
ती खूप बदलली आहे
समांतर आरक्षणातून मिळालेल्या नोकरीने घरादारात तिचे
महत्व वाढले आहे..
ती अबला नव्हे
आता सबला झाली आहे..
हो, ती खरोखरच आता धीट झाली आहे.
दर गुरूवारी धावपळ करते..
नारळ आणते..
साखर आणते..
आरतीसाठी पुढे सरते…
सर्वांना हिंमतीने प्रसाद वाटते..
आता ती खूप बदलली आहे,
कुंकूवाच्या जागी टिकली लावते.
तिला कळालेय कपड्यांचे मोल,
म्हणूनच ती सुंदर पेहराव करते,
मॅचिंगवर दक्षअसते.
वाचनातही ती मागे नाही,
ती वाचते प्रवासातही
वैभवलक्ष्मीची पोथी…
दानातही ती कमी नाही,
म्हणूनच ती संक्रांतीच्या वानात वाटते
श्रद्धेने व्रताच्या पोथ्या…
हजारो वर्षाची लेखन बंदी झुगारुन
ती लिहू लागलीय आता
२१ हजार वेळा गायत्रीमंत्र
तिच्या नोटबूकात…
तिला चांगला आवाज लाभलाय,
म्हणूनच तर ती सत्संगात जाते,
सुरेल आवाजात गाते…
एवढेच काय…
वेतन आयोगातील पगार वाढीची
आकडे मोड करता करता
तिला आता चांगल्याच कळू लागल्यायत गणिती क्रिया…
ती खुष आहे एरियसच्या संभाव्य आकड्यावर.
म्हणूनच तिने ठरवलेय
येणाऱ्या उन्हाळ्यात चारी धाम करायचे…
तिर्थास जाण्यासाठीच तिला घ्यायची आहे यंदा एल्टीसीची रजा…
तिच्या पायात आता बळ आलेय…
म्हणूनच ती देवादिकांच्या पायऱ्या चढते भराभर…
दु:ख एवढेच की,
या पायांना बळ देणाऱ्या ज्योती अन सावित्रीची
तिला घ्यावीशी वाटत नाही भेट..
तिच्या पर्यटनाच्या डायरीत शोधूनही सापडत नाही नायगाव, भिडेवाडा नि गंजपेठ…
– रवींद्र साळवे, बुलढाणा
मो. 9822262003
—————————-
—————————-