
समाज माध्यमावरील सीरियल्सच्या भावनिक आक्रमणामुळे नवतरुण पिढीच्या मन-मेंदूत सुखी जीवनाची संभ्रमणावस्था!
समाज माध्यमे, टीव्हीवर जी काही अनैतिक, असामाजिक तत्त्वांची अकारण पेरणीची माथापच्ची सुरू आहे, याचे सामाजिक परिणाम आता वास्तविक जीवनामध्ये ढवळाढवळ करून तरुणाईच्या मनाची संभ्रमणावस्था वाढविण्यासाठी अधिक पोषक ठरत आहेत; नव्हे, ही पिढी नैराश्याच्या गर्तेमध्येच अधिक वावरताना दिसत आहे.
आधीच मोबाईल फोनमुळे इथल्या तरुणांनी घरातील किंवा कुटुंबातील एकमेकांचा संवाद तोडून, आपल्या ‘मुठीत’ आलेल्या जगाशी ‘मुकसंवाद’ सुरू केलेला आहे. जवळच्या व्यक्तीशी ते बोलत नाहीत, तर अनोळखी व्यक्तीसोबत ते वारंवार न थकता रात्रंदिवस निष्फळ चर्चा करत असतात आणि आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ आपल्यासमोर जे वाढून ठेवलेले ‘रील’ असेल, ते पाहण्यात अकारण गमावत आहेत.
टीव्ही वाहिन्यांवर दाखवण्यात येणाऱ्या सिरीयल, ज्यातून अधिकाधिक अनैतिक संबंधातून निर्माण होणाऱ्या क्लिष्ट ‘नातेसंबंधां’च्या संवादाची संगीतमय, दरवाजा तोड, दरवाजा उघड ही सारी ‘प्रदर्शनं’ दाखविली जात आहेत. त्याचा आपल्या मूळ जीवनाशी काहीही संबंध नाही, तरीही जबरदस्तीने तुमच्या मेंदूचा ताबा घेण्याचं कुशल कर्तव्य अशी कथानके करत आली आहेत. यातील खोलवर पसरलेले नातेसंबंध, प्रेमसंबंध, भावनिकता एवढ्या रंजकतेने दाखवल्या जातात की, त्यांनी आपल्या मनावर कधी ताबा मिळवला, हे कळतच नाही. त्यामुळे प्रत्येकाचे मन या कथानकाच्या अधीन होऊन जाते. परिणामी, नको तो भावना कल्लोळ मनात निर्माण व्हायला सुरुवात होते आणि आपल्याही कुटुंबातील व्यक्तींविषयीची आपली ‘साशंकता’ वाढत जाते! हे नको असलेले बेणं आपल्या मनाच्या वावरात नकळत कधी लावलं, हे लक्षात येत नाही!
हे प्रदर्शन करणे म्हणजे आधीच बिघडलेल्या नैतिक संस्कृतीला खतपाणी घालणे नाही काय? आपण समर्थन मुळीच करणार नाही, तर मग हे प्रदर्शन कशासाठी? अनेकांच्या जीवनात असे नैतिक-अनैतिक चढउतारांची वळणे येतात; पण ही अशीच सर्वांना उत्तेजित करणारी दृश्ये, अशीच जर सिरीयल अथवा कुठल्याही प्रकारच्या माध्यमातून समोर येत असतील, तर त्यामुळे समोरची पिढी ‘हेच जीवन आहे’ म्हणून त्यातच गुरफटून राहील अथवा असे अनेक युक्त्या, क्लुप्त्या खेळ खेळत राहील.
जरी तिच्या मनातली घुसमट लोकाभिमुख व्हावी आणि लोकांनी त्याची योग्य दृष्टीने समीक्षा करावी, दृष्टांत घ्यावा, असं जरी वाटत असलं, तरी किमान ८५ टक्के तरी लोक आपल्या जीवनामध्ये सहीसलामत खुशालीने संसार करतात. त्या बिचाऱ्यांवर असा कुठलाही स्पर्श न झालेल्या बाबींचा उगाच उहापोह करून विषय समोर आणायचा म्हणजे लेखकालासुद्धा काम नाही आणि अभिनेत्यांना काम मिळते, अभिनय करायला मिळतो. त्यातून त्याची पोळी भाजल्या जाते, भाकर-भाजी मिळते; पण हे संस्कृती दर्शन नसून विकृतीदर्शन या प्रकारात मोडते. ते नाहीच दाखवले तर काय बिघडेल? नाहीतरी, ‘कीर्तनाने माणसं सुधारली नाहीत आणि तमाशाने माणसे बिघडली नाहीत.’ हे सर्व दाखवण्यामध्ये समाजजीवनाची अशी फसगत आहे की, आता म्हणावं लागतं, “त्यांच्या शांत मनाला अधिक शांत होऊ दे. ठहरे हुए पानी में कंकर ना मार सावरे…” अशीच अवस्था समाजाची झाली आहे. एरवी कुणाच्या बेडरूममधल्या गोष्टी आपण जगासमोर सांगतो काय? त्यावर उगाच सोलुशन शेजाऱ्याला मागतो का? कशाला असे सिरीयल काढून लोकांचे दिमाग दगडी कोळशावर भाजत राहता? ‘मी त्याच्या प्रेमात, तू त्याच्या प्रेमात, ती त्याच्या प्रेमात’, काय चाललंय हे आणि हे प्रदर्शन करण्याची काय आवश्यकता आहे? यातून कोणी आदर्श घेऊ शकेल काय? खरंच कुणाचं जीवनमान सुधारणार आहे काय? अशा सिरीयल पाहून कुणी सत्संग सोडलं काय?
जेव्हा एखाद्या गोष्टीचा अधिक भडीमार, सकारात्मक-नकारात्मक बाजू मांडून जरी आपण करत असलो, तरी त्यातून वाईट वेचण्याची प्रवृत्ती समाजाची अजूनही आहेच. म्हणजे आपण समाजात आणखी वाईट प्रतिमा, आचार-अनैतिकता वाढवण्यास हातभार लावत नाही का? या प्रश्नाची उत्तरे आपल्याकडे नाहीत, कोणाकडेच नाहीत, तरीही मोठ्या चवीने, तर कधी तोंड मुरडत आपण या सिरीयलची गोडी चाखत राहतो. अक्षरशः अनेक घरं आणि घरातल्या रिकाम्या बायका, पोरी, पोरं आतून भावनिकदृष्ट्या अगदी तुटून गेली आहेत. कुठलेही आई-वडिलांशी कौटुंबिक सलोखा, जवळीकता त्यांची राहिली नाही. त्यामुळे टीव्ही सिरीयल मधले अनेक विषय नको असतानासुद्धा डोक्यात घुसायला लागतात आणि नवीन पिढीच्या जीवनाचं वाटोळं होतंय! यातून जो घ्यायचा तो दृष्टांत वेगळाच राहतो. ‘मी भावुक अनैतिक प्रेम संबंधाची पेरणीच वेगळ्या पद्धतीने मनात नकळत केली जाते,’ आणि हीच खरी दुनिया आहे, याचा भास आता कमी वयाच्या मुलांपासून तर किशोरवयीन मुलांपर्यंत, प्रौढांपर्यंत, नको असतानाही किंवा काही आवश्यकता नसतानाही हे संवाद-डिलिव्हरीचं भावनिक कौशल्य अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करून टाकते. पुन्हा पुन्हा तीच ती वारंवारिता अशा प्रकारच्या सिरीयल-लेखणीमधून लोकांसमोर येत असताना, खरोखरच नको त्या विषयाचं मेंदूत पेरणी केली जाते. तशी आताच्या काळाला चोहीबाजूने समाज माध्यमांच्या विकृत प्रदर्शनाने आधीच फोडणी बसलेली आहे. किती ह्या सिरीयल? किती हे भावनिक संवाद? किती, किती विषय? किती क्लिष्ट विषय? कोणते विषय कुणासमोर बोलायचे आहेत की सार्वजनिक करायचे आहेत, याचं भान ठेवून समाज सुधारण्यासाठी हे मांडणं आवश्यकच आहे काय? खरंच अशा सिरीयलची आवश्यकता आहे का?
‘असं एकमेकाला भावनिक करून नव्या बाळाला जन्म देण्यासाठी या सगळ्या प्रक्रियेतून जावं लागतं, एवढे पापड बेलावे लागतात आणि अशा भावनिक प्रकारातूनच अवघ्या जगाचा जन्म झाला आहे, मग असा जन्म कशासाठी?’ अशाही भावना नव्या पिढीच्या, नव्या किशोरांच्या, मुलांच्या मनामध्ये निर्माण होणार नाहीत का? आणि त्याही त्यांना बरंच काही किशोरवयामध्ये, या विशिष्ट वयामध्ये समजण्याच्या आधीच ही फोडणी त्यांच्या मेंदूत बसत असेल तर… प्रत्येक अवस्था जगण्याची गोडी, अर्थात बालपण, किशोरपण, तरुणपण, या सगळ्या अवस्था जगून घेणे, समजून घेणे अतिशय अवघड जाईल. म्हणजे ‘जगणं अवघड करण्याचं कामच आपण हाती घेतलं आहे,’ असं म्हणायला हरकत नाही.
बरं, ज्या अभिनेता-जोडीने ही कामे केली आहेत, त्यांना त्यांच्या अभिनयाचा पैसा मिळाला, पण त्यांनी मिळवलेल्या पैशांमध्ये त्यांच्या तरी मनाची, जीवनाची समाधानी आहे का? त्यांच्यातरी जीवनामध्ये स्थैर्य आहे काय? अशा सिरीयल-कहाण्यांमुळे काही असा डाटा कलेक्शन केला आहे का की, ‘इतक्या माणसांनी या सिरीयलमुळे आपल्या जीवनामध्ये कटूता संपवून समजदारीची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे?’ असं काहीच नसताना तरीही आपण आंबट-गोड तोंड करून या सिरीयल, या कहाण्यांनी, त्यांच्या रड-गाण्यांनी कोणती सहानुभूती, कोणती माणुसकी माणसात निर्माण होऊन त्यांनी समाजातील इतर बांधवांशी किंवा शेजाऱ्यांशी आपलं वागणूक-वर्तनूक सुधारून मैत्री संबंध अधिक रूढ केले आहेत, किंवा शेजारधर्म चांगल्या प्रकारचा ते निभवत आहेत?
या गोष्टीची दुसरी बाजू अशीही असेल की, ‘या सगळ्या गोष्टी प्रदर्शित होऊ द्या. ज्यांना जे बघायचे ते बघतील, ज्यांना जे सोडायचे ते सोडून देतील, ज्यांना जे घ्यायचे ते घेतील, ज्यांना मनोरंजन करायचं आहे ते मनोरंजन करतील,’ ही गोष्ट जरी असली, तरी… पण असा आतापर्यंत सकारात्मक परिणाम झाल्याची कुठलीच बातमी या सिरीयलबाबत आली नाही. उलट अनेकांचा वेळ वाया गेला, यामध्ये गुंतून राहिल्यामुळे अनेक बायका-मुलांचे डोके संभ्रमित अवस्थांमध्ये अजूनही आहेत… या विळख्यातून केव्हा बाहेर पडता येईल..ते येवो..मात्र वेळीच बाहेर पडणे अगत्याचे आहे. कारण येणारा भयंकर काळ आपल्यासमोर वाढून ठेवलेला आहे.. जिथे नाती-गोती सारंच संपलेलं असेल..! जवळ असूनही वाळवंटासारखं जगणं आपल्या वाट्याला येईल….!!
हे नको असेल तर आजच आपल्या कुटुंबाला वेळ देण्याची, मुला ,मुलींना बायकापोरांना समजून घेण्याची, हीच ती वेळ आहे..!!तूर्तास इतकेच. पुन्हा भेटूया नव्या विचारासह!

–प्रा.नंदू वानखडे
( लेखक हे प्रसिद्ध कवी, चित्रकार, नाटककार,कथाकार, समीक्षक ,गीतकार आहेत.)
मुंगळा ता.मालेगांव,जि.वाशिम ९४२३६५०४६८