आजोबांचं वय ८५ च्या पुढचं. वयापरत्वे आलेलं आजारपण होतंच. आजोबा खरं तर पुण्याचे. पण पत्नीच्या निधनानंतर त्यांना मुलीसोबत मुंबईला जावं लागलं. आता ते तिथेच राहतात. तिथे जावई, दोन लाघवी नाती त्यांची खूप काळजी घेतात.त्यांनी तिथे मित्रपरिवारही जमवला आहे. सोसायटीतल्या बाकड्यावर बसून गप्पाही होत असतात. मात्र त्यांना पुण्याची, इथल्या मित्रपरिवाराची, नातेवाईकांची आठवण येत असते. पुण्याला यायचं म्हटलं की त्यांच्या अंगात नवा उत्साह संचारतो. मधल्या काळात कोरोनामुळे त्यांना पुण्याला येत आलं नाही. यायची खूप इच्छा! पण वयामुळे कोणी पाठवत नव्हतं. मग कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यावर कुटुंबासोबत ते पुण्याला आले.
नातेवाईकांच्या घरी गेले. पण चांगलेच खंगलेले दिसले. मलूल चेहरा, थकलेली गात्र यामुळे आजोबा खूपच म्हातारे दिसत होते. आजोबांना अशा अवस्थेत बघून धक्काच बसला अशीच प्रत्येकाची भावना होती. पुण्याच्या ओढीने ते कासावीस झाले असावेत बहुदा! पण आता ते पुण्यात आले आहेत. त्यामुळे इथून ते नवा उत्साह घेऊन परत जातील.