‘कामगाराच्या श्रमाला तोड नाही’
“श्रम हे भांडवलाच्या आधीचे आणि तसेच स्वतंत्र आहे. भांडवल हे केवळ श्रमाचे फळ आहे आणि जर श्रम आधी अस्तित्वात नसते तर ते कधीही अस्तित्वात आले नसते. श्रम हे भांडवलापेक्षा श्रेष्ठ आहे आणि ते अधिक उच्च विचारास पात्र आहे. – अब्राहाम लिंकन”
आज जिकडे तिकडे सहज नजर टाकली तर आपल्याला सर्वत्र मोठं मोठ्या इमारती, पुल, फ्लाय ओव्हर, मॉल व भव्यदिव्य इमारती दिसतात. विमानतळांची, रेल्वे स्थानकांची संख्या व विस्तार मोठ्या प्रमाणात झाल्याचा आढळतो आहे. कुठल्याही शहरात प्रवेश करतांना आपल्याला बायपास तर मोठ्या शहरात एक्सप्रेस वे दिसतो. प्रवास करतांना मग रेल्वे, बस, कार, आणि विमानातून असो आपल्याला सर्व शेती अगदी हिरवीगार पिकांसह डोलतांना आढळते. हे सर्व चित्र बघितल्या नंतर असं वाटत की ह्या पृथ्वीतलावर नंदनवन थाटलेले आहे आणि ही पृथ्वी सुजलाम सुफलाम आहे. सर्व नागरिक अगदी आनंदाने आपले जीवन जगत आहेत.
परंतु आपली सहज नजर शेतीतल्या झोपडीत जाते, पुलाखालच्या, फ्लाय ओव्हरच्या खाली कोपऱ्यात / कडेला झोपडीकडे जाते. मोठं-मोठ्या इमारतीच्या कडेला बांधकाम करणाऱ्या मजुरांकडे जाते. तर आपले मन मात्र खिन्न होते. जो शेतकरी आपल्या शेतात राब राब राबतो व त्याच्या राबल्याने आपल्या देशातील अन्नधान्याची कोठारे तुडुंब भरलेली आहेत. मॉल मध्ये अन्नधान्याची रेलचेल आहे. मात्र शेतकऱ्याची काय अवस्था आहे ? त्याला दोन वेळचे जेवण सुद्धा नशीब नाही आहे, ना अंगावर कापड झाकायला आहे. तिच परिस्थिती इमारती बांधणाऱ्या कामगारांची आहे. कामगार सामान्य जीवन जगण्यासाठी संघर्ष करीत आहे तर बिल्डर मात्र आपले जीवन ऐषोआरामात काढत आहेत. तेच चित्र रस्ते-महामार्ग बांधणाऱ्याचे आहे. कामगार, मजुर हालाखीचे जीवन जगत आहे. तर ठेकेदार आपले जीवन रुबाबात जगत आहेत. हे सर्व बघितल्यावर ज्या मजुराने इमारत बांधली आहे त्याच्या मुलाला मात्र अभिमान असेल तो म्हणत असेल “इस बिल्डिंग की ईट मेरे माँ, बाप और मेरे रिश्तेदारने उठाई है ! काही मजुर सांगत पण असतील की ही इमारत (बिल्डिंग) आमच्या नातेवाईकाने किंवा मी बांधलेली आहे. परंतु दिवार मधल्या (विजय) अमिताभ बच्चन सारखे सगळेच मजुर काही इमारती विकत घेऊ शकणार नाहीत हे मात्र खरे आहे.
कामगार आणि मालक ह्यात नेहमीच तफावत राहिलेली आहे. कामगार हा गरीबच राहिलेला आहे तर मालक हा श्रीमंतच होत गेलेला आहे. ही दुरी कायमच राहिली आहे. उलट ही कमी होण्या ऐवजी ती अधिक वेगाने वाढत आहे. कामगारांची ही अवस्था सुधारण्यासाठी बऱ्याच समाज सुधारकांनी कार्य केले आहे. ह्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खूप मोठे योगदान आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी १८८० मध्ये हाक दिली होती. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय, मागण्या व हक्क मिळण्यासाठी १९३५ मध्ये संपाची हाक दिली होती.
आपण दिल्ली येथे शेतकऱ्यांचा संप बघितला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात कांद्यासाठी होत असलेल्या संपाबद्दल आपल्याला माहिती आहे. कापसाचे शेतकऱ्यांचे आंदोलन आपणास माहित आहे.
इतिहासाकडे बघितले तर एकंदरच कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वांचीच अनास्था आढळते आहे. मालकाची मानसिकता असते की, कमी भावात मजुर भेटला पाहिजे. धनाढ्य शेती मालक नेहमीच म्हणत असतात आता मजुरी खूप वाढलेली आहे. आता शेती परवडत नाही. शेती कोणाला परवडत नाही मजुराला की मालकाला हा संशोधनाचा विषय आहे.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
श्रम आणि भांडवल हे एकत्र आले की राष्ट्राची प्रगती होते. आत्ता प्रश्न हा पडतो की श्रम आणि भांडवल ह्यात काय महत्वाचे ? श्रम मोठे की भांडवल ? अगोदर कोणाची निर्मिती झाली ? श्रमाची की भांडवलाची ? अर्थातच श्रमाचीच. श्रम उदयाला आले, मानवाने खूप कष्ट केले उत्पादन झाले आणि अर्थातच भांडवलाची निर्मिती झाली.
सर्वात आश्चर्याची बाब ह्या मध्ये बघायला मिळते ती ही की श्रम अगोदर उदयास आले पण भांडवलाची निर्मिती नंतर होऊन सुद्धा आज जगत भांडवलाला अधिक महत्व आहे. भांडवलाला जो दर्जा किंवा मूल्य आहे ते श्रमाला आढळत नाही.
आजही कामगार शेतात, कारखान्यात राब राब राबतात पण कामगाराला त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळत नाही. कामगाराचा उदरनिर्वाह होत नाही. किमान वेतनाचा कायदा असून सुद्धा त्याला किमान वेतन मिळत नाही. ही कामगाराची अवस्था आहे. कामगार व कामगार कुटुंबीय हलाखीचे जीवन जगत आहेत. ज्या श्रमामुळे भांडवलदार वर्ग, मालकवर्ग, बिल्डरवर्ग जन्माला आला तो आपले जीवन मजेत जगत आहे. एकंदरीतच काय तर कामगारांचे सर्वत्र शोषण होतांना दिसत आहे.
सर्वत्र कंत्राटीकरणाचा बोलबाला आहे. ह्या कंत्राटीकरणात पण मेख आहे. कामगारांना कमी वेतन आहे. त्याचे ह्यात शोषण होत आहे. तर कंत्राटदारांना नफाच नफा आहे. कामगारांना वेतन जास्त व नियमित द्यावे लागते म्हणून कंत्राटीकरण पद्धत अंमलात आणली परंतु ह्या कंत्राटीकरणामुळे कामगारांचे शोषण होऊन भरपूर नफा मात्र कंत्राटदारांच्या घशात ओतल्या जात आहे.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
तसे बघितले तर कंत्राटीदार ह्यात केवळ मलाई खातात. अल्प श्रमात कामगारांकडून काम करून घेतात व संस्थेला / कंपनीला जास्त मोलात कामगारांचे श्रम विकतात. कंत्रादाराचे ह्यात काहीच श्रम नसतात. केवळ मध्यस्थी म्हणून भूमिका निभावतात व नफेखोरी करतात. ह्या कंत्राटीकरणामुळे कामगारांना योग्य श्रमाचे दाम न मिळाल्यामुळे त्यांचे शोषण होते.
वास्तविक हा जो विश्वाचा डोलारा व्यवस्थित चालू आहे. ते केवळ कामगारांच्या श्रमामुळेच. कामगारांचे शोषण थांबविल्या गेले पाहिजे. त्यांचे राहणीमान सुधारले पाहिजे तरच गुणवत्तापूर्ण उत्पादन होईल. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अगदी बरोबर म्हटले होते ‘ही पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर नाही तर ही कामगारांच्या तळ हातांवर तरली आहे’. जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हटले होते की, “यह आझादी झूठी है, देश की जनता भुखी है” ! खरोखर आज इतके वर्ष देश स्वातंत्र्य होऊन सुद्धा कामगारांना रोजगार नाही, किमान वेतन नाही असा हा कामगार कसा जगेल? कामगार खरोखर उपाशीच आहे. कामगार जगणे ही काळाची गरज आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांसाठी खूप कायदे केले. बोनस कायदा, पी.एफ., ग्रॅज्युइटी, कामाचे आठ तास, ओव्हर टाइम, वैद्यकीय सुट्टी, बाळंतपणाची सुट्टी, २४० दिवसांचा अखंडित काम केल्याचा कायदा आदी. हे सर्व कायदे करून कामगारांना संरक्षण दिले. परंतु ह्या सरंक्षण कायद्यात कामगार कसे बसू नयेत ह्यासाठी मालकाचे कामगारांवर आक्रमण होत आहे. त्यामुळे कामगार पिंजल्या जातो आहे.
कुठल्याच मालकाला कामगार संघटना नको आहेत. त्यांना मालकाला व सरकारला प्रश्न विचारणारा आवडत नाही. त्यांना सर्व कामगार ओझे वाटतात. वास्तविक कामगार काम करतात म्हणून राष्ट्राचे उत्पादन होते. तसे बघितले तर कामगारांचे हे विश्व आहे. ते खरे राष्ट्रनिर्माते आहेत.
कामगार कायदे कामगारांच्या बाजूने भरपूर आहेत परंतु कामगारांना न्याय मिळत नाही. न्याय देण्यासाठी कोर्टात मा. न्यायाधीशांची कमतरता आहे. त्यामुळे कामगारांना वेळेत न्याय मिळत नाही. कामगारांची घोषणा खरी आहे ” Justice delayed, justice denied.”
१ मे ला महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. म्हणून आपण मोठ्या अभिमानाने आणि उत्साहात ‘महाराष्ट्र दिन’ साजरा करतो. आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानाची बाब आहे की, आपल्या महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाची स्थापना महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ नुसार करण्यात आली. ह्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ तर्फे आर्थिक लाभाच्या योजना, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती, क्रीडा शिष्यवृत्ती, पाठयपुस्तक अर्थसहाय्य, गुणवंत विद्यार्थी गौरव, साहित्य प्रकाशन अनुदान, शिवण मशीन अनुदान योजना, गंभीर आजार उपचार अर्थसहाय्य, गुणवंत कामगार पुरस्कार, कामगार भूषण पुरस्कार व विविध २८ कामगारांसाठी उपक्रम राबविल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्र राज्यात कामगारांना बळ मिळून प्रोत्साहन सुद्धा मिळते.
वास्तविक कामगाराच्या घामाच्या अंघोळीने आपला देश अविरतपणे घडतो आहे. आज गरज आहे कामगारांना त्याच्या श्रमाच्या योग्य मोबदला व त्यांना सन्मान देण्याचा. हे म्हणणे वावगे होणार नाही की, “ईडा पिडा टळो कामगारांचे राज्य येवो.”
कामगार व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

अरविंद मोरे,
नवीन पनवेल (पूर्व) मो. 9820822882