Monday, October 27

दसऱ्याच्या मेळाव्यात ठाकरे बंधूंची चर्चा; उद्धव-राज एकत्र येणार?

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरें आणि राज ठाकरे यांची चर्चा, शिवसेना मनसे युतीसंदर्भात संकेत

मुंबई: राज्यात आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा जोरात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेनेचा २ ऑक्टोबर रोजी होणारा दसरा मेळावा विशेष लक्ष वेधून घेत आहे. या मेळाव्यासंदर्भात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे या मेळाव्यास उपस्थित राहणार का? आणि युती संदर्भात निर्णय जाहीर केला जाईल का?

मुंबईत मराठीच्या मुद्द्यावर आयोजित मेळाव्यांमुळे या दोन भावांची भेट आधीच झालेली आहे. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर भेट देऊन शुभेच्छा दिल्या, तर गणेशोत्सवात उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थ बंगल्यावर जाऊन राज ठाकरे यांच्या गणपती दर्शन घेतले. याशिवाय, मावशी भेटीसुद्धा पार पडली, ज्यामुळे राजकीय वर्तुळांत युतीच्या शक्यतांवर चर्चा पुन्हा गतीने सुरू झाली.

सद्यस्थितीत प्राथमिक चर्चा झाल्याचे संकेत असूनही युतीसंबंधी अंतिम निर्णय अद्याप होऊन नाही. दसऱ्याच्या मेळाव्याच्या मुहूर्ताला युतीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी संधी म्हणून पाहिले जात आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला ५८ वर्षांची परंपरा आहे; बाळासाहेब ठाकरे यांनी या मेळाव्यात विचारांचे ‘सोनं’ वाटून शिवसैनिकांना आशीर्वाद दिले. सध्याचे पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात भाषण करून कार्यकर्त्यांना दिशा देतात.

विशेष म्हणजे, खासदार संजय राऊत यांनी संकेत दिले आहेत की, दसऱ्याच्या सणाच्या निमित्ताने पुन्हा ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, मात्र यावर अंतिम निर्णय राज ठाकरे यांच्याच हातात आहे. मनसेकडूनही याबाबत कोणताही निश्चित निर्णय जाहीर केलेला नाही.

यामुळे आगामी दसरा मेळावा फक्त पारंपरिक उत्सवच नाही तर आगामी निवडणुकांसाठी राजकीय संकेतांचे व्यासपीठ ठरणार आहे, आणि ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांना नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.