सध्याचे युग हे तंत्रज्ञाचे व धावपळीचे आहे. सध्याचे युग हे आधुनिकसुद्धा आहे. प्रत्येकाचे राहणीमान पण उंचावले आहे. त्यामुळे प्रत्येकाचा खर्च पण वाढला आहे. हा खर्च करण्यासाठी चांगल्या रोजगाराची सुद्धा गरज आहे. आज सहज रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे परंतु रोजगार मोठ्या प्रमाणात कमी होऊन लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही अशी परिस्थिती आपल्या भारत देशातच नाही तर संपूर्ण विश्वात आहे. महागाई वाढत आहे, राहणीमान अधिक खर्चिक झाले आहे ह्यामुळे प्रत्येकजण हा तणावात आहे.
चांगल्या राहणीमानासाठी अधिक पैशाची गरज आहे. रोजगार नसल्यामुळे लोक अन्य गैरमार्गाने पैसे मिळवायला लागले आहेत. गैरकृत्यामुळे लोकांची मनशांती भंगलेली आहे. जो तो तणावात आहे.प्रत्येकाला शांती ( peace ) आणि एकांतवास (space) हवा आहे. एकत्र कुटुंब पद्धती जवळपास लयालाच चालली आहे. जो तो शांती (peace) आणि एकांतवास (space) शोधण्याच्या विचारत आहे. पण त्याला शांती मिळत नाही.
ह्यासाठी एकमेव उपाय आपल्या भारत देशात आहे. तो म्हणजे भगवान बुद्धांचे तत्वज्ञान अंगीकारणे. त्यांनी दिलेल्या उपदेशावर चालणे. माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात पण सुख आणि समाधान मिळत नाही. सुख आणि समाधान मिळवाण्यासाठी आपसातील प्रेम आणि आपल्याची साथ असणे अत्यंत गरजेचे असते.
मागील १० हजार वर्षामध्ये ज्यांनी आपली बुद्धिमत्ता वापरून मानवजातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली अशा जगातील टॉप १०० विश्वमानवांची यादी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केली, त्या यादीत विद्यापीठाने प्रथमस्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जगातील पहिल्या १०० अत्यंत महान विश्वमानवांमध्ये बुद्ध प्रथमस्थानी आहेत. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत निर्माण केला नाही.
भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्धधर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरणयासाठी चार आर्यसत्ये, अष्टांगमार्ग (मध्यममार्ग) व पंचशीले सांगितली.
चार आर्यसत्ये :
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर म्हणजे आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.
१. दुःख :- मानवी जीवन हे दुःखमय आहे.
२. तृष्णा :- मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.
३. दुःखनिरोध :- दुःखाचे निराकरण वा अंत सर्वप्रकारची आसक्ती सोडण्याने होतो.
४. प्रतिपद् :- दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांगमार्ग) आहे.
अष्टांगिक मार्ग :
तथागत बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांगमार्ग’ किंवा ‘मध्यममार्ग’ सांगितला. अष्टांगमार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. याला मध्यममार्ग सुद्धा म्हणतात. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते. त्यागोष्टी अश्या :
- सम्यक् दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे. (चांगलीदृष्टी)
- सम्यक् संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
- सम्यक् वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्णवाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
- सम्यक् कर्मान्त :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
- सम्यक् आजीविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
- सम्यक् व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
- सम्यक् स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
- सम्यक् समाधी :- कोणत्याही वाईट विकारांचा स्पर्श होऊ न देता दुष्टप्रवृत्तींपासून मन अलग ठेवून चित्तप्रसन्न आणि शांत ठेवणे.
धम्माची तीन अंगे:
- शील:
धर्माची पहिली शिकवण होती शील, म्हणजे सदाचार. त्या वेळचे जे काही मत – मातावलंबी होते ते जवळपास सर्व शीलाचे महत्त्व स्वीकारीत असत. जेव्हा कोणी व्यक्ती मनाला निर्मल ठेवून वाणी अथवा शरीराने कोणतेही कर्म करते तेव्हा सुखतिच्या मागे कधी तिची साथ न सोडणारी तिच्या सावलीसारखे लागते..
शरीर आणि वाणीच्या कर्मांना सुधारण्यासाठी मनाला वश करणे आवशक आहे. मन ताब्यात असेल तरच तो दुराचारापासून वाचू शकतो व सदाचरणाकडे वळू शकतो. ह्यासाठी समाधी महत्त्वाची. आपल्या मनाला वश करण्यासाठी बुद्धाने सार्वत्रिक उपाय सांगितला. येणाऱ्या – जाणाऱ्या सहज स्वाभाविक श्वासाची जाणीव ठेवत राहा. मन जसे भटकेल, तसे त्याला श्वासाच्या जाणीवेवर घेऊन या. यालाच समाधी असे म्हणतात.
- प्रज्ञा :
सहज स्वाभाविक श्वासाची सम्यक समाधी पुष्ट होऊ लागते तेव्हा नासिकेच्या द्वाराच्या आसपास कोणती ना कोणती संवेदना मिळू लागते. नंतरतीसाऱ्याशरीरातपसरते. ह्यामुळे सत्याची जी जाणीव होते ती कोणा इतरांची देणगी नसते, स्वतःच्या आपल्या पुरुषार्थाची देणगी असते. म्हणूनच हे परोक्षज्ञान नाही. प्रत्यक्ष ज्ञानआहे. म्हणूनच यास प्रज्ञा असे म्हणतात.
वृद्धिकारक सात व धर्मतत्त्वे:
- जो पर्यंत वज्जी अखंडपणे एकत्र जमत राहतील, विशाल संख्येने ऐक्य राखतील, तो पर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
- जोपर्यंत ते एकत्र जमत राहतील, एकजुटीने बैठकीतून उठतील, आणि एकजुटीने वज्जींच्या प्रजेच्याप्रती त्यांची असलेली सर्व कर्तव्ये पूर्ण करतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
- जो पर्यंत ते कायदा म्हणून न ठरविलेल्या गोष्टींना कायदा म्हणून अमलात आणणार नाहीत, कायदा म्हणून ठरविण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत, आणि पूर्वपरंपरेने ठरविलेल्या कायद्याप्रमाणे वागतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
- जोपर्यंत वडिलधाऱ्या लोकांचा ते मान राखतील आणि त्यांचा सल्ला ते नेहमी ऐकतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
- जोपर्यंत ते गावात असलेल्या किंवा गावाबाहेरच्या चैत्यांचा गौरव करतील व सर्वधर्म कर्तव्ये पार पाडतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
- जोपर्यंत ते अर्हन्तांचे रक्षण करतील, त्यांच्या राज्यात अर्हंत सुखात राहतील, तोपर्यंत त्यांची भरभराट होईल, ऱ्हास होणार नाही.
दहा पारमिता:
दहा पारमिता ह्या शीलमार्ग आहेत..
- शील : शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी नकरण्याकडे असलेला मनाचा कल.
- दान: स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
- उपेक्षा :निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
- नैष्काम्य :ऐहिक सुखाचा त्याग करणे.
- वीर्य :हाती घेतलेले कामयत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
- शांती: शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
- सत्य: सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
- अधिष्ठान :ध्येय गाठण्याचा दृढनिश्चय.
- करुणा :मानवासकट सर्वप्राणिमात्रांविषयी प्रेमपूर्ण दयाशीलता.
- मैत्री : मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रू याविषयीच नव्हे तर सर्व जीवन मात्रांविषयी बंधुभाव बाळगणे
पंचशील
- मी जीव हिंसेपासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
- मी चोरी करण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
- मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
- मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
- मी मद्य, मादक गोष्टी तसेच इतर मोहांत पाडणाऱ्या सर्व मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
आनंदी, परिपूर्ण व आदर्श जगणे अंगीकारले की कीर्तीचा सुगंध सहज वाऱ्याच्या दिशेच्या उलटही जाऊ शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे..
१.प्राणीमात्रांची हिंसा न करण्याची सवय बाणविणे. कायेने वा वाचेने. अगदी मनाविरुद्ध वा अपशब्दांनीही कुणी दुखावले जाणार नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी घेणे ही आपली गरज आहे.
२.चोरी न करणे एखाद्याच्या मालकीची वस्तु त्याने दिल्याशिवाय घेणे, बळकावणे, डोळा ठेवणे व त्यावर अंमल करणे ही चोरी असून तिच्यापासून कटाक्षाने दूर रहाणे ही गरज आहे.
३.चारित्र्य-शीलाची जपणूक करणे निष्कलंक चारित्र्य हा स्त्री व पुरुष दोघांचाही अनमोल दागिना आहे.. शीलवंतांना मान-सन्मान असतो, एवढेच नव्हे तर त्यांचेच समाजात नैतिक वजन असते..सत्शील वर्तनाने मोल प्राप्त होते.
४.खोटे न बोलणे खरे बोलणे. खरे सत्य शोधणे. सत्याधारित वागणे इ बाबी दुर्मिळ होत चालल्यामुळेच सत्य-वचनाचे मोल अबाधित आहे. खरे बोलतानाही ठेंगण्याला ‘तू ठेंगणा आहेस.’ वा ‘तू काळा वा काटकुळा आहेस.’ असे बोलून वा चिकहिंसा न करता सुयोग्य शब्दांचा वापर करण्याची कला अवगत करणे हे एक कसब आहे.
५.मादक पदार्थ वर्ज्य ठेवणे.
उत्तेजित करणाऱ्या बाबी घेण्याने शारीरिक, मानसिक व सामाजिक हानी होत असेल तर नशिल्या वा वाईट गणल्या गेलेल्या बाबींना थारा देणे हे अहितकारक ठरेल.
ही आहेत सम्यक संबुद्धांनी दिलेली पाच शिले पंचशील.
या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा जीवनात अंगीकारकेला तर मनुष्य जिवंतअसेपर्यंत नक्कीच दुःख मुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो, अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे.
सर्व विश्वाला शांती लाभो, यासह सर्वांना बुद्धजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
-अरविंद मोरे,
११०१, साई सितारा, सेक्टर६,
नवीनपनवेलपूर्वमो.
9820822882