कवीचे भावविश्व हे अफाट असते. स्वप्नांच्या अश्वावर आरूढ होऊन त्याच्या कल्पना आकाशाला गवसणी घालतात. नभांगणातील चमचमते तारे वेचून आणावेत आणि आपल्या काव्यसंग्रहात सजवावेत अशी अगम्य इच्छाशक्ती कविवर्य संतोष जगताप यांची असावी. त्यामुळेच त्यांचा “स्वरमयी” हा नुकताच प्रकाशित झालेला काव्यसंग्रह साहित्याच्या नभांंगणातील चमचमता तारा ठरला आहे.संतोष जगताप यांच्या कल्पना शब्दांचे सरगम लेवून लयबद्ध झालेल्या कवितांना भक्तिमय स्वरसाज चढला आहे. भक्तिरसात ओतप्रोत झालेल्या कविता वाचकांना मनदर्पणाचे दर्शन घडवतात. आध्यात्मिकतेचा स्पर्श झाल्याने त्यांच्या कवितांनी एक अलौकिक उंची गाठली आहे. त्यांच्या संकल्पनेतून प्रतिमा, दृष्टांत, उपमा, अलंकार यांचा सुरेख संगम आपल्याला वाचायला मिळतो.
“स्वरमयी” हा संतोष जगताप यांचा तिसरा काव्यसंग्रह आहे. ह्या अगोदर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाद्वारे त्यांचे दोन काव्यसंग्रह “दाटून येता” (१९९८) आणि “आत्मधून” (२०००) प्रकाशित झालेले आहेत. वीस वर्षांच्या दीर्घ अवकाशाच्या कालखंडाच्या त्यांचा “स्वरमयी” हा अतिशय दर्जेदार काव्यसंग्रह परीस प्रकाशन द्वारे २०२१ मध्ये प्रकाशित झाला आहे. खरे तर कुठलाही कवी इतका अवकाश लिखाणात घेऊ शकत नाही. कविता त्याच्या रक्तात भिनलेली असते. त्यामुळे ती त्याच्या धमण्यातून सतत प्रवाहित असते. तसेच संतोष जगताप यांच्याही कविता अवकाशाच्या खाचखळग्यात साचून राहिल्या नाहीत तर त्या कालौघात सतत प्रवाहित झाल्यात. बदलत्या काळात बदलते संदर्भ त्यांच्या कवितेत कालप्रसंगानुरूप आलेले आहेत. अवकाशा दरम्यान जरी त्यांची पुस्तके प्रकाशित झाली नाहीत तरी त्यांचे लिखाण मात्र थांबलेले नव्हते. ते सतत त्यांच्या मनपटलावर रेखांकित होत राहिले. या दरम्यान त्यांनी भरपूर वाचन केले. त्यामुळे त्यांची काव्यप्रतिभा दिवसेंदिवस प्रफुल्लित होत गेली. विकसित होऊन समृद्ध होत गेली. या समृद्ध संपत्तीच्या साठ्याची श्रीमंती “स्वरमयी” हा काव्यसंग्रहास मिळाली. त्यांनी अर्पण पत्रिकेतच हळव्या भावबंधाची कविता लिहून कवितेप्रति आपले समर्पण व्यक्त केले आहे. “स्वरमयी” काव्यसंग्रहात एकूण १५६ काव्यपुष्प आहेत. वाचकांच्या मनाला प्रसन्न करणारा हा टवटवीत काव्यपुष्पांचा “काव्यसंग्रह आहे.
कवीचे शब्दस्वर नादमयरित्या अंतर्मनात झंकारता. जणूकाही सांजवेळी वृंदावनी कृष्णाचा वेणू झंकारतो आहे. कवीने मुख्यत्वे कृष्णभक्तीत लीन होऊन कृष्णाची मनोभावे आराधना आपल्या काव्यातून केली आहे. स्वरमयी काव्यसंग्रहातील पहिलीच “स्वरमयी” ही शीर्षक कविता कृष्णभक्तीने वाचकांच्या मनाला संमोहित करते.
- देवघर समयांनी
- उजळते सायंकाळी
- रुद्रवीणा झंकारली
- कान्हा उतरला गळी
सांजवेळी देवघरा समईच्या मंद मंद प्रकाशाने उजळून निघते. त्याचवेळी दूर कुठेतरी कान्हाची रुद्रवीणा झंकारताच मन कृष्णभक्तीत लीन होते. संतोषजींच्या घरातील वातावरण धार्मिक असल्याने त्यांच्या काव्यलेखनाला अध्यात्मिक जोड लाभली आहे. आध्यात्मिकतेमुळे त्यांची कविता दार्शनिकतेकडे आपोआपच वळली आहे. भक्तिमय कवितांमध्ये, कृष्ण, राधा, यशोदा, गोकुळ, द्वारका, गीता,विठाई, ज्ञानोबा, तुकोबा, जनाई, रुक्माई, पंढरपूर, चंद्रभागा, गोदावरी, भावार्थदीपिका, आळंदी इ. पवित्र प्रतीके आली आहेत. तसेच कवीला शास्त्रीय संगीताचेही उत्तम ज्ञान आहे त्यामुळे संगीतातील मालकंस, चंद्रकंस, बिहाग,मारवा, यमन या रागांचा तर वेणू, टाळ, मृदंग, सतार, पखवाज, तबला, तंबोरा, पावा, रुद्रवीणा, इ. संगीत वाद्यांचा प्रतीकांच्या स्वरूपात योग्य वापर त्यांनी काव्यलेखनात केला आहे.
- कंठात विराजे स्वर
- सुप्त गुणगान गीत
- स्तब्ध उरे मालकंस
- पावलाखाली रेतीत
- वेणू वीणा सख्य
- गायली पूरवी
- आलाप भैरवी
- पखवाज बोले
- काळजात ओले
- बीज गाभुळले
कवीला निसर्ग सौंदर्याची देखील भुरळ पडलेली आहे. निसर्गाचे अप्रतिम वर्णन त्यांनी आपल्या मोहक अशा अलंकारिक भाषाशैलीत केले आहे. निसर्गाच्या सानिध्यात राहून सौंदर्यदृष्टीने निसर्गाचे निरीक्षण करून निसर्ग कविता रेखटतांना ते भावविभोर होतात. हुबेहूब त्या वेळेचे, त्या दृश्याचे शब्दचित्रण सुंदररित्या आपल्या काव्यात रेखाटले आहे.
- पहाटेने घरट्याचे
- दार केले किलकिल
- पाखरांच्या गळ्यातून
- उमटली किलबिल
प्रभातसमयीच्या नयनरम्य दृश्याचे त्यांनी अप्रतिम वर्णन आपल्या कवितेमधून केले आहे. अलंकारिक भाषाशैली ही त्यांच्या भाषिक समृद्धीचे लक्षण आहे. मनकल्पित भावभावना काव्यात अलवारपणे गुंफण्यासाठी त्यांच्याकडे शब्दांची श्रीमंती विपुल आहे. शृंगार रसावर आधारित रोमांचक कविता संतोष जगताप यांच्या कवितेतील सौंदर्यस्थळे आहेत. शृंगारिक शब्दांनी त्यांच्या कविता अतिशय देखण्या झालेल्या आहेत. “कोजागिरी” कवितेतून
- ओठी आलेले अमृत
- आकंठ पिऊन झाले
- अवकाश रात्रभर
- चंद्रप्रकाशात न्हाले
- “मिलन” कवितेत आलेल्या ओळी
- हिरवा चुडा मेंदीच्या
- गोऱ्यापान हातातला
- सांगे वेडा नकळत
- अभिसार मनातला
कवीच्या कविता ह्या कल्पनांच्या जगात जितक्या निवांतपणे विसावल्या आहेत तितक्याच त्या वास्तवदर्शी सुद्धा आहेत. कवीने स्वतःचे आत्मभान चांगलेच जपले आहे. “जपे आत्मभान” अशी ओळ त्यांच्या एका कवितेत आलेली आहे. सुरुवातीच्या कवितांमधून कवीला कृष्णाच्या राधेची भुरळ पडलेली आहे असे जाणवते. परंतु जसजसे वाचक पुढच्या कविता वाचत जातो तेव्हा कवी आपल्या जीवनसांगिनीलाच राधा समजतो असे स्पष्ट होते.
- रानामध्ये एकट्याच्या
- सोबतीला आली साथ
- भाग्य आले गं फळाला
- दिव्याला मिळाली वात
कवी कधी पत्नीप्रती कृतार्थ भाव व्यक्त करतात तर कधी संसारातील मिश्किल प्रसंग मिश्कीलपणे रेखाटतात.
- दूध, अंडी, भाजी आणा
- ही वाण सामानाची यादी
- संपतच नाही आठवूनही
- एवढं तरी घेऊन यावं
कुटुंबवत्सल संतोष जगताप यांनी वैश्विक कुटुंब पोषणाऱ्या जगाच्या पोशिंद्याच्या समस्यांना सुद्धा उघड केले आहे. पोशिंदा कवितेत त्यांनी आपल्या कृषिप्रधान देशातील बळीराजाची दुर्दशा अधोरेखित केली आहे.
- पाठीमागे कर्जाचा डोंगर
- घरादारावर कदाचित नांगर….
- हे जू काही केल्या सोडवत नाही
- फास गळ्याचा निघवत नाही
माणसाला पोट भरण्यासाठी आपले मिळेल त्या वाटेवर पुढे पुढे जावे लागते. या वाटेवरून निरंतर जीवनप्रवास करतांना ज्या मातीत जन्मलो ती ज्या गावात वाढलो ते मात्र मागेच राहून जाते. कवीला आपल्या गावातील मातीची प्रकर्षाने ओढ आहे. मातीची कणव त्यांनी आपल्या काळजात जपून ठेवली आहे.
- ही माती माझीच आहे
- जन्मांतरीची स्वर्गभू पांढरी
- काळजातली गावपंढरी
संतोष जगताप यांनी “स्वरमयी” काव्यसंग्रहात विविध काव्यप्रकार कुशलतेने हाताळले आहेत. भक्ती, प्रेम,शृंगार, वास्तवदर्शी दार्शनिक काव्यलेखनासोबतच सामाजिक जाणिव जागृतीच्या समस्यांना, तळागाळातील प्रश्नांना त्यांनी आपल्या कवितेतून वाचा फोडायला हवी. सद्य परिस्थितीत परिस्थिती पूरक काव्यलेखनही त्यांनी करायला हवे. संतोष जगताप यांच्या प्रदीर्घ काळाच्या काव्यसाधनेचे यथोचित फळ म्हणजे “स्वरमयी” काव्यसंग्रह होय! ह्या काव्यसंग्रहाबद्दल लिहावे तेवढे कमीच आहे. परंतु “स्वरमयी” काव्यसंग्रह वाचकांनी प्रत्यक्षात स्वतः हातात घेऊन वाचला तर ती अलौकिक अनुभूती होईल. कवी संतोष जगताप यांना पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा!
- समीक्षक:- निशा डांगे
- काव्यसंग्रह:- स्वरमयी
- कवी:- संतोष जगताप
- 88058 85195
- प्रकाशन:- परीस पब्लिकेशन
- मुखपृष्ठ:- अरविंद शेलार
- मूळ किंमत:- २५०/रु.