे गुरुवारी सकाळी 9 वाजता होईल.
उपक्रमात श्री. सत्तार यांचे बुधवार दि. 31 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता साद्राबाडी येथे आगमन होईल. यावेळी मंत्री महोदय हे साद्राबाडी येथील शेतकरी दत्तात्रय चुनीलाल पटेल यांच्या निवासस्थानी मुक्काम करणार आहेत. त्यानंतर साद्राबाडी येथे दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता माझ्या एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमात मंत्री श्री. सत्तार हे श्री. पटेल यांच्या शेतावर उपस्थित राहून शेतीविषयक समस्या, अडचणी, प्रश्न जाणून घेतील. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता धारणी येथील पंचायत समिती समोरील परिसरात 10 हजार शेतकरी उत्पादक केंद्र स्थापन करण्याच्या योजनेचा, तसेच ताप्तीपुत्र जैविक शेती मिशन शेतकरी उत्पादक कंपनी कार्यालयाचे शुभारंभ होईल. त्यानंतर त्यांचे सायंकाळी 7 वाजता धारणी येथून सिल्लोड जिल्हा औरंगाबादकडे प्रयाण होईल.
शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, समस्यांमुळे निर्माण होणारा ताणतणाव, नैराश्य, शेतकरी आत्महत्या याची कारणमीमांसा करुन सुलभ व प्रभावी कृषी धोरण तयार करण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे.
‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ या उपक्रमात प्रधान सचिव, कृषी आयुक्त, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु, शास्त्रज्ञ, विभागीय आयुक्त, विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा, कृषी विकास अधिकारी, कृषी उपसंचालक व इतर उपविभागीय व तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी भेट देण्याच्या सूचना आहेत. त्यात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून तीन दिवस तसेच महसूल, ग्रामविकास व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यातून एक दिवस भेट द्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.
या उपक्रमांत सन्माननीय लोकप्रतिनीधी देखील सहभागी होणार आहेत. कार्यक्रमास शेतकरी बंधूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक किसनराव मुळे यांनी केले आहे.