
संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वावर ग्रंथप्रकाशन सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
अमरावती : संत परंपरेचा अमोल वारसा जपणाऱ्या श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती पर्वानिमित्त “श्री संताजी जगनाडे महाराज : संतत्व व कवित्व” या पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आज (८ डिसेंबर २०२५) संताजी भवन, उषा कॉलनी, MIDC रोड येथे अत्यंत उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. वसंत शंकरराव जामोदे (माजी उपकुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ) यांच्या शुभहस्ते झाले. प्रमुख पाहुण्या म्हणून श्री शंकरराव हिंगासपुरे, श्री रंगराव भागवत, श्री रामेश्वर गोदे आणि श्री अण्णासाहेब नालसे यांची मान्यवर उपस्थिती लाभली.
प्रा. विजय जयसिंगपुरे यांनी संताजी महाराजांच्या जीवनकार्याचा सखोल मागोवा घेतलेले हे पुस्तक संताजी सेना बहुउद्देशीय संस्था, अमरावतीच्या वतीने प्रकाशित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष श्री अरुणभाऊ गासे यांनी केले, तर पुस्तकाची मनोज्ञ ओळख श्री मा. बा. राऊत यांनी करून दिली.
व्यासपीठावरील मान्यवरांनी संताजी महाराजांच्या सामाजिक कार्य, कीर्तन परंपरा, भक्तीभाव आणि लोकजागरणातील योगदानाची विशेष आठवण करून देत पुस्तकप्रकाशनाचे महत्व अधोरेखित केले. डॉ. जामोदे यांनी संताजी महाराजांच्या जीवनपटावर प्रकाश टाकताना “आध्यात्मिकतेसोबतच सामाजिक परिवर्तनाचे भलेमोठे धडे संताजींच्या कार्यातून मिळतात” असे सांगत ग्रंथलेखनाबद्दल लेखकाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाला विविध भागातून आलेल्या समाजबांधवांनी उत्स्फूर्त उपस्थिती दर्शवली. प्रमोद गोधनकर, जयंंत मुळे, आशिष खोडके, अमित जामोदे, रमेश बोके, शितल राऊत, सौ. मीना गासे यांसह संताजी सेना बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांनी तन-मन-धनाने परिश्रम घेतले.
उपस्थित मान्यवरांचे आभार मानून, अल्पोहार-चहापाण्याने कार्यक्रमाचा सौहार्दपूर्ण समारोप करण्यात आला. संतत्व, साहित्य आणि सामाजिक परिवर्तनाचा संगम असलेल्या या ग्रंथप्रकाशन सोहळ्याने अमरावतीत एक आगळा ठसा उमटवला.
● हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!