मेळघाटातील घुंगरू बाजार; परंपरेचा थाट, नात्यांचा उत्सव आणि माणुसकीचा सोहळा!
अमरावती : जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाट भागात दरवर्षी दिवाळीनंतर एक अनोखा बाजार भरतो. हा बाजार केवळ खरेदी-विक्रीचं ठिकाण नाही, तर प्रेम, परंपरा आणि संस्कृतीचा जिवंत मेळा आहे. स्थानिक गोंड आणि आदिवासी समाज या बाजाराला प्रेमानं “घुंगरू बाजार” किंवा “थाट्या बाजार” म्हणून ओळखतात.दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवडी बुधवारी हरिसाल, धारणी, सेमाडोह, कोल्हा आदी भागांमध्ये हा बाजार भरतो. पांढरा सदरा, धोतर, कवड्यांची माळ, आणि डोक्यावर पक्ष्यांच्या पिसांनी सजविलेली पगडी परिधान केलेली गोंड मंडळी ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या नादात नाचत बाजारात फिरतात. बांबूपासून तयार केलेल्या बासऱ्यांचे सूर आणि म्हशीच्या शिंगापासून तयार केलेल्या फुंक्यांचे आवाज संपूर्ण बाजारभर घुमत राहतात. या नादात मिसळलेली रंगीबेरंगी माणसं मेळघाटाच्या संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवतात.या दिवशी लोक वर्षभरातील शेतीमाल विक्रीतून मिळालेल्य...
