
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे धर्मचिंतन: सर्वधर्म समभाव आणि मानवहित
मित्रांनो जगाच्या पाठीवर अनेक धर्म व त्या -त्या धर्माचे संस्थापक होऊन गेले. प्रत्येक धर्माचं आपलं एक वेगळं तत्वज्ञान आहे.आणी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की कोणत्याही धर्मानं वा धर्मग्रंथानं आपलं मत मांडतांना एक दुसऱ्याला दोष दिला नाही. किंवा आपलाच धर्म श्रेष्ठ की इतरांचा कनिष्ठ यावरही भाष्यही केले नाही. प्रत्येकानं एक चांगलाच विचार समाजापुढे मांडलेला दिसून येतो.कोणताही धर्म वाईट विचारानं वागा असं जनमाणसास शिकवत नाही. विदर्भ पंढरीत जन्मलेल्या वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा हेच सर्वसमावेशक धर्म विषयक तत्वज्ञान सांगितले आहे. राष्ट्रसंतांनी जी परिस्थिती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या गावांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सर्व बारकाईने अवलोकन केली होती. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध बनले होते. ज्या ज्या धर्माचा जो-जो चांगला विचार सांगीतला तो-तो विचार राष्ट्रसंतांनी उचलून धरला आहे. ग्रामगीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी जी सर्व धर्मपंथाच्या विचारवंताचे जे फोटो आहेत ते आपणास हेच दर्शवतात.
माझाचि नव्हे हा विचार| सर्व धर्म ग्रंथ पंथाचा सार’म्हणजेच जे जे मानवी हिताचं त्यांना दिसलं ते तो विचार त्यांनी जसाच्या तसा आपल्या ग्रामगीता प्रबोधनातून मांडला आहे.शरिराचा धर्म म्हणजे आहार,निद्रा,भय, मलमुत्र विसर्जन एवढा आहे.मनाचा धर्म म्हणजे शब्द, स्पर्श,रूप गंध हा आहे तरआत्म्याचा धर्म म्हणजे आत्मानुभाव घेणे होय समाजधर्म म्हणजे या तीन धर्माच्या माध्यमातून उद्भवलेला प्रकाश समाजाच्या उपयोगी पडावा यासाठी केलेली व्यवस्था म्हणजे धर्म व्यवस्था होय अनेक धर्मांच्या विचारवंतांनी धर्माच्या व्याख्या केलेल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज धर्मांच्या संदर्भात सांगतात की,
”मै कर्तव्यको ही धर्म मानता हू।
यदी कोई घंटो पुजापाठ करते हुए भी भ्रष्टाचार,
कालाबाजार और घुसखोरी करता है तो हमारा पूजा पाठ,
ईश्वर उपासना सब ढोंग है।
मै चाहता हूँ, हर आदमी काम करे।
साधुसंत लोगो को समझावे की सब नीतीसे, सन्मार्गसे चले।
ज्ञान और नैतिकता का पाठ पढानेवाले बडे बडे ग्रंथ हमारे देश मे है,
पर उस ज्ञान का व्यवहार में बहुत कम दर्शन होता है।
इसलिये सब लोग आत्मनिरीक्षण करें और सही राह को अपनाये।”
– वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज
काही लोकं ओढून ताणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना फक्त हिंदू धर्माचच लेबल लावण्यात व्यस्त आहेत. त्यासाठी महाराजांच्याच भजनाचे दाखले जोडून आपलं अर्धवट पांडित्य जगाला दाखवत आहेत. हे दाखले महाराजांनी प्रसंग परत्वे म्हणजे प्रसंगानूरूप सांगितले आहेत.घेणाऱ्यांनी फक्त एवढेच घेतले बाकी सगळे सोडून दिले म्हणजे अर्थ लोपला पुराणी नाश केला शब्दज्ञाने ही वास्तविकता आहे. मुळात महाराजांची सेवा मंडळाला सांगीतलेली तत्वप्रणालीच वेगळी आहे.असं जर असतं तर महाराजांनी प्रार्थनेच्या आसनावर ‘हा गोल तकीया शोभला’ असं न लिहता एखाद्या देवीदेवतांचा फोटो सामुदायिक प्रार्थनेच्या आसनस्थानी ठेवला असता. व त्यांनी या प्रार्थनेला सामुदायिक प्रार्थना हे नामकरण न करता वेगळेच नाव दिले असते.सामुदायिकतेचा महाराजांनी सांगितलेला अर्थ खुप महान आहे.
समुदायाने केलेली प्रार्थना म्हणजे ‘सामुदायिक प्रार्थना’ असं महाराजांनी सांगितले आहे.
आओ कोईभी पंथी आओ कोई भी धर्मी|
देशी,विदेशीयो को, मंदिर यह हमारा ||
पुढं ते लिहीतात-
मानव का धर्म क्या है मिलती है राह जिसमे|
चाहता भला सभीका, मंदिर यह हमारा||
मी जर विशिष्ट धर्माच्या देवीदेवतांचा फोटो या प्रार्थनेत ठेवला तर सर्वधर्माची लोकं तेथे येणार नाहीत व ती प्रार्थना सामुदायिक प्रार्थना न राहता विशिष्ट धर्माचीच प्रार्थना होईल.ही दूरदृष्टी राष्ट्रसंत तुकडोजी महारांजाची होती. म्हणूनच त्यांनी फक्त शुद्ध खादीच्या आसनाला महत्व दिले. जेणेकरून आश्रमात सर्वधर्म पंथ, समुदायाचे लोकं प्रार्थनेच्या रांगेत येऊन बसतील व आपापल्या ईष्ट देवतेला त्या त्या भावानुसार भक्तीभावाने आळवतील.ही समजूतदारपणाची भूमिका त्यांनी घेतली म्हणून गुरूकुंजाचे नाव सर्वधर्मसमभावाचे प्रतिक म्हणून राष्ट्रीयच न राहता आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले. त्याला कारणीभूत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समृद्ध व सकस विचारप्रणाली आहे.
मेरी नजर इसलिए मैने उॅची पायी|
सब विश्व को अपने दिल से माना भाई|
पर-धर्म मुझे इसलिए न बुरे लागते है|
ये सभी अपने प्रभू के रूप परखते है||
त्यांचे हे धर्माविषयी सर्वसमावेशक व प्रगल्भ विचार ऐकून खुद्द भारताच्या राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसादांनी त्यांना ‘आप तो सचमूच राष्ट्रसंत हो’ अशी उपाधी त्यांना बहाल केली होती.याहून आणखीन मोठा पुरावा कोणता असू शकतो? महाराज ग्रामगीता ग्रंथात पुढं लिहितात
सर्व धर्मांचा समन्वय|विश्वशांतीचा उपाय|
लोकं सुधारण्याचे विद्यालय| सामुदायिक प्रार्थना
ह्या ग्रामगीतेच्या ओव्या सर्व काही सांगून जातात.याचाच अर्थ श्री गुरुदेव सेवा मंडळाचा हा विचार एकांगी नसून सर्वधर्म समावेशक व एकमेकांना परस्परपूरक आहे हेच आपणास यावरून दिसून येते.
मानवताही पंथ मेरा इन्सानीयत ही पक्ष मेरा|
सबकी भलाई धर्म मेरा|दुविधाको हटाना कर्म मेरा|
एक जात बनाना वर्म मेरा|
सब साथ चलना मर्म मेरा| निच उॅच हटाना गर्व मेरा|
गिरते को उठाना स्वर्ग मेरा||
यावरून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा पक्ष कोणता व त्यांचा धर्म कोणता? याचा अचूक अंदाज आपणास आल्या शिवाय राहणार नाही. खुद्द राष्ट्रसंता सारख्या महापुरुषांना हिंदू धर्माचेच वा विशिष्ट धर्माचे प्रणेते म्हणून लेबल चिटकवणाऱ्यांची पोलखोल या महाराजांच्या सर्वधर्म समभावाच्या विचारातून होते.खरच राष्ट्रसंतानं एका विशिष्ट धर्माच्या चौकटीत बंदिस्त करणं उचित ठरणार नाही.ज्या महात्म्यानं समाजात निर्माण झालेल्या दंगे सदृश परिस्थिती उत्तम पद्धतीने हाताळण्यासाठी जनतेमध्ये सामाजिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी राजापेठ गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीची स्थापना एका मुस्लिम समाजातील प्रसिद्ध समाजसेवक शेख सुलेमान भाई नामक व्यक्तीच्या हातून केली. तेव्हाही काही समाजकंटकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हिंदू विरोधी आहेत.अशी हाकाटी काही वृत्तपत्रामधून पिटली होती.पण या उठलेल्या वादळाला तेवढ्याच ताकदीने राष्ट्रसंतानी प्रखरपणे उत्तर दिले व ही आग शमवली यातून सर्वधर्मसमभावाचा संदेश देण्यात महाराज यशस्वी ठरले हे नक्कीच.(खुलासा करण्यासाठी संदर्भ -सुदाम सावरकर लिखित ‘जीवनयोगी’ खंड -६ पानं नं -२० जरूर पहावा)
विशिष्ट विचारधारेच्या लोकांसोबत एकत्र फोटोंमध्ये दिसणारे महाराज हे फक्त विशिष्ट धर्माचेच समर्थकच असं म्हणणं उचित ठरणार नाही.महाराजांनी गावोगाव गौतम बुद्धाचींही जयंती साजरी करून शांतीचा संदेश दिला.जापान येथे सर्व राष्ट्रांच्या सर्वधर्म परिषदेस जमलेल्या प्रतिनिधींना युद्धातून नरसंहार घडून आणण्यापेक्षा भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेल्या पंचशिलाचा अंगिकार सम्पूर्ण जगासाठी कसा पोषक आहे ही गोष्ट प्रकर्षाने तुकडोजी महाराजांनी पटवून दिली होती.व हा प्रभावी विचार त्यांना अंगिकारण्यास भाग पाडला होता हे त्रिवार सत्य आहे.मग यावरून महाराजांवर बौद्ध धर्माचा शिक्का माराल काय? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि ताजूददीन बाबांचाही एकत्रीत फोटो आहे.
अनेक धर्मांच्या महापुरुषांच्या सोबत व धर्माच्या विचारवंतासोबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फोटोत आहेत. त्यांनी मोठमोठ्या साहित्य संमेलनाच्या किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिवेशनाला किंवा तमाशाचं उद्घाटन असो. स्वता जातीने हजेरी लावून जेथे गरज आहे तेथे त्यांचे कान टोचले आहेत. तमाशाचं उद्घाटनही राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या हातांनी केलं आहे.तमाशांनी फक्त विकृत मनोरंजनाचं साधन बनून न राहता कलेच्या माध्यमातून समाजाचंही प्रबोधन कसं होईल याकडे लक्ष द्यावं. असे महाराजांचे तमाशाच्या उद्घाटनप्रसंगीचे विचार आहेत.शेवटी त्यातून समाजहिताचाच संदेश महाराजांनी दिला आहे.म्हणून संतांना कोण्या जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त करणं त्यांच्यावर जातीधर्माचा शिक्का मारून मोकळं होणं हे उचित नाही. असा जर एकांगी विचार आपण करत असू तर ‘जेव्हा तुझे दर्शन घडे| उघडती विशाल ज्ञानांची कवाडे| मग मी तू पणाचे पोवाडे |कोठचे तेथे या ओवीचा अर्थ काय दर्शवतो? हे तपासून पाहण्यासाठी पुन्हा तुम्हाला,आम्हाला एकदा चिंतन करणं गरजेचं आहे.जय गुरु
विजय जयसिंगपुरे
अमरावती
भ्रमणध्वनी- ९८५०४४७६१९