- भारतीय महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
अमरावती (प्रतिनिधी) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित भारतीय महाविद्यालय, अमरावतीचा चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रमेश बिजवे, अध्यक्ष भारतीय विद्या मंदिर, अमरावती, प्रमुख अतिथी डॉ. विजयकुमार चौबे, प्र-कुलगुरू, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती, विशेष अतिथी ॲड. यदुराजजी मेटकर सरचिटणीस, भारतीय विद्या मंदिर,अमरावती डॉ. आराधना वैद्य प्राचार्य, भारतीय महाविद्यालय अमरावती, महाविद्यालयाच्या विविध शाखांचे समन्वयक डॉ. अंबरीश काळीकर,कला शाखा समन्वयक, डॉ. संग्राम रघुवंशी, वाणिज्य शाखा समन्वयक, प्रा.नारायण जाधव, विज्ञान शाखा समन्वयक व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून विद्यापीठ गीत सादर झाले..याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.आराधना वैद्य यांनी करून सर्व मान्यवरांचे स्वागत केले.पदवीवितरण समारंभात बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी, एम ए भूगोल, एम.ए.इंग्रजी, एम.एस. सी.कम्प्युटर सायन्स या विषयाच्या सर्व विद्यार्थ्यांना पदवी वितरित करण्यात आली.याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु.प्रिया दरख,हिला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षेत एम.ए. इंग्रजी या विषयात गुणवत्ता यादीत नववे स्थान प्राप्त केल्याबद्दल मेडल आणि समानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. एम.ए.भूगोल या विषयात महाविद्यालयातून प्रथम स्थान प्राप्त करणाऱ्या कु.भाग्यश्री प्रफुल लोखंडे, कु.प्रियंका दीपक गोळंबे विद्यार्थिनींना स्वर्गीय श्रीधरराव चिंचमलातपुरे स्मृती पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
एम.कॉम.या परीक्षेमध्ये कु.प्रतीक्षा दिवाकर पाटणे हिला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत चौथे स्थान प्राप्त झाल्याबद्दल महाविद्यालयातर्फे सन्मानचिन्ह व रोख प्रा.बी.जी.कडू स्मृतिप्रित्यर्थ डॉ.संजय कडू यांचे कडून पारितोषिक देण्यात आले. पदवी वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी डॉ.विजयकुमार चौबे म्हणाले की, आपण सर्वांनी जागतिक महामारीच्या काळात विपरित परिस्थितीमध्ये शिक्षण घेतले आहे. त्या शिक्षणाचे मूल्य संस्कारात परिवर्तित केल्या गेले पाहिजे, आज शिक्षण व्यवस्थेचे स्वरूप सुद्धा बदलत चालले असल्याचे प्रतिपादन करून त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय उन्नतीसाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले व भावी जीवनासाठी शुभेच्छा प्रदान केल्या. याप्रसंगी ॲड. यदुराजजी मेटकर डॉ. रमेश बिजवे यांचे भाषण झाले.पदवी वितरण कार्यक्रमाचे उद्घोषण डॉ. अलका गायकवाड मराठी विभाग प्रमुख यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने पदवी वितरण समारंभाची सांगता करण्यात आली.