Sunday, October 26

ओला दुष्काळावरून उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना खोचक सवाल

उद्धव ठाकरे यांनी ओल्या दुष्काळाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला

मुंबई : राज्यभर पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सरकारकडून अद्याप ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यात आलेला नाही. या मुद्द्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली.

“विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे दु:ख पाहून वेदना होत आहेत, असं फडणवीस म्हणाले होते. पण विरोधी पक्षनेते असताना वेदना होतात आणि मुख्यमंत्री असताना त्या वेदना होत नाहीत का? मी सत्तेत असताना शेतकऱ्यांचे दु:ख पाहून कर्जमाफी दिली होती. मग आता मात्र शब्दांचा खेळ करून मदत नाकारली जातेय का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

ठाकरेंनी यावेळी 16 ऑक्टोबर 2020 रोजीचे पत्र दाखवत फडणवीसांना चिमटा काढला. “तेव्हा फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यांनीच मला ‘ओला दुष्काळ जाहीर करा’ असं पत्र पाठवलं होतं. आज मात्र मुख्यमंत्री झाल्यावर तेच फडणवीस वेगळं बोलतायत. एखादा शब्द किंवा संज्ञा नाही म्हणून शेतकऱ्यांना मदत रोखणार का? पद बदललं की भावना आणि शब्दही बदलतात का?” असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

तसेच फडणवीसांच्या शैलीवरूनही उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला. “गिचमिड म्हणजे देवेंद्र फडणवीस. कारण त्यांची सहीच गिचमिड असते, समजत नाही. पण तेव्हा त्यांनी स्पष्ट मागणी केली होती. आता मात्र शेतकऱ्यांचा जीव गेला तरी सरकार केवळ कागदोपत्री शब्दांमध्येच अडकले आहे,” असा थेट आरोप ठाकरेंनी केला.

👉 शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार शब्दांचा खेळ करत आहे, अशी टीका करून उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला जाब विचारला.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.