शाहिरी अभंग गाते.!
छाया नागजकरांच्या तमाशात नाचणारी पुष्पां लोंढे ही एकदा पुण्यात आली आणि आवर्जून मला भेटली. स्वारगेटला आमची भेट झाली तेव्हा पुष्पाने रमेशबद्दल सांगितलं आणि मी हादरून गेलो.रमेश गेल्या सहा महिन्यांपासून झोपून आहे. त्याची बायको त्याला सोडून गेली आहे.तुझी सारखी आठवण काढत असतो.सात आठ पत्रं त्याने तुला लिहली आहेत पण पाठवली नाहीत.”रमेश कधी जाईल याचा नेम नाही तू त्याला भेटून यायला हवं”.रमेशची आठवण गहरी झाली.डोळ्यात कृष्णा दाटून आली आणि तो काळ जसाच्या तसा आठवला.
रमेश वाघमारे उर्फ रमेश खलाटीकर. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात खलाटी म्हणून शंभर दीडशे उंबऱ्याचं हे गाव हा तिथलाच.संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात तमाशाचे फड जिंकणारा हा विनोदाचा बादशहा.सोंगाड्या ते शाहीर आणि ढोलकीपटू अशी रमेशची ओळख.छाया माया नागजकर यांच्या तमाशात त्याने काम केलं.मंगला बनसोडे यांच्या तमाशातही तो फार काळ होता.हा रमेश म्हणजे माझ्या आईचा सख्खा मावसभाऊ.याच्या संगतीनेच मी त्याकाळी अनेक जत्रेत तमाशा कलावंतांच्या घोळक्यात फिरलो.आज तमाशावर अनेकजण अभ्यास करत आहेत अनेक शोध निबंधात रमेश खलाटीकर याचा उल्लेख केला आहे. या काळात पश्चिम महाराष्ट्रात दोन नावं प्रामुख्याने घेतली जायची.एक शाहीर राजा पाटील आणि दुसरं सोंगाड्या रमेश.याच्या बरोबर फिरलेलं माझ्या घरच्यांना कुणालाच आवडलं नाही. संगतीने मीही बिघडेन ही भीती होती.कारण रमेश हा चोवीस तास पिऊनच असायचा. दारू न पिता या माणसाने कधीही फडात पाय ठेवला नाही. पण प्रतिभा जबरदस्त होती. आमच्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेकजणांना याची लोकगीतं तोंडपाठ आहेत.मला आठवतंय सांगली आकाशवाणीवर रमेशला मुलाखतीसाठी बोलावलं तेव्हा मीही त्याच्यासोबत गेलो होतो. सांगलीला येईपर्यंत तो नीट होता. केंद्राजवळ आल्याबरोबर लघवीला जाऊन येतो म्हणून तो गेला तो पिऊनच आला.मी रागावलो.म्हणालो ..” मामा हे जर बंद केलंस तर तू खूप पुढे जाशील”.परंतु त्याने कधीच स्वतःच्या आईबापाच ऐकलं नाही तो माझं काय ऐकणार?व्हायचं तेच झालं मुलाखत झाली नाही त्याचा अवतार बघून पुढच्या आठवड्यात या म्हणून सांगण्यात आलं.तो पुढचा आठवडा कधीच उगवला नाही.आपल्याच मस्तीत उधळून जगणारा रमेश आज याच दारूचा बळी होत आहे ही भावना चीड आणणारी होती.वाईट तर वाटत होतं आणि त्याचा रागही येत होता.पण जाऊन भेटून येणं गरजेचं होतं.
अखेर दोन तीन दिवसांचा वेळ काढून मी स्वारगेटला आलो आणि जत गाडीत बसलो.आणि खलाटीचं तिकीट काढताना पुन्हा गहिवरून आलं.
आठ तासाचा प्रवास करून रात्री आठ वाजता फाट्यावर उतरलो.कुत्री भुंकत होती.दोन्ही बाजूला डोंगर होते.अंधार होता.तिथून दोन ते अडीच किलोमीटर चालत जायचं म्हणजे भयंकर होतं.पण गावातील बरीच पोरं ओळखून होती वाटलं कुणीतरी येईल पण वाट पाहणं धोक्याचं होतं म्हणून हातात दोन दगडं घेऊन मी चालू लागलो. घर जवळ येत होतं तसं मन भरून येत होतं.जागा असेल की झोपला असेल, रमेश मामा आपल्याला बघून काय म्हणेल? असे प्रश्न मनात घोळत असतानाच त्याच्या उंबऱ्यावर आलो देखील.दार बंद होतं.वाजवलं..आणि मल्हारी नानाने म्हणजे त्याच्या वडिलांनी दार उघडलं.घरात लाईट नव्हती.रॉकेलवर जळणारी चिमणी दिवळीत ठेवली होती. अंधारात मला नानाने ओळखलं नाही……” कोण पाव्हन म्हणायचं तुम्ही?” तसा मी म्हणालो “नाना मी हाय कवठ्याच्या जयाचा पोरगा” ओळखलं का? तसा नाना म्हणाला “आरं वाघा यी की आत “असं म्हणून नानाने आत ओढलंच.
सजाआई झोपली होती नानाने तिला उठवलं. मी आल्याचं सांगितलं तशी अथरुणातन उठली आणि रडत रडत हुंदके देत माझ्या गालाचं मुकं घ्यायला लागली.रमेशला दोन मुली आणि एक मुलगा तिघेही तिथेच झोपले होते.लेकरं बिचारी आमच्या कालव्यात जागी झाली.मला दादा म्हणत होती.आनंदून गेली.सगळ्यांच्या भेटी झाल्या पण मी ज्या वादळाला भेटायला वादळ होऊन आलो होतो तो मात्र घरात दिसत नव्हता.मनात भीती वाटली.मी विचारलं “आई रमेशमामा कुठाय? “त्यावर नानांचा कातर आवाज आला. नाना म्हणाले, “हाय जित्ता हाय…. अजून मेला न्हाय..” पोटाच्या पोराविषयी नाना असं बोलणं स्वाभाविक होतं.कारण मुलाचं कोणतंच कर्तव्य त्येनं पार पाडलं नव्हतं.पण नानांच्या सह सगळ्यांचे डोळे भरून आले होते.
रमेश हा कलावंत फक्त कलेसाठी, कवितेसाठी, विनोदासाठी आणि ढोलकीसाठी जन्माला आला होता.हाच नियतीनं या कुटुंबावर केलेला अन्याय होता.मला त्याला बघायची फार इच्छा झाली होती.बाजूला एक खोली होती खोली कसली छप्परच ते.तिथे रमेश होता.झोपला होता बहुतेक. दोन तीन दिवसातून पेलाभर दूध यावरच जिवंत होता फक्त.कारण इलाज तर होत नव्हता.पचत नव्हतं खाल्लेलं. आता फक्त त्याच्या मरणाची वाट पाहत अडकून बसलेलं कुटुंब पाहून काळीज फाटत चाललं होतं.सजाआईने दोन बाजरीच्या भाकरी आणि तव्यात परतेललं वांग ताटात वाढलं.हातपाय धुतले आणि अर्धीच भाकरी खाल्ली.तिच्या हातचं काहीही कधीकाळी आवडीने खाणारा मी आज खाऊ शकत नव्हतो.नाना म्हणाले,”आत्ता झोप सकाळी भेट त्याला..”तिथं काय आत्ता सगळा अंधारच हाय”..मला घरात झोप लागणं शक्य नव्हतं.मी बाहेर अंगणात पोतं टाकलं आणि त्याच्या खोलीच्या उंबऱ्यावरच डोकं ठेऊन आडवा झालो.बाकीचे सगळे आत झोपले. दार बंद झालं.रमेश माझ्यापासून पाच ते सहा फुटांवर होता.पण भेटू शकत नव्हतो.रात्र कशी काढली ते या जीवाला माहीत.माझ्या संपूर्ण आयुष्यातली एक भयंकर रात्र होती ती.
संपूर्ण रात्र त्या जत्रा ते तमाशाचे फड त्या लावण्या आणि वगनाट्य सारं सारं वरच्या चांदण्यात दिसत होतं. त्याने केलेले विनोद आठवून हसू येतं होतं पण डोळे मात्र गच्च तुडुंब भरले होते.माझ्यापेक्षा वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या रमेशमामाला कायम अरेतुरेच बोललो. पण,त्याने कधीच मला एकेरी हाक मारली नाही. तो कायम मला लाडाने अहो मास्तर असंच म्हणायचा. माझे वडील मला मास्तर म्हणतात.म्हणजे जगातल्या दोन माणसांसाठी मी मास्तर होतो.
शाहीर राजा पाटील आणि रमेश प्यायला बसायचे तेव्हा, ह्या दोन प्रतिभावंताचा संवाद चालायचा मी त्याचा साक्षीदार होतो. समोरचे शेंगदाणे म्हणा तर कधी वजडी म्हणा कायम मीच संपवत आलो.हे दोघेही वामनदादा यांच्यावर रात्रभर बोलायचे.वाद व्हायचे.जुगलबंदी व्हायची.आणि हे सगळं तेव्हाच माझ्या रक्तात उतरत गेलेलं.रमेशमामाची गाणी, लावणी राजा पाटील गायचे.तेव्हा जत्रा देवाची नाही तर फक्त या दोघांची असायची.मी वगनाट्यात त्यावेळी कोणतातरी रोल करायचोच.मला अभिनयाची आवड होती.ती या मामाने पूर्ण केली.वरच्या आकाशात चांदण्यांच्या जत्रेत रात्रभर फड गाजवणारा सोंगाड्या आणि शाहीर रमेश मी भरलेल्या डोळ्यांनी पुन्हा पाहिला.रात्रभर कानात त्याची ढोलकी वाजत राहिली.आणि त्याचं एक वाक्य मात्र कायम घुमत राहतं की,”वाजवणं म्हणजे नाचायलाच पाहिजे असं नाही तर एखाद्या युद्धाला सुरवात सुद्धा वाजवून करतात मास्तर”…..”अहो मास्तर तुम्ही काय सांगता शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला, हलगी वाजल्याशिवाय मावळे कधी लढले नाहीत.या वाजवण्याचा आणि स्वराज्याचा फार मोठा संबंध आहे..”.हे बोलताना मामा ताठ मान करायचा.
सकाळचे सहा वाजले.नानांनी मला उठवलं तसा ताडकन उठून त्या खोलीत गेलो.माझ्यासोबत सगळे आत आले.दोन गोधड्यावर फक्त हाडाचा सापळा उरला होता. त्याचे डोळे बंद होते.ओठ हालत होते. कोणत्यातरी गाण्याला नक्कीच चाल लावत होता.नानाने आवाज दिला “अरे रमू बघ कोण आलंय, तुझा मास्तर आलाय मास्तर” त्याने डोळे उघडले माझ्याकडे पाहिलं तसं खळकन दोन्ही बाजूनी धारा वाहायला सुरवात झाली.कंठातून हुंदका आणि हुंडक्यातून फाटत आवाज आला…”मा…स्त..र.. तुम्ही आज आलात.लय वाट पाहिली राजे तुमची….बहोत तकलीफ दि तुमने”… अधूनमधून हिंदी मारायची सवय होती त्याला. ओठांवर हसू आणि डोळ्यात आसू घेऊन हा सोंगाड्या आनंदी असण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना पाहून फार वाईट वाटलं.
रमेशचा हात हातात धरून कसा आहेस मामा म्हणून विचारलं त्यावर हसत हसत म्हणाला “मरणाकडे जाणाऱ्याला जगणार का म्हणून काय विचारता मास्तर?” वेळ तर झालीय आत्ता….गण सुरू झाला की निघणार मास्तर…इंद्राच्या दरबारात फड रंगणार आहेत इथून पुढे…”असे म्हणत आमच्या हाताची पक्कड घट्ट होत गेली…आणि एक हात त्याच्या गालावरून फिरवला तेव्हा सगळ्यांना हुंदका दाटून आला.लगेच रमेश सजाआई ला म्हणाला “अगं…जा आणि मटण आण मी आणि मास्तर दोघेही पोटभरून जेवणार आज”…सगळ्यांना आश्चर्य वाटलं..कारण गेल्या दोन महिन्यांपासून जेवण म्हणलं की शिव्या देणारा आणि ताट फेकून देणारा रमेश आज जेवायची भाषा करत होता. सजाआई लगेच मटण आणायला गेली.मी त्याच्या जवळ बसलो आणि गप्पा सुरु झाल्या.माझं काय चाललंय ते सांगितलं.त्यानेही एकदोन कविता ऐकवल्या..माझ्या आयुष्यातील सर्वात देखणं अध्यक्ष नसणारं ते कविसम्मेलन होतं.रमेशचा आवाज वाढला होता हे पाहून अनेकांना बरं वाटत होतं.रमेश बरा होईल आत्ता असे नाना म्हणाले.कारण गेल्या दोन तीन महिन्यापासून तो एवढा दिलखुलास कुणाशीच बोलला नव्हता.
बाजूला धूळ खात पडलेली ढोलकी रमेशने जवळ आणून ठेवायला सांगितली.मी तिला एका फडक्याने पुसली. रमेशची बोटं वळवळ करत होती.मी त्याचा हात उचलून त्या ढोलकीवर ठेवला.तशी हळूहळू बोटं नाचू लागली. आवाज काहीच येत नव्हता.उशिखाली वामनदादा कर्डकांचं “तुफानातले दिवे” होतंच होतं.ते कायम असायचं.
मामा म्हणाला “मास्तर आज तुम्ही कॉटर सांगायची चकण्याला आळणी आहेच ……” मला पिऊ द्या मास्तर मला जगू द्या.. ” दोन चार शिव्या द्यायची इच्छा असतानाही मी मान डोलावली.बाहेरच्या एका पोराला खबर दिली आणि त्याने लगेच सोय केली.
मटण शिजलं होतं.पॅक भरला होता.रमेश भिंतीला टेकून बसला होता.स्टीलचा ग्लास तोंडाला लावला तोंड वाकडं करत म्हणाला “मज्जा आली आज मास्तर”…तुम्ही आलात लय बरं झालं…मी आज मोकळा होणार..” त्याच्या बोलण्याचा अंदाज लागत नव्हता.समोर ताट भरून आळणी आणि शिजलेल्या मटणाचे बारीक मऊ तुकडे होते.त्याने चकणा म्हणून खायला सुरवात केली.मलाही खाण्याचा इशारा केला.मीपण सुरवात केली.बाजूच्या खोलीत सजाआईने फोडणी दिली होती.वास घुमत होता.आणि रमेश म्हणाला, “मटण खावं तर आमच्या आयच्या हातचंच…”काय म्हणता मास्तर” असं म्हणत त्याने टाळीला हात पुढे केला पण टाळी न देता तो तोच हात मी गच्च धरला आणि हंबरडा फोडला. “मास्तर रडायचं नाही मास्तर”….मी जातो फड रंगवतो इंद्राला पटवतो, तुमच्या नावाचा वशिला आधीच लावून ठेवतो तुम्ही इथलं मैदान जिंकून मग वर या तुमची मिरवणूक तिथं काढू आपण” असं म्हणत तो खळखळून हसता झाला आणि मीही त्याच्या हसण्यात सामील झालो.
“चला मास्तर उभे राहा आणि ऐकवा एखादी कविता जी आमच्या जगण्यावर असली पाहिजे.” त्याचा नियम असा होता की कविता ही बसून म्हणायची गोष्ट नाही उभे राहूनच कविता सादर करायला हवी.मला नियम चांगलाच माहीत होता.मी उभा राहिलो आणि कविता बोलायला सुरुवात केली.
“शाहीर….उठा ….शाहीर…
बघा समाज आपला पांगला आहे.
आणि अजूनही एक कॉम्रेड
वेशीवरच टांगला आहे.
जिंदगी……जिंदगी…… जिंदगी…..
डफ बडवण्यात गेली ,
ही शोकांतिका नाही
आपली….
अहो, .…भाग्य लागतं..
डफ बडवण्यात जिंदगी जाणं…
यासारखं सुंदर काय या जगात?….
अहो शाहीर,
अभंगालाच शाहीरी म्हणतात.
म्हणून ज्ञानोबाची कविता ओवी झाली,
कबिराची दोहा झाली.
शाहीर ,
ढोलकी थंड झाली तरी
विठाबाई अजूनही जिवंत आहे तिच्यात….
मदिरा म्हणजे अमृत असतं
यात काही तथ्य नाही…
शाहीर,
वेशीवरचा कॉम्रेड
गावात आणायला हवा
आणि लाल सलाम ठोकलाच पाहिजे …
इथल्या रानपाखरांच्या फांद्या तोडल्या जातायत
आणि….
तुम्ही …..याक छि थु …
शाहीर
थुकतो तुमच्या जिंदगीवर…
उठा शाहीर उठा,
आणि काळ्या दाटून आलेल्या
ढगांच्या पोटावरच
लिहा एखादी लावणी…
आणि सांगा या बांडगुळाना
लावणीत फक्त शृंगार नसतो,
अंगारही असतो….
आणि वाजुद्या हालगी,
कोंढाणा चढतांना जशी
वाजली होती तशी…..
शाहीर जत्रांचा हंगाम सुरू झाला,
उद्या पिंपळवाडी,
परवा जत,
नंतर बार्शी….
चला उठा शाहीर उठा….
घुंगरं नटली आहेत,
माती पेटली आहे.
गर्दी फक्त तुमची आहे…..”
ताटातील आळणी मटण संपत आलं होतं. बाटली अर्धी संपली होती.हातातला ग्लास खळकन खाली पडला.माझी कविता संपली होती.मी डोळे गच्च मिटले होते.अंगावर काटा आला होता.सगळं शरीर थरथर कापत होतं.हळुवार डोळे उघडले.रमेशमामाने हात उंचावला होता.”व्वा मास्तर व्वा..” माझ्या कवितेला दाद मिळत होती तीही एका अशा कलावंताकडून ज्याने सारी जिंदगी फक्त कवितेवर आणि शाहिरीवर खर्च केली होती.
मी त्याच अवस्थेत त्याच्या जवळ गेलो.उचललेला हात तसाच माझ्या डोक्यावर पडला.आणि अंगात बळ आणून मान उंचावून त्याने माझ्या गालाचा मुका घेतला.बघता बघता बरीच गर्दी जमली होती.रमेशने माझ्या कवितेवर टाळ्या वाजवायला सुरवात केली आणि जमलेल्या गर्दीला नजरेनेच टाळ्या वाजवण्याचा इशारा दिला.टाळ्यांचा कडकडाट वातावरण गंभीर करत गेला.आतडी पिळवटून जात होती.प्रत्येकाला हुंदका आवरत नव्हता.त्याच गजरात रमेश म्हणाला, “मास्तर….… खरं आहे ….शाहिरी अभंग असते, शाहिरी अभंग गाते….निघतो मास्तर …..आज फक्त ढोलकी वाजली पाहिजे….”रमेशने अखेरचा श्वास घेतला.डोळे तसेच उघडे राहिले.हातातला हात थंड होत गेला.आणि सजाआईने हंबरडा फोडला.
त्या माऊलीच्या हंबरड्याबरोबरच सगळ्यांनी बोंबलायला सुरवात केली.तिन्ही लेकरं मढ्याला चिकटली. त्यांचं आभाळ हरवलं होतं. मी ढोलकी मांडीवर घेतली आणि वाजवायला सुरवात केली.तसा हंबरडा आवाज वाढवतच राहिला.आणि सगळं संपलं.!
– दंगलकार नितीन सुभाष चंदनशिवे.
कवठेमहांकाळ.जि.सांगली.
7020909521 (व्हाट्सअप किंवा कॉल करून लेखकांशी बोलू शकता.)
मी लिहिलेल्या या वास्तववादी कवितेला परवा राज्यस्तरीय कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला.रमेश मामाचा फोटो उपलब्ध नाहीय.पण माझ्या हातात मिळालेल्या बक्षिसात मात्र रमेश मामा नक्की असेल.