संस्कृती आणि संस्कार ही दोन्ही मूल्य भारतीय लोकांसाठी खूप महत्वाचे आहे.. संस्कृतीचे जतन आणि संस्कार पालनाचे अगदी बालवयापासून मनावर प्रतिबिंब उमटत जातात. जिजाऊच्या संस्काराने घडलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि शामच्या आईने घडविलेले साने गुरुजी आजही भारतीय समाजासाठी आदर्श आहे.. भारतीय संस्कृती जगातील सर्व श्रेष्ठ संस्कृती मानली जाते. मानपान, मर्यादा, आपुलकी, माणुसकी, मानवता, आदर या सर्व गोष्टी भारतीय संस्कृतीचे भूषण आहे; पण याच संस्कृती, संस्कारावर पाश्चिमात्य देशातील आधुनिक विचारांचा प्रभाव पडला आणि हळूहळू सर्व बदलत गेले..
पूर्वी समाज हा अज्ञानी, निरक्षर होता, विज्ञान,तंत्रज्ञान, शिक्षण, नसल्यामुळे विकास नव्हता आणि त्याचाच फायदा इंग्रजांनी घेतला आणि भारतावर राज्य केले. त्यांनी भारताची दशा आणि दिशा दोन्ही बदलवून टाकली.. अंधश्रद्धेने भरकटलेला, जातिव्यवस्थेत पिचलेला समाज जागृत व्हायला लागला, शिक्षणाचे महत्व समजायला लागला. “विज्ञान, तंत्रज्ञान, आणि शिक्षण या जोरावर इंग्रज जर आपल्या देशावर राज्य करू शकते तर आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती शिकला तर देशाचा राजकीय, सामाजिक, आर्थिक विकास नक्कीच होईल.” आणि हीच बाब हेरून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी प्रथम पुणे येथे शिक्षणाची दारे उघडी केली.. त्यावेळी रुढी, परंपरा या जाचक गुलामी तत्वामुळे सर्वसमावेशक शिक्षण नव्हते. काही मूठभर लोक सोडले तर बाकी शिक्षणापासून वंचित होते; पण महात्मा फुलेंनी शिक्षणाची गंगा वाहती केली आणि सर्व अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करायला लागले. देशाच्या विकासाची जी मुहूर्तमेढ इंग्रज रोवून गेले त्याला गती प्राप्त झाली. भारतीयांना दिशा तर मिळाली; पण हळूहळू भारतीय लोकांच्या साध्या, सरळ आयुष्यावर पाश्चिमात्य देशांमधील संस्कृती हावी व्हायला लागली.. आणि आपल्या देशातील काही जाचक रुढी, परंपरेमुळे आपल्या संस्कृतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले.. आणि आपणच आपल्याला गावरान वाटायला लागलो.
आधुनिक विचारसरणी आधुनिक राहणीमान यावर जास्त लक्ष केंद्रित होऊ लागले.. माणूस आधुनिक हा राहणीमानाने नाही तर त्यांच्या कर्तुत्वाने होतो.. योग्य संस्कार माणसाला आधुनिक बनवतो.. सुसंस्कृत समाज हाच आधुनिक समाज; हे समजत असूनही आपल्या समाजाला उमजले नाही.. त्यामुळे आधुनिक विचारांचे संदर्भ बदलत गेले! संस्कृती हळूहळू ऱ्हास होत गेली. पिढी नुसार विचार बदलत गेले. आत्मकेंद्री विचारसरणी मनावर आरूढ झाली.. माणसाचं वागणं, बोलणं, राहणं सर्वच बदलत गेलं. कायद्याने दिलेले हक्क त्याची अंबलबजावणी होण्यासाठी व्यक्ती स्वातंत्र म्हणून संस्काराची पायमल्ली होऊ लागली. आपल्या संस्कृतीने जी नीतिमूल्ये जोपासली ती पायधुळी जाऊ लागली.. आधुनिकीकरणाच्या आंधळ्या पट्ट्या डोळ्यावर एवढ्या घट्ट बसू लागल्या की सूर्याच्या प्रकाशातही सात्विक विचारांचे रंग अस्पष्ट दिसायला लागले.. व्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतला जाऊ लागला.. त्याच कारणे अराजकता माजत गेली त्याच पाठोपाठ माणुसकी हरवत गेली. मानसिकता बदलत गेली. आम्ही पेक्षा स्व शब्द आचरणात येवू लागला… अपेक्षा वाढल्या, गरजा वाढल्या, मोठेपणा मिरवण्यासाठी दिखाऊपणाचा खोटा बुरखा घाऊन मिरविण्याची फॅशन आली.. साधेपणा कोसोदुर गेला.. संयुक्त कुटुंब पद्धती लयास गेली. त्यामुळे एकाकी पण वाढले.. “हम दो हमारे दो” ही संकल्पना रुजू झाली.. आणि याच आधुनिक पिढीचे आई -बाबा वृध्दाश्रमात राहायला लागली.. भावनिकता, आपलेपण, कमी होत गेले! “आजीची गोधडी तर केव्हाच हरवली,” कारण त्या गोधडीतील गावरान ऊब आता कुणालाही नकोशी वाटते..
“पूर्वी शेजार धर्म असायचा.” आता शेजारी शेजाऱ्याला ओळखत नाही.. वेळ नसल्यामुळे ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न ही करत नाही.. एकमेकांच्या घरी जाणे म्हणजे अशिक्षित पणा असा समज आहे.. ही बदलती विचारसरणी.. माणसाला माणसापासून दूर नेत आहे.याचे परिणाम बालमनापासून आजच्या तरुणावर प्रतिबिंबित झालेले असतात! त्याच कारणाने मोठ्यांबद्दल आदर कमी होत आहे.. एकलकोंडेपणा वाढत चालला.. खूप जास्त बडबड बोलने हे पण एक अडाणी पणाचे लक्षणे वाटायला लागली.. अंगभर कपडे घालणे असो की हाताने कालवून पोटभर जेवणे असो.. सुशिक्षित लोकांच्या यादीत बसत नाही.. मोबाईल ही एक नवीन फॅशन.. अगदी लहान वयात मुलांच्या हाती आली पब्जी सारख्या अनेक तासनतास बसून वेड लावणाऱ्या गेमची सवय मुलांना लागली. त्यामुळे वाचन संस्कृती जोपासल्या जात नाही.. वाचनाने होणारे प्रगल्भ विचार.. मोबाईलच्या अति वापराने कुमकुवत होत चालले.. सहनशीलता, तडजोड या शब्दाशी नाते तुटत गेले! आणि त्यातूनच “कुटुंबव्यवस्था” विस्कळीत व्हायला लागली.. आजची तरुणपिढी अगदी शुल्लक कारणावरून घटस्फोटापर्यंत जातात.. समजून घेणे आणि समजावून सांगणे हे तर आम्हा शिकलेल्यांना जमतच नाही.. ही आपली वैचारिक प्रगल्भता की, पुस्तकाने आलेले जास्तीचे शहाणपण आपले आपल्यालाचं कळत नाही..
संविधानाने दिलेले अधिकार.. त्याचा उपयोग देशाचा विकास, संघटन कौशल्य, शिस्तबद्धता या गोष्टीचा अंगीकार करायचा सोडून स्वातंत्र्याच्या नावावर भरकटत चाललो..ज्या शिक्षणाने आपण गुलामीतून मुक्त झालो.. सशक्त झालो.. तीच या देशाचे भविष्य असलेली तरुणाई व्यसनाधीन होत चालली.. स्वतःचा उच्च दर्जा प्रस्थपित करण्यासाठी पार्ट्या, मद्यपान, याला महत्व देऊन त्यालाच खरा जीवनाचा आनंद समजू लागली. प्रेमासारख्या पवित्र शब्दाचा तर पाचोळाच करून टाकला.. एका पेक्षा जास्त गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असणे स्टेट्स वाटायला लागले.. “जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी” या म्हणीचा मतितार्थ आधुनिक स्त्री विसरत चालली.. काळाच्या ओघात अनेक मुलींच्या हातापर्यंत दोरी पोहचत नाही.. “एक स्त्री शिकली तर संपूर्ण कुटुंब सुसंस्कृत होईल..” कारण समाजाचा, देशाच्या प्रगतीचा मापदंडच स्त्री शिक्षणावर अवलंबून आहे.. असे बाबासाहेबांनी म्हंटले आहे.. स्त्रियांची प्रगती हीच देशाची प्रगती.. पण त्याच आधुनिक विचारसरणीच्या स्त्रिया आज व्यसनाधीन होत चालल्या.. काय मुलांवर संस्कार करणार.. तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी राजेंना काय वाचून दाखवणार.. बाबासाहेबांना काय समजून सांगणार.. ज्या सावित्रीने जिवाचे रान केले तिला तरी कुठे लक्षात ठेवणार.. ठेवले असते तर स्त्रीशक्ती आणि दायित्व कळले असते.. पुरुषांची बरोबरी करतांना पानटपरीवर आम्ही का उभ राहू नये! आम्ही का बियरबार मध्ये जाऊ नये! का सिगारेट ओढू नये! असा समान हक्कासाठी अट्टाहास केला नसता..
जेव्हा मुली हातात बियर आणि सिगारेट घेऊन दिसतात तेव्हा त्यांच्या विचारांची कीव येते.. संत महात्म्याच्या भूमीत जन्म घेतलेल्या मुली काय शिकल्या असतील त्यांच्या कडून.. फक्त पुरुषांची बरोबरी करायची म्हणून वाममार्ग.. त्यांच्या जडणघडणीची जननीच तू आहे.. त्यामुळे पुरुषापेक्षा केव्हाही स्री श्रेष्ठ आहे.. जिजाऊ, शामची आई जरी नाही होता आले तरी, त्यांचा आदर्श घेऊन प्रयत्न नक्की करू शकतो…मुलांवर कसे चांगले संस्कार करता येतील.. त्यामुळे त्याचे भविष्य उज्ज्वल होईल यावर लक्ष केंद्रित केले तर मुलेही पानटपरीवर, बियरबारमध्ये जाणार नाही, मुलींची छेड काढणार नाही… विकृतीला बळी पडणार नाही.. यासाठी स्त्री सक्षमीकरण होणे गरजेचे आहे.. घराघरातून मूल्यवर्धक शिक्षण मिळणे ही काळाची गरज आहे.. आमच्या अनेक भगिनींना सावित्री मुळे त्या घडल्या हे माहीत नाही. जिजाऊ चे कर्तुत्व माहित नाही… कारण वाचन नाही “आडाताच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार” ही गत आहे.. कदाचित देश जिथे जात आहे. जे काही घडत आहे त्याला आपणच कुठेतरी जबाबदार आहे. म्हणून आज मुलींनी सावित्रीला जिजाऊला.. अहिल्याबाई होळकर, ताराबाई शिंदे यांना वाचणे गरजेचे आहे.. तेव्हाच भरकटलेल्या आधुनिक विचारांना योग्य दिशा मिळेल…
मातृत्व नाकारणे ही एक नवीन आधुनिक विचारसरणी रूजायला लागली.. आणि त्यातूनच “लिव्ह इन रिलेशनशिप” कुमकुवत नात्याची डोर जन्माला आली.. जिच्या हातात उद्याचे भविष्य घडविण्याची ताकद आहे.. त्या भविष्याची जबाबदारीच ओझ वाटायला लागली.. जीवनाचा आनंद लुटायचा या विचाराने निवडलेला मार्ग चुकीचा की बरोबर ही विचार शक्ती कुमकुवत होत चालली. इच्छा मारणे म्हणजे स्वातंत्र्यावर गदा येणार ही गोष्ट विचारांना चिकटत चालली आणि त्यामुळे आपणच आपले गुलाम होत चाललो.. ज्या गुलामीतून आपल्याला सुटका मिळाली… एक अभिव्यक्ति म्हणून जगण्याचे स्वतंत्र मिळाले; पण आधुनिकीकरण नी अंधानुकिकरण यांच्या रेषा समांतर झाल्या.. आणि आपलीच संस्कृती जोपासतांना आपल्याला कुणीतरी आपल्या डोक्यावर भार ठेऊन गेले आणि ते ओझे आपल्याला उचलायचे आहे. असे झाले.. जेव्हा भार होतो तेव्हा ती गोष्ट हळूहळू जमिनीवर येते.. आकाशात उडतांना जमीन गोलच वाटायला लागते.. पण तिच्या कुशीत जे हिरे मानके दडलेले आहे.. आणि ती आपल्याला काय देते! याचा विसर पडत जातो. तीच अवस्था सध्या आपली आहे.
इतिहासाची पाने पालटून बघता आली तर नक्की बघावी.. म्हणजे आजची भरकटलेली तरुणाई यांना जीवनाचा अर्थ समजेल.. जगण्याचे संदर्भ कळून येईल.. ज्यांनी बलिदान दिले.. यत्न केली त्यांच्या संघर्ष गाथेवर आपल्या स्वातंत्र्याची उभारणी आहे.. त्यांना स्मरण करुया. त्यांच्या विचारांचे अनुसरण करुया.. त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव ठेवूया… आपली संस्कृती आणि संस्कार जोपासुया.. माणुसकी जपुया.. मानवता पाळुया.. सद्गुण अंगीकारू.. विचारांची संपत्ती सदृढ करूया.. पाश्चात्य गुलामिला तिलांजली देऊया आणि आपले विचार आपली संस्कृती, संस्कार याचा अभिमान बाळगून चांगले जगूया..!!
- कुठल्याही सवयीचे गुलाम न होता स्वातंत्र्य उपभोगुया..!!!
- उज्ज्वल भविष्यासाठी नवविचारांची कांती करावी. नवी प्रेरणा.. नवे स्वप्न, नवे ध्येय.. यांची दिशा ठरवावी..
- सुंदर आयुष्याला देऊ आव्हान
- या देशाच्या प्रगतीचे ठेवू भान..
- अबाधित ठेवू स्वाभिमान
- जोपासू आत्मसन्मान..
- मी भारताचा नागरिक म्हणून
- सदैव करू आभिमान..
- आम्हा मिळाले संस्कृती, संस्काराचे वरदान
- आम्ही आधुनिक देशाचे आधुनिक नवजवान..
- राखू देशाची आन, बान, शान…
आजच्या पिढीला या सर्व गोष्टी मनावर घेणे खूप गरजेचे आहे… समजणे गरजेचे आहे… खरे तर..”आपली संस्कृती पाश्चात्य देशात उदयास येत चालली आणि आपण मात्र पाश्चिमात्य देशांमधील संस्कृतीचे अनुकरण करून बेगडी जगण्यासाठी उसण्या गारगोट्या खेळत आहे..”पिढीनुसार विचार बदलत जातात आणि ते साहजिकच आहे.. बदल ही काळाची गरज आहे; पण समृध्द वर्तमान ही देशाची गरज आहे. “भूतकाळाचे बोट पकडूनच वर्तमान समृध्द करता येतो आणि समृध्द वर्तमान हेच देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य आहे..”
- -सौ निशा खापरे
- नागपूर
- 7057075745
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–