कुत्रा हा इमान राखणारा प्राणी. ग्रामीण भागात कुत्र्याला शेतक-याचा मित्र मानले जाते. मात्र वाढत्या औद्योगिकीकरणामुळे शहरात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. शहरात भटके कुत्रे नाहीत, असा भाग नाही. नागपूर जिल्ह्यातील काटोल मध्ये भटक्या कुत्र्याने पाच वर्षीय बालकावर हल्ला केल्याचे प्रकरण घडल्यानंतर भटक्या कुत्र्यांची दहशत समोर आली.सकाळी सहा वाजताच्या सुमारास पाच वर्षांचा मुलगा आपल्या मोठ्या बहिणीसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेला. त्याच्यावर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केला. कुत्र्यांच्या कळपाने पाच वर्षीय चिमुकल्याचे अक्षरशः लचके तोडले. त्यात त्याचा मृत्यू झाला. हा मुलगा रोज सकाळी मोठ्या बहिणीसोबत फिरायला जायचा. सकाळी तो घरातून बाहेर पडला. रस्त्याने जात असतानाच मुलाला भटक्या कुत्र्यांच्या कळपाने घेरले. कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केल्यानंतर बहीण जोरजोरात आरडाओरडा करत राहिली. लोक येताना दिसताच कळपाने मुलाला फरफटत दूर खेचत नेलं. यात चिमुकल्याच्या अंगांचे काही भाग कुत्र्यांनी खाल्याने त्याचा मृत्यू झाला. शहरीभागाप्रमानेच ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्रतेने जाणवू लागली आहे.
उकीरडयावर टाकल्या जाणा-या अन्नपदार्थावर गुजराण करणा-या या भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत असली तरी उपद्रव मात्र कमी होताना दिसत नाही. चायनीज तसेच खाद्यपदार्थाच्या गाडया, कचराकुंडया आदी ठिकाणी भटक्या कुत्र्यांचा वावर मोठया प्रमाणात असतो. अनेक ठिकाणी हे कुत्रे एकटे-दुकटे राहतात तर काही ठिकाणी टोळ्या करून राहतात. त्यामुळे रात्री सर्वत्र निरव शांतता पसरली की, यांचे राज्य सुरू होते. मग कोणी चांगला भला माणूस चालत जात असेल किंवा सायकल अथवा मोटारसायकलने जात असेल तर त्यांच्या मागे धावत जाऊन ते हल्ला करतात. त्यामुळे अनेकदा या कुत्र्यांना घाबरल्यामुळे वाहनांवरील ताबा सुटून अपघात झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.
रात्रीअपरात्री ही कुत्री अंगावर येतात, गाडीच्या मागे लागतात, अगदी चावाही घेतात. आपल्यातलेच काही ‘श्वानप्रेमी’ या भटक्या कुत्र्यांना खाऊपिऊ घालून त्यांची फौज वाढवित असतात. मात्र, या श्वानप्रेमींची ‘जबाबदारी’ आता अधिक वाढली आहे.
‘अॅनिमल वेलफेअर बोर्डा’ची नियमावली जारी केली आहे.मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या कुत्र्यांना पोसायचे असेल, तर त्यांची संख्या वाढणार नाही, याची काळजीही याच मंडळींना घ्यावी लागणार आहे. रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांच्या आरोग्याची काळजी घेताना त्यांची नसबंदी करणे, आरोग्यतपासण्या करणेही या श्वानप्रेमींना यापुढे बंधनकारक राहणार आहे. तसे स्पष्ट निर्देश ‘अॅनिमल वेलफेअर बोर्ड ऑफ इंडिया’ने दिले असून, नियमावलीही तयार केली आहे. हे नियम मोडल्यास दंडात्मक रकमेची तरतूदही करण्यात आली आहे.नियम बरेच लोकांना माहीत नसतात.भटके कुत्रे कोणाच्या मालकीचे आहेत,हे समजून घेणे देखील कठीणच. असे आहेत नियम भटक्या कुत्र्यांना खायला घालायचे असेल, तर त्यांच्या नसबंदीची, आरोग्यतपासणीची जबाबदारी घ्या.
या अन्नदात्यांवर कुत्र्याचा अधिक विश्वास असल्याने त्यांना डॉक्टरांकडे नेणे या श्वानप्रेमींसाठी अधिक सुलभ आहे. राहता परिसर, सोसायटीमध्ये भटक्या कुत्र्यांना उभे करू नका. लहान मुले खेळत असतात, त्या ठिकाणापासूनही भटकी कुत्री दूर ठेवा. गर्दीच्या ठिकाणी कुत्र्यांना अन्नाची लालूच दाखवून खायला घालू नका. कुत्र्यांना खायला घातल्यानंतर उरलेले उष्ट खरकटे तिथेच टाकून देऊ नका.कुत्र्याने हा परिसर अस्वच्छ केला, तर तो साफ करण्याची जबाबदारी या श्वानप्रेमींचीच राहील. कुत्र्यांना केवळ खायला घालून प्रेम व्यक्त करू नका, त्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्या. भटक्या कुत्र्यांना वळण लावायचे काम श्वानप्रेमी करू शकत नाही, हे लक्षात ठेवा. भुंकणे आवरा!
भटक्या कुत्र्यांप्रमाणे पाळीव कुत्र्यांसाठीही ठोस नियमावली ‘अॅनिमल वेलफेअर बोर्डा’ने स्पष्ट केली आहे. कुत्री भुंकणारच. मात्र, ती भुंकून भुंकून हैराण करत असतील, तर त्यांचे भुंकणे नियंत्रित करण्याची व त्यामागील कारणे शोधण्याची जबाबदारी मालकाची राहील! रात्रीच्या वेळी कुत्रा भुंकणार नाही, याची काळजीही मालकाने घ्यायला हवी. घरात कुत्रा पाळण्याचा अधिकार कुणालाही आहेच. मात्र, त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. कुत्र्यांनाही माणसांप्रमाणे लिफ्टमधून ये-जा करण्याचा अधिकार आहे, लिफ्ट वापरासाठी मिळणार नाही, असे सोसायटी म्हणू शकत नाही. कुत्र्याचे छोटे पिलू पाळायला परवानगी आहे आणि मोठ्या प्रजातीचा दांडगा कुत्रा पाळण्यास बंदी, असेही आक्षेप घेता येणार नाही.मात्र या नियमांची अंमलबजावणी होतच नसल्याने आणि जबाबदारी घ्यायला कोणीच पुढं येतं नसल्याने भटक्या कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा दहशतवाद रोखण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका काय उपाययोजना करणार आहे, याचे उत्तर आता जनता मागत आहे.
- प्रा.डॉ सुधीर अग्रवाल
- ९५६१५९४३०६