- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : कारागृहातील बंदीजनांना न्यायालयात त्यांची बाजू मांडण्याकरिता शासनाच्या खर्चाने अधिवक्ता मिळण्याचा हक्क आहे. त्याचप्रमाणे, चांगल्या वैद्यकीय सुविधा व सकस आहार मिळण्याचाही हक्क असल्याचे जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी येथे सांगितले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन तसेच वैद्यकीय चाचणी शिबीर घेण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर झाले. यावेळी कायद्यातील विविध बाबींबाबत माहिती देण्यात आली. धर्मादाय सह आयुक्त एस.डी. ठाकरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी.आर. पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे, कारागृह अधीक्षक बी.एम. भोसले, तुरुंगाधिकारी स्नेहल चव्हाण आदी उपस्थित होते.
वैद्यकीय शिबीरात जिल्हा सामान्य रूग्णालय व खाजगी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. यावेळी विविध वैद्यकीय चाचण्या, तपासणी, निदान, चिकित्सा, वैद्यकीय सहाय्य करण्यात आले. डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालय, डॉ. हेडगेवार रुग्णालय, श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल, दयासागर रुग्णालय, रेडियंट हॉस्पिटल, दंत महाविद्यालय, इंडियन मेडिकल असोसिएशन यांचे सहकार्य लाभले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे योगेश देशमुख, अंकुश इंगळे, गौरव राऊत, निलेश पारवे, रवी चंदनखेडे, कारागृह प्रशासनातील संदिप मिराशे, श्रीकृष्ण बनसोड आदी उपस्थित होते.