- * हिवरखेड मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र दापोरी येथे बसविण्याची रुपेश वाळके यांची मागणी !
- * हिवरखेड मंडळातील शेतकरी मृग बहाराच्या फळ पीक विम्याच्या मदतीपासून वंचित !
- गौरव प्रकाशन वृत्तसंकलन
मोर्शी : शेतक-यांना हवामानाचा अचूक अंदाज मिळावा व वातावरणातील बदलामुळे होणारे शेतीचे संभाव्य नुकसान टाळता यावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या अनुषंगाने मोर्शी तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु हिवरखेड मंडळातील स्वयंचलीत हवामान केंद्र मंडळाच्या मध्यभागी न बसविता मंडळाच्या अखेरच्या टोकाला बसविल्यामुळे हिवरखेड मंडळातील फळ पीक विमा काढलेले हजारो संत्रा उत्पादक शेतकरी मृग बहार फळ पीक विमा मदतीपासून वंचित राहिल्यामुळे हिवरखेड मंडळातील हजारो संत्रा उत्पादक विमा धारक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपायांचे नुकसान झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी केला आहे.
हिवरखेड महसूल मंडळ अंतर्गत येणाऱ्या हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२१-२२ चा मृग संत्रा बहार फळपीक विमा मोठ्या प्रमाणात काढलेला होता कृषी विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे हवामान केंद्र चुकीच्या ठिकाणी बसविल्यामुळे हिवरखेड मंडळामध्ये ५ जून ते १५ जुलै दरम्यान दापोरी येथे ८५.५ मिली मीटर पासवसाची नोंद झाली असून उमरखेड येथील स्वयंचलित हवामान केंद्रावर १९५ मिली मीटर पावसाची नोंद झाल्यामुळे हिवरखेड महसूल मंडळामध्ये अत्यल्प पाऊस होऊनही फळ पीक विम्याच्या मदतीपासून वंचित राहावे लागले होते त्यामुळे हिवरखेड मंडळातील हजारो संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते.
अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांच्या मागणीची दखल घेऊन हिवरखेड मंडळातील उमरखेड येथील स्वयंचलित हवामान केंद्राची रॅंडम पद्धतीने तपासणी करून या हवामान केंद्रातील संवेदक तापमान, पर्जन्य, आर्द्रता आणि वारा या महत्त्वपूर्ण घटकांच्या नोंदी घेण्यात आल्या आहे.
स्वयंचलित हवामान केंद्रामध्ये जमा झालेली हवामानविषयक माहिती हवामानाधारित पीकविमा योजना, हवामान अंदाज, पीकविषयक सल्ला, हवामानविषयक संशोधन आणि इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी महत्वाची ठरत असल्यामुळे हिवरखेड मंडळातील शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये शेतकऱ्यांचे चुकीच्या नोंदीमुळे नुकसान होऊ नये व विम्याच्या मदतीपासून वंचित राहू नये यासाठी उमरखेड येथील हवामान केंद्राची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, उपसरपंच प्रभाकर तायवाडे, मंडळ कृषी अधिकारी म्हस्के साहेब, मंडळ अधिकारी खेरडे साहेब, हवामान केंद्राचे प्रतिनिधी यांना सोबत घेऊन हवामान केंद्राची तपासणी करण्यात आली. उमरखेड येथील स्वयंचलित हवामान केंद्र मंडळाच्या मध्यभागी दापोरी येथे स्थलांतरीत करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य रूपेश वाळके यांनी केली असून त्यासंबधी अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सादर करण्याच्या सूचना कृषी विभागाला यावेळी देण्यात आल्या.