जिल्ह्याच्या ठिकाणावरून गावाकडे परत येत होतो.वाटेतच दिपाचे गाव लागले.गाडीचा रोख तिच्या गावाकडे वळवून दीपाच्या घरी आलो.तिच्या घराजवळ गाडी थांबताच आणि तिच्या घरात प्रवेश करताच तिला आश्चर्यचा धक्का बसला.कारण तिने वारंवार घरी येण्याचे निमत्रण देऊन सुध्दा तिच्या कडे जाण्याचा योग काही येत नव्हता.अचानक तिच्याकडे जाण्याचा योग आला.आम्ही घरात प्रवेश करताच ती करीत असलेली कामे बाजूला सारून आमचे आगत-स्वागत केले. आदर सत्कार केला.इकडील-तिकडील विचाराच्या देवाणघेवाणीनंतर तिच्या वैभवशाली घराकडे नजर फिरवून अलगदपणे विचारले की,छान संसार थाटला.चांगली प्रगती दिसतेय.तुम्ही तर चांगलाच जम बसविल आहे.शून्यातून विश्व निर्माण करून दाखविले आहे.त्यांची अल्पावधीतील प्रगती पाहून मन भरून आले.तुमच्या कर्तृत्वला दाद द्यावी लागेल.खरोखर तुम्ही ग्रेट आहात.ममतेचा सागर आहात.प्रेमविवाह करणाऱ्यां जोडप्यासाठी खरा आदर्श आहात.असे बोलत असतानाच माझे शब्दसुमने मध्येच खंडित करून अगदी स्मितहास्यातच दीपा म्हणाली,काय भाऊ! देवाची कृपा आहे.आणि तुमच्या सारख्या अनेक हितचिंतकाचे सहकार्य/पाठबळ,आणि जिवाभावाच्या लोकांनी समजून घेण्याची वृत्ती तथा मेहनतीचे फळ आहे,असे म्हणत असतानाच दीपा एकदम वर्तमानातून भूतकाळात शिरली. भूतकालीन आठवणीच्या स्मरणाने तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा ओथंबून वाहु लागल्या होत्या.काही क्षणातच भानावर येऊन (डोळे पुसत)काय पण;मी माझेच रडगाणे गात आहे;बरं जाऊ द्या! तुमचे कसे काय चालू आहे?अशा प्रश्नांने अलगदपणे भूतकालीन विचारातून बाहेर पडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.दिपाच्या सांसारिक जीवनातील सुख-दुःखाच्या भरती-ओहोटीचा मी साक्षीदार आहे.तिच्या आयुष्यातील आठवणीने आज ही अंगाला काटे येते.इतक्या वेदना,दुःख आणि कौटुंबिक तसेच आर्थिक संकटे आवासून उभे असतानाही दीपाने प्रगतीचे शिखर गाठले.हे पाहून आनंदही तथा अभिमानही तितक्याच आवेशाने वाटला.लवकरच दीपाचा निरोप घेऊन परतीच्या मार्गावर भरधाव वेगाने निघून आलो.
सायंकालीन वेळ असल्याने रस्ता सामसूम होता.आमची गाडी भरधाव वेगाने गाव जवळ करु लागली होती.कडक थंडीची वेळ असतानाही दीपाच्या जीवनातील चढ-उताराने शरीरावर थंडीचा प्रभाव काही जाणवत नव्हता. दीपा तशी अगदी लाडात वाढलेली मुलगी.मूळची मुंबईसारख्या शहरातील सुखवस्तू कुटुंबातील लाडकी मुलगी.सर्व गुण संपन्न असलेल्या दीपाचे आई-वडील उच्चपदस्थ शासकीय नोकरीत होते.मुंबई सारख्या शहरात स्वतःचे घर.त्यामुळे तिला कधीही कशाचीच कमतरता भासली नाही.तरीही दीपाने वाढत्या वयानुसार जबाबदारीची जाणीव स्वीकारून मुंबईतच एका खाजगी कंपनीत नोकरी स्वीकारली.नोकरी करीत असताना त्याच परिसरातील कंपनीत नोकरीत असलेल्या राजसोबत मैत्रीचे संबंध निर्माण झाले.मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले याची तिला थोडीशीही कल्पना आली नाही.अखेर त्यांच्या प्रेमाचा गुलमोर चांगलाच फुलू लागला.
ड्युटीवर जात असताना दीपा आणि राज एकाच मार्गाने ये-जा करीत असल्याने त्यांच्या भेटीगाठीत कधीच खंड पडत नसे.वाढत्या सहवासामुळे ते भावी जीवनाचे स्वप्नही रंगू लागले होते.जीवनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत एकमेकांना साथ देण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या आणि त्यां निभावल्या सुद्धा.
असेच दिवसामागून दिवस तथा वर्षामागून वर्षे जात असतानाच त्याच्या प्रेमाच्या चर्चाही बऱ्याच प्रमाणात होऊ लागल्या होत्या.अशाचप्रकारच्या उलटसुलट चर्चेला उधाण येण्याऐवजी आई-वडिलांच्या मर्जीविना विवाहबद्ध होण्याचा त्यांनी निर्णय/निश्चय केला होता.आई वडिलांच्या मर्जीविना विवाह होणे म्हणजे आई-वडिलांच्या विश्वासघात होईल या दृष्टीने तिला चांगलेच पछाडले होते.पण म्हणतात ना प्रेम किती ही लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी आज नाही तर उद्या सर्वांनाच माहीत होते.याच पार्श्वभूमीवर दीपाच्या घरच्यांना तिच्या प्रेमप्रकरणाची चाहूल लागली होती.याबाबत दीपाला आई-वडिलांना प्रेमप्रकरणाची व लग्नाचा घेतलेला निर्णय सांगण्याचे धाडस होत नव्हते.कारण दीपा आणि राजच्या लग्नाला तिच्या कुटुंबाकडून/मंडळी कडून प्रखर विरोध होणार हे ही तितकेच सत्य आहे हे दिपाला चांगलेच माहीत होते.राज त्यांच्या पसंतीत कधीच उतरणार नाही याची दीपाला परिपूर्ण कल्पना होती.कारण राज हा भिन्न जातीचा तसेच ग्रामीण भागातील युवक होता.दीपाला राजबाबत सविस्तर कल्पना असली तरी उच्चविद्याविभूषित दीपाचे आई-वडील हे खेडूत व अस्थायी नोकरी करणाऱ्या राज सोबतच्या विवाहाला कदापिही मान्यता देणार नव्हते.म्हणून त्यांच्या विवाहाला दीपाच्या घरील प्रखर विरोध झाल्याने अखेर काही मित्र मंडळीच्या सहकार्याने दीपाच्या आई वडीलाच्या पश्चात राज व दीपा विवाहबद्ध झाले.दीपाने न विचारता चक्क आंतरजातीय विवाह केल्याने दोघांनाही धडा शिकविण्याचा वेळप्रसंगी त्यांना संपविण्याचा निर्णय दीपाचे कुटुंबातील मंडळीनी घेतला असल्याची माहिती त्यांना मिळाली.त्यामुळे ते चांगलेच धास्तावले.अखेर त्यांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला होता.दोघेही मुंबईतून रातोरात राजच्या गावाला(खेडेगावी)निघून आले ते कायमचेच.
मुंबई सारख्या शहरातुन गावात मुलगी आल्याने खेड्यागावात कुतूहलाचे वातावरण झाले.उत्सुकतेपोटी त्यांना भेटण्याची व पाहण्याच्या इच्छेने गावातील लोक राजच्या घराकडे येऊ लागलीत.त्यात काही विरोधक तर काही समर्थक असे.सुस्वभावी आणि मितभाषी दीपा पहिल्याच भेटीत सर्वांनाच आपलीशी वाटु लागली.गावात एकत्रित कुटुंबात तिचा संसार बऱ्यापैकी सुरळीत सुरू झाला होता.कालांतराने येनकेनप्रकारे राजच्या कुटुंबात सुद्धा कुरबुरी सुरू झाल्यात.विशेष म्हणजे राज आणि दीपा कुठलेही कांम करीत नव्हते त्यामुळे ते पूर्णपणे कुटुंबावर आश्रित होते.त्यातच आई व्यतिरिक्त अन्य भाऊबंदकीचा काही दिवसानंतरही विरोध कायमच असल्याने ते अगदी संकटात सापडले होते.परंतु काही महिन्यातच दीपाने परिस्थितीवर यशस्वी मात करित राजच्या परिवारासोबतच गावकऱ्यांची सुद्धा मने जिंकली.म्हणूनच तिच्याकडे सर्वजण आदराने पाहून बिनदिक्कतपणे “ताई” म्हणून संबोधत असे.पण तत्पूर्वी मात्र अनेक अडचणी व समस्येला तिला सामोरे जावे लागले ,हे ही तितकेच सत्य आहे.
दीपा व राजने सर्वांची सहानुभूती मिळविली असली तरी उदरनिर्वाहाचा खरा प्रश्न त्यांच्यासमोर होता.निव्वळ सहानुभूतीने पोट भरत नाही. मुंबई वरून गावी येताना सोबत आणलेला सर्व पैसा खर्च झाला.प्रारंभी सहानुभूती म्हणून काही निवडक लोकांनी मदतीचा हात दिला पण कालांतराने समाजाकडून होणारी मदत थांबली.त्यातच त्यांना कष्टाची कामे करणे अवघड जात होते.त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिकच बिकट झाला होता.परिणामतः त्यांना विविध प्रकारच्या हाल-अपेष्टाना सामोरे जावे लागत असे.परंतु दीपा हिम्मत हरली नाही.उलट तितक्याच ताकदीने संकटाला सामोरे जात होती.राजही तितक्याच खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा होता.दीपा वातावरणाशी पूर्णपणे समरस होत “आलिया भोगासी,असावे सादर”या वृत्तीने दुःखाला सुख समजून जीवन जगत होती.मात्र कालांतराने कुटुंबातील वाढत्या समस्या तथा राजला कुटुंबा कडून होणारा प्रखर विरोध यामुळे राज सुद्धा चिडचिड करू लागला. छोट्या मोठ्या बाबीवरून त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक/खटके उडत असे.कधीकधी तर त्यांचात एवढा बेबनाव होत असे की,एखाद्याचे नुकसान होणार की काय?अशी भीती वाटत असे.कळतं नकळत राजला नंतर त्यांच्या वागणुकीतील बदल स्वतःलाच जाणवू लागला.म्हणून त्यांनी स्वतः ला सुधारून घेतले.परिणामतः त्याच्या व्यवहारात समन्वय होऊन दीपाला त्रास देण्यापेक्षा तिला समजून घेण्याची गरज राजनी ओळखली.कारण ज्या वैभवात व लाडात वाढलेली दीपा आपल्या प्रेमासाठी सर्व सुखांचा व आई-वडिलांचा त्याग करून आपली जीवणसांगिनी झाली. त्या अर्थाने दीपाला त्रास देणे म्हणजे तिच्यावर मानसिक दडपण टाकल्यासारखे आहे.तिच्या गळचेपीची राजला लवकरच जाणीव झाली.म्हणूनच राज तिला समजून घेऊन साथ देऊ लागला.एकमेकांवर दोषारोपन करण्यापेक्षा खांद्याला खांदा लावून सुखी संसार पुढे रेटण्याचा निर्धार केला.
दोघेही सुखात वाढले असल्याने काबाडकष्ट करणे तितकेच जिकरीचे होते.नव्हे! फारच कठीण होते.परंतु कष्ट करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. म्हणूनच कधीही शेत न पाहिलेल्या,पीक व तनकट यांच्यातील फरक न समजणार्या दीपाने गावातील महिला कामगारांसोबत शेतावर मजुरी साठी जाण्याचा निर्णय घेतला. पावसाळ्यात तर टोंगळा-टोंगळा गाट्यात(फसणीत) नींदन खुरपण करायला जाऊ लागली.परंतु पीक व तणकट यांच्यातील फरक न समजणार्या दीपाने शेतावर काम करण्यापेक्षा पिकाचेच जास्त नुकसानच काढत असे.काही काही शेतमालक तिची परिस्थिती समजून घेत असे.पण सर्वच शेतमालक सारखे असतात का?पण बहुतांश शेत मालकांनी मुंबई ची पोरगी आपल्या शेतात कामाला येत आहे याच अभिमानाने दीपाच्या चुकाकडे दुर्लक्ष करीत असे.आपल्या गोड व मधुर वाणीने तसेच प्रेमळ सुस्वभावाने सर्वांची मने तिने जिंकली होती.म्हणून ती गावची सून नव्हे तर गावची मुलगी म्हणून तिने आपले स्थान निर्माण केले होते.
कालांतराने काही वर्षातच आपल्या कष्टाने/मेहनतीने तथा जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर, परिस्थितीशी प्रखर झुंज देत संसाराचा रथ योग्य मार्गावर आणण्यास दोघेही यशस्वी झाले. याच कालखंडात त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले.घरात लक्ष्मी आल्याचे समजून तिचे चांगले स्वागत केले.सुदैवाची गोष्ट म्हणजे मुलीच्या जन्मापासून त्यांच्यात भरभराट होत गेली.याच दरम्यान राजने नजीकच्या शहरात स्वमालकीचा एक छोटा-मोठा व्यवसाय सुरू केला.व्यवसायात काही काळ दीपानी सुद्धा मदत केली.व्यवसायाचा चांगला जम बसल्यानंतर दीपाने सुद्धा घरीच ग्रूहपयोगी वस्तू बनविण्याचा व्यवसाय सुरू केला.राज व दीपा या दोघांच्याही व्यवसायातून बऱ्यापैकी मिळकत व बरकत होऊ लागली.त्यातच त्यांना पुढे पुत्रप्राप्ती सुद्धा झाली.”हम दो हमारे दो”असा त्यांचा छोटासा संसार अगदी आनंदात जीवन व्यतीत करीत आहे.दोन अपत्त्यासह शहराच्या ठिकाणी स्वमालकीच्या घरात वैभव संपन्न जीवन जगत आहे ते केवळ आत्मविश्वास,जिद्द,मेहनत तथा एकमेकाच्या सहकार्यामुळेच ना ! राज व दीपाचा प्रेमविवाह झाल्यानंतर आज ज्या स्थितीत आहे त्यासाठी त्यांना कितीतरी कष्ट उपसावे लागले याची कल्पना आपण करू शकाल काय?समाज अगदी सहानुभूती दर्शवित असला तरी अनेकांनी मदती ऐवजी प्रतिष्ठित समजणाऱ्या लोकांनी विशेषतः दोघांच्याही कुटुंबानी त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्यांच्यात अडचणीच आणण्याचा प्रयत्न केला आहे.समाजही अडचणीच्या वेळेस मदत करण्याऐवजी मदतीचे हात थांबविण्याचे प्रयत्न करतात. अशा लोकांना आपण काय म्हणावे?याउलट सुखी संसाराचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्रच ना! हे सर्व करण्याचे मूळ कारण म्हणजे त्यांनी प्रेमविवाह केला म्हणून ना! प्रेमविवाह करणे गुन्हा आहे का?त्यांनी निखळ प्रेम केले. एकमेकाचा विश्वासघात न करता जाती धर्माच्या शृंखला तोडून विवाह बंधनात अडकले. प्रेमविवाह केल्याने ते गुन्हेगार ठरतात का?नव्हे!नकली प्रतिष्ठेचा बुरखा बांधून असलेल्या या समाजातील तथाकथिताना धक्का पोहोचतो म्हणूनच प्रेमविवाह करणाऱ्याना येनकेनप्रकारे त्रास दिला जाती..नकली प्रतिष्ठेचे जीवन जगण्याऐवजी एकमेकाच्या प्रेमाच्या आधारावर सुखी संपन्न तथा समाधानी जीवन जगणे योग्य नाही का?परंतु तथाकथित लोक यास विरोध करून प्रेमविवाहासारख्या पवित्र बंधनाला बदनाम करण्याचा आटापिटा केला जातो.त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दीपा-राज होय! सध्या विवाहासारख्या पवित्र बांधनाला बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.त्यातच कुठे हुंड्याच्या छळापायी आत्महत्या तर कुठे प्रेमीयुगुलाच्या घरच्या मंडळीकडून झालेल्या प्रखर विरोधामुळे प्रेमीयुगुलाने केलेली आत्महत्या किंवा पळून जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. याला कारणीभूत कोण? समाज की नकली प्रतिष्ठेवाले लोक? प्रेमविवाहाबाबत समाजाचा तथा बहुतांश प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांच्या आई-वडिलांचा तथा समाजाचा दृष्टिकोन अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात बदललेला दिसत नाही.अरेंज मॅरेज बाबत जशा त्यांच्या जबाबदाऱ्या असतात तशा लवमॅरेज बाबत नाही का? नेमके असेच दीपा बाबत घडलेले आहे.आपल्या स्वकर्तुत्वाने सगळ्यांना जिंकू शकली पण आई-वडिलांना जिंकू शकली नाही.यात दोष कुणाचा?दीपाचा की दीपाच्या आई-वडिलांचा (कुटुंबाचा)? दीपा सारख्या सोज्वळ,प्रेमळ, निगर्वी,ममतेचा सागर असलेल्या दीपाला अशा प्रसंगाला बळी पडावे लागले आहे.दीपाच्या लग्नाला चक्क बारा-तेरा वर्षे होऊन सुद्धा तिच्या आईवडीलाचे मतपरिवर्तन झाले नाही हे खेदाने म्हणावे लागते.कोणताही अपराध न करता केवळ प्रेमविवाह केल्याने, दीपाला आई वडिलांच्या प्रेमाला पोरके व्हावे लागल्याचे शल्य कायमचे तिच्यासमोर दिसते आहे.दीपाचे आई वडील तिला कधीच भेटणार नाही का?ह्या एकाच कारणाने दीपा कितीही वैभव संपन्न तथा सुखी-समाधानी जीवन जगत असली तरी आई-वडिलांच्या प्रेमाविना तिचे जीवन आजही अधांतरीच आहे———!
- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
- मु.भांबोरा,जि.अमरावती
- मोबा.९९७०९९१४६४