
सर्वोच्च न्यायालयात शूज फेकण्याची धक्कादायक घटना; सरन्यायाधीश बी. आर. गवई ठाम
सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयात एका व्यक्तीने देशाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या दिशेने शूज फेकले. सुदैवाने तो शूज सरन्यायाधीशांच्या बेंचपर्यंत पोहोचला नाही. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेण्यात आले.
घटनेनंतर सरन्यायाधीश गवई म्हणाले, “अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होणार नाही. कृपया सुनावणी पुढे चालू ठेवा.” प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शूज फेकणारा वृद्ध व्यक्ती “हिंदुस्तान सनातनचा अपमान सहन करणार नाही” असे घोषणा देत न्यायाधीशांच्या बेंचकडे शूज फेकत होता. न्यायालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेतले.
माहिती नुसार, त्या व्यक्तीकडे सर्वोच्च न्यायालयातील वकील व क्लार्क यांना दिले जाणारे प्रॉक्सिमिटी कार्ड होते. त्यावर किशोर राकेश असे नाव नोंदलेले आहे. तरीही, शूज फेकण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ इंदिरा जयसिंग यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले की, “हा देशाच्या सर्वोच्च न्यायालयावर झालेला जातीयवादी हल्ला आहे. संबंधित वकिलाचे नाव जाहीर करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे.”
ही घटना सरन्यायाधीशांच्या भगवान विष्णूंबद्दलच्या एका टिप्पणीनंतर घडली आहे. सर्वोच्च न्यायालयाने खजुराहो मंदिर संकुलातील जावरी मंदिरातील भगवान विष्णूंच्या मूर्तीचे पुनर्निर्माण करण्याची याचिका फेटाळली होती. त्या याचिकेवर सरन्यायाधीश गवई यांनी सुनावले, “तुम्हीच भगवान विष्णूंकडे जा आणि त्यांच्याकडेच न्याय मागा.” सोशल मीडियावर त्यांच्या या टिप्पणीनंतर काही लोकांनी टीका केली होती, यावर सरन्यायाधीश गवई यांनी स्पष्ट केले, “मी सर्व धर्मांचा आदर करतो.”
● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन
माझ्यावर कोणताही परिणाम होणार नाही…