सर्व सजीवांना जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. म्हणूनच पाण्याला जीवन म्हणतात. पृथ्वीवर म्हणायला 71% पाणी आणि 29% जमीन आहे. पृथ्वीवरील पाण्यात 97 टक्के समुद्राचं खारं पाणी आहे. उरलेल्या तीन टक्के गोड्या पाण्यात दोन टक्के ध्रुवीय प्रदेशात आणि हिम शिखरावर गोठलेल्या स्वरुपात आहे आणि जेमतेम एक टक्का पाणी विहिरी, बोअरवेल, तलाव, नदी, नाल्याच्या स्वरूपात उपलब्ध आहे. जर नियोजन न करता पाणी काटकसरीने वापरले नाही तर 2030 पर्यंत देशात पाणीटंचाई उद्भवणार असून 2050 पर्यंत ही समस्या भीषण स्वरूप धारण करणार आहे. खरं म्हणजे पाणीटंचाईची समस्या नैसर्गिक नसून मानव निर्मित समस्या आहे.वाढती लोकसंख्या ,बेसुमार जंगलतोड ,पावसाचा लहरीपणा, हवामानातील बदल आणि नियोजनाचा अभाव अशा अनेक कारणामुळे पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली खाली जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशालाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. मग त्याला माझं करजगाव तरी कसे अपवाद राहणार. त्याही पुढे जाऊन असे म्हणता येईल की, पाणीटंचाई करजगावच्या पाचवीलाच पुजलेली आहे.
मला आठवते मी लहान असताना करजगावी पाण्याची पातळी वरच होती नाल्याचे पाण्याला पाणी पुरायचे. फेब्रुवारी मार्च पर्यंत नाला वाहायचा नंतर डोह पडायचे लक्ष्मण हिरवेच्या उंबराखालच्या डोहाचे पाणी नवीन पूर येईपर्यंत आटत नसे.विहिरीची पाणीपातळी सुद्धा वरच होती. 1977-78 पर्यंत नाल्यातील विहीर,नत्थू पाटलाची विहीर,पेरु सावकाराची विहीर या विहिरीत उन्हाळ्याच्या दिवसात पोहणारांची झुंबड असायची.
1956 पूर्वी ज्याकाळी जातीव्यवस्था तीव्र स्वरूपात होती. तेव्हा नत्थू पाटलाच्या धुर्यावर नाल्यात महारांचा दगडांनी बांधलेला विहिरा होता. तेथे नाल्याचे पात्र जरा रुंदच होते. आजूबाजूला अंजनाची, बाभळीची आणि भिंगरीची झाडे होती. जवळ जाईपर्यंत तो विहिरा दिसत सुद्धा नसे. तेथे झाडाला मेलेल्या बैलाचे मुंडके मुद्दाम लटकविले जायचे, उद्देश हाच होता की नवीन वाटसरूने चुकूनही तिचे पाणी पिऊ नये ती फक्त महारांचीच आहे हे ओळखू यावे यासाठी ही निशाणी असायची. 1965 मध्ये तो विहिरा ग्रामपंचायत ने सिमेंट ने बांधला.तिचा परीघ लहान असल्यामुळे नवशिक्या पोहोणारासाठी ती विहिर वरदानच होती बहुतेक मुले तेथेच पोहणे शिकायचे.
पण 1980च्या दशकात पाणीटंचाईला सुरुवात झाली. तेव्हा नळयोजनेची विहीर,आमराईची विहीर ,ठाकरे ची विहीर बाब्यावाली विहीर, या विहिरींनी बरीच वर्ष करजगावच्या पाण्याचा प्रश्न सोडविला. कधीकधी करजगाववासी तेलगव्हाण च्या घाटाजवळच्या खडकीच्या विहिरीवर तसेच वरुडखेड शिवारातील गांजर्यावाल्या विहिरीवर पाणी भरायला जायचे. ज्यांच्याकडे बैलगाडी होती ते बंबाने पाणी आणायचे.81-82 पर्यंत तर पाण्याची फारच टंचाई निर्माण झाली. पाण्यासाठी लोक रात्रभर जागायचे .नळाची अमराईची विहिर आणि लक्ष्मणराव ठाकरेच्या विहिरीवर लोक रात्री-बेरात्री जाग आली तेव्हाच कोणालाही माहित होऊ न देता पाण्याचे भांडे घेऊन जायचे .विहिरीत उतरून ग्लासने बकेट भरायचे. विहिरीवरील व्यक्ती पाण्याचे भांडे भरायची. आणि घरी आणायचे. 2006 ला करजगावात तीव्र पाणीटंचाई होती .दोनशे लिटरची टाकी चाळीस ते पन्नास रुपयात भरून मिळायची. गरीब लोकांना गुंडा प्रमाणे सुद्धा पाणी भरून मिळे. 2010 या वर्षी तर वर्षभर (पावसाळ्याचे चार महिने सुद्धा) गावात टँकर चालू होते .सत्य साई संस्थानच्या वतीने हे पाणी मोफत पुरविण्यात आले होत.
टॅंकर जेव्हा तांड्यातील खारोण्या विहिरीत रिचवले जाई, तेव्हा विहिरीवर पाणी भरणाऱ्यांची तोबा गर्दी उसळत असे. पाणीटंचाईने आजपर्यंत करजगावातील अनेकांचे बळी घेतले आहे. रामजी खेतावताची आई ,ठाकूर जाधवची पत्नी ,गोविंदा लालू ,डुबाची पत्नी लीला, मधुकर रामजी चव्हाण बाहुली लोभा राठोड, बाहुली धनलाल चव्हाण, रमेश गवई ,रोहिदास राठोड,आणि कोकिळा दिनेश राऊत असे कमीत कमी दहा-बारा तरी बळी घेतले आहेत. 1980 च्या दशकात रामकिसन बनु चव्हाण हा तर चाळीस फूट खोल असलेल्या नळ योजनेच्या कोरड्या विहिरीत पडला होता. पण सुदैवाने तो बचावला. 1980 मध्येच जेव्हां नाल्यामधील बौद्धांची विहीर 40 फूट खोल केली .तिचा परीघ मोठा केला. ती खोदत असताना फारच मोठा झरा लागला होता. खोदणार्यांना खोदकाम करताच येत नव्हते, म्हणून त्यांनी झर्याची जागा सिमेंटचे पोते टाकून बंद केली, त्यामुळे झरा दुसरीकडे वळला. असे जुनेजाणते सांगतात.
- क्रमशः
- प्रा. रमेश वरघट
- करजगाव ता. दारव्हा
- जि. यवतमाळ