
आज आपल्याला दिसतंय की सर्वच लोकं मोबाईलवर व्यस्त दिसतात. घरादारात हीच परिस्थिती आहे व लोकांचा घरादारातील हा व्यवहार पाहून असं वाटायला लागलं आहे की आज संवाद घराघरातून हरवत चालला की काय? यावर बरेच लोकं चिंताही व्यक्त करीत आहेत व वर्तमानपत्रातून त्यास्वरुपाच्या बातम्याही छापून येत आहेत.
संवाद…… संवाद हरवला आहे. तो घरातून कुठे निघून गेला ते कळत नाही. शेजारी जावून बसला असेल असं वाटल्यानं तिथंही दिसला नाही. वस्तीत शोधलं संवादाला. तिथंही सापडला नाही. मग गेलो गावात. तिथंही नव्हताच. त्यानंतर तालुक्यात, शहरात, राज्यात, देशात व जगात संवादाला शोधलं. तरीही संवाद आढळलेलाच नाही. मग टिव्हीवर एक बातमी रुपानं त्याचा एक अवयव दिसला. व्हाट्सअपवर एक अवयव दिसला. फेसबुकवर व इंन्ट्राग्रामवर एक अवयव दिसला. यु ट्यूबवर एक अवयव दिसला. तेव्हा जाणवलं की संवादाची कत्तल झाली. त्यानंतर खुनी शोधायला लागलो असता खुनी सापडतच नव्हता. अशातच एके दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली. जो संवाद हरवला होता व त्याची कत्तल झाली व ती कत्तल मोबाईल व स्मार्टफोन या दोघांनी मिळून केली.
होय. संवादाची कत्तलच. अलिकडं संवाद दिसत नाही. ना शेजारी पाजारी संवाद होतांना दिसत. ना टिव्हीवर संवाद होतांना दिसत. चार माणसातील संवाद आज हरवला आहे. समाजात काल चार गोळा होणारी व चौकडीवर दिसणारी, तशीच चर्चा करणारी माणसं आज दिसत नाहीत. आज कालच्या पानठेल्यावरही खर्रा खाण्यानिमीत्यानं का असेना, दिसणारी माणसं आज दिसत नाही. मग ही माणसं गेली कुठं? ही माणसं गुंग झाली अलिकडे अस्तित्वात आलेल्या स्मार्टफोनमध्ये. स्मार्टफोन घराघरात पोहोचला व घराघरात होणारा संवाद हरवला.
आज हीच माणसं, जी काल चर्चा करायची चावडीवर बसून एखाद्या गावातील गंभीर समस्येवर. ती चावडी राहिली नाही. ती माणसं आता चावडीवर बसून ऑनलाईन गेम खेळत असतात. यातून अगदी वयोवृद्ध माणसंही सुटलेली नाहीत. आज जी माणसं कुटुंबात घरात एकमेकांसोबत बसून संवाद साधत होती. ती माणसं आज दिसत नाहीत. आताच्या काळात पती आपला वेगळा मोबाईल घेवून बसलेला दिसतो. पत्नी वेगळी मोबाईल घेवून बसलेली दिसते आणि मुलं वेगळीकड आपला आपला मोबाईल घेवून बसलेली दिसतात. एखाद्यावेळेस एखाद्याचा मोबाईल हिसकावून घेतल्यास वाद होतात व कत्तलही होते प्रसंगी. ज्या कत्तलीच्या बातम्या वर्तमानपत्रातून झळकतात. काल घरातच सामूहिक जेवायला बसणारी माणसं आज दिसत नाहीत. मोबाईलवर सुरु असलेलं चॅटिंग संपल्याशिवाय कोणी जेवत नाही. तसं पाहिल्यास मोबाईल पाहण्याच्या सवयीनं शरीराची हालचाल होत नसल्यानं भूकच लागत नाही. जणू भूकही मेल्यागत झालीय. त्यातच मधातच घरचा एखादा सदस्य एखाद्यावेळेस एखाद्या कामाचं बोलल्यावर महाभयंकर राग येतो. डिस्टर्ब झाल्यासारखं वाटतं. मुळात संवाद संपुर्णतः अदृश्य झालेला आहे.
विशेष म्हणजे मोबाईल हे आपले सर्वस्व नाही की आपण त्यात गुंगून जावे. शिवाय मोबाईलवर गुंगून जाणे हे संवाद हरविण्याचं कारण नाहीच. कालची मंडळी टिव्ही तरी पाहात होती आणि टिव्ही पाहतांना बोलत तरी होती एकमेकांशी आपापसात. परंतु आता टिव्ही पाहण्याचंही काम नाहीच. टिव्हीवर कार्यक्रम पाहण्याऐवजी लोकं फोनच जास्त करुन पाहात असतात. कधीकधी टिव्ही सुरुच असतो आणि लक्ष मोबाईलवर असतं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास लोकं म्हणतातही की जास्त मोबाईल पाहाणं बरं नाही. त्याचे दुष्परिणामही सांगतातच. तरीही लोकांनी मोबाईल पाहाणं बंद केलेले नाही. तसा आजचा काळ पाहता मोबाईलची जास्त गरज आहे. परंतु मोबाईल तेवढाच वापरावा. जेवढी त्याची गरज आहे. तसा संवाद साधावाच. संवाद होणं चांगली गोष्ट आहे.
संवाद ही चांगली गोष्ट आहे. त्या संवादातून आपापले नाते जोपासता येतात. एकमेकांच्या भावना जोपासता येतात. एकमेकांच्या भावनांची कदर करता येते. परंतु अलिकडील काळात हाच संवाद हरवत चाललेला असून त्यातून संभाव्य लक्षण म्हणजे देशाच्या उज्जवल भविष्याचीही चिंता लागून आहे. जर लोकं आजच्याच पद्धतीप्रमाणे केवळ मोबाईलमध्येच किरकोळ कामासाठी व्यस्त असतील तर उद्या हीच माणसं घरासाठी वा कार्यालयातही अजिबात कामे करणार नाहीत. ज्यातून देशाचंही वाटोळं होण्याची चिंता आहे. म्हणूनच सांगावेसे वाटते की होय, मोबाईल पाहणं आवडतं ना. नक्कीच पाहा. परंतु त्यात एवढं गुंतून जावू नये की आपण घरातच एकमेकांना पारखे होवू. आपण घरातच असूनही एकमेकांपासून दूर जावू.
आपण मोबाईल हाताळावा व असं वागावं की आपले घरातले नाते टिकेल. आपला घरातील संवाद हरविणार नाही. आपल्या शेजाऱ्यामध्ये होणारा संवाद हरविणार नाही. समाजात होणारा संवाद हरविणार नाही. घरात मोबाईलवरुन कोणत्याच स्वरुपाची भांडणं होणार नाहीत. तशाच चावड्या आणि चावड्यावर होणारे संवाद टिकतील. शेजाऱ्यांशीही बोलणं व्यवस्थीत होईल. घरात बोलणं व्यवस्थित होईल. कारण वेळप्रसंगी शेजारीच आपल्या सुखदुःखात धावून येतो. घरची मंडळीही धावून येतात. आपले नातेवाईक नाही. परंतु संवाद होत नसेल व आपण मोबाईलवरच घरातल्या घरात गुंतून बसू तर एकवेळ अशी येईल की आपण घरातल्या घरात कुढत बसू एखाद्या प्रसंगी. तेव्हा घरातील व्यक्ती म्हणेल, ‘माझी थोडीशीच सिरीयल पाहायची बाकी राहिलेली आहे. ती पाहतो. ती संपली की मदत करतो.’ शेजाऱ्याला आपल्या प्रसंगाची माहितीच होणार नाही अन् झाली तर तोही म्हणेल की माझ्याशी अमूक व्यक्ती बोलत नाही. मी कशाला धावू. त्यातच शेजारीही धावून येणार नाही. त्याचं कारण असेल संवाद न होणं. अशातच आपण मरुन जावू व वाचवायला मोबाईलच्या नादानं कुणीच येणार नाही. कारण संवाद तेव्हा कुठंतरी हरवलेलाच असेल यात शंका नाही. तेव्हा संवाद होणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ती व्हावी, निदान आपला जीव वाचविण्यासाठी तरी.
अंकुश शिंगाडे
नागपूर ९३७३३५९४५०
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र