Sunday, October 26

बदाम-काजूवर जगणारा ८ कोटींचा विधायक!

८ कोटींचा मुर्रा रेडा ‘विधायक’, बदाम-काजूवर जगणारा आणि मेळ्यात सर्वांचे लक्ष वेधणारा.

मुंबई: उत्तर प्रदेश मेरठच्या किसान मेळ्यात चर्चेचा विषय बनला तो ना मंत्री, ना अभिनेता, तर ‘विधायक’ नावाचा मुर्रा जातीचा रेडा! या रेड्याची किंमत ऐकून उपस्थित शेतकरी आणि पशुपालक थक्क झाले ८ कोटी रुपये!

हरियाणाचे पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी नरेंद्र सिंह यांचा हा रेडा आपल्या आकर्षक शरीरयष्टीमुळे आणि दमदार लुकमुळे सगळ्यांचे लक्ष वेधतो. त्याला पाहण्यासाठी लोक दूरदूरहून मेळ्यात आले आणि मोबाईलमध्ये फोटो काढण्याचा स्पर्धा सुरू झाली.

विधायकची खासियत नरेंद्र सिंह सांगतात, “आमचा विधायक रोज बदाम, काजू, देशी तूप, सरसोंचे तेल खातो आणि ८ ते १० लीटर दूध पितो.” याच आहारामुळे तो मेळ्यात सलग दोन वर्षे ओव्हरऑल चॅम्पियन ठरला आहे.

मालक नरेंद्र सिंह यांनी सांगितले की, ‘विधायक’ला विकायचा नाही, पण त्याच्या वीर्य विक्रीतून (Semen Sale) ते दरवर्षी लाखोंची कमाई करतात. याचा फायदा शेतकऱ्यांसाठी देखील आहे कारण चांगल्या वंशाची मुर्रा म्हशी त्यांच्या कुटुंबात येऊ शकते.

यंदाच्या किसान मेळ्यातही ‘विधायक’ने सगळ्यांवर बाजी मारली. गायी, म्हशी, वळू, घोडे सर्व स्पर्धक होते, पण किंमत, डौल आणि लोकप्रियतेच्या बाबतीत विधायकचं स्थान सर्वोच्च राहिलं. शेतकरी आणि पशुपालकांनी तर हसत हसत म्हटलं, “असा रेडा जर संसदेत गेला, तर देशात दूध आणि तूप दोन्ही वाढेल!”

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.