Rashtrasant : गुरुकुंज व ग्रामगीता

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    ‘सबके लिये खुला है,मंदीर यह हमारा’ व ‘विश्व स्नेहका ध्यान धरे,सबका सब सम्मान करे’,गुरुकुंजाच्या महाद्वारावरील हे बोधवाक्य सर्वांचे लक्ष वेधून घेते.गुरुकुंज आश्रमाची निर्मीतीच मूळात अशा बोधभावनेतून जगदोद्धाराकरिता वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ह्यांनी करुन ठेवलेली आहे.तिथे आलेल्या प्रत्येकालाच काही ना काही स्फूर्ती आश्रमातल्या आतील प्रत्येक द्वारावर लिहिलेल्या बोधवाक्यातून मिळत असते.१९३५ साली एका झोपडीतून निर्माण झालेल्या या आश्रमाचे आता वटवृक्षात रुपांतर झालेले आहे.गुरुकुंज हा नुसता आश्रम नसून ते ‘मानवतेचे विद्यापीठ’ ठरावे.तेथील प्रार्थना मंदिरातील सिंहासनावर कोणत्याही देवी-देवतांची मूर्ती विराजमान नसून सर्वधर्मसमभावाचे जगातील हे एकमेव मंदीर ठरावे.तेथील गाभाऱ्यात बसून कोणत्याही देशातील,धर्मातील मुमुक्षुला आपल्या अंतस्थ असलेल्या भावाने ध्यान,प्रार्थना करता येते.लौकिकार्थाने गुरुकुंज हा आश्रम नसून मानवसेवेचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून तिथे छात्रालय,वृद्धाश्रम,अनाथालय व रूग्णालयाची व औषधालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे.तसेच अध्यात्माच्या अभ्यासकाकरिता दासटेकडीवर वं.महाराजांच्या संकल्पनेतून राम-कृष्ण -हरि मंदीर उभारण्यात आलेले आहे.भारतासह जगातल्या अनेक संत महात्म्यांच्या मूर्ती तेथे विराजमान आहेत.आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाचनालय तेथे निर्माणाधीन आहे,जगातल्या कोणासही ईथे येऊन अध्यात्माचा अभ्यास करता यावा हा त्यामागे उद्देश आहे.

    गुरुकुंजात आले असता वं.महाराजांच्या अलौकिक कार्याचे दर्शन घडते.विविधांगी केलेल्या प्रयोगातून ते आपल्याला अनुभवता येते.वं.महारांजानी हिंदी व मराठीतून केलेली विपुल साहित्य संपदा आपणास ईथे अभ्यासता येथे. सकाळचे ध्यान व संध्याकाळची सामुदायिक प्रार्थना हा गुरुकुंज आश्रमाचा आत्मा आहे,ह्या दोन्ही प्रार्थना देशाचा सुद्धा आत्मा व्हावा.१९३५ सालापासून हा ज्ञान-यज्ञ अविरत सुरु असून यात कधीही खंड पडलेला नाही.श्रीगुरूदेवांच्या पाईकांनीच तो अविरत तेवत ठेवला आहे.पंढरपूरच्या वाळवंटात जो ग्रंथ लिहिण्याची स्फूर्ती व प्रेरणा
    पांडूरंगाकडून वं.महाराजांना मिळाली,त्या नव्या युगाचा ग्रंथ ‘ग्रामगीता’ लिहिण्याची सुरुवातही याच गुरुंकुंजातून झालेली आहे व पूर्णत्वही ईथेच झालेले आहे.अध्यात्म व विज्ञान याचा सुरेख संगम आपणास या ग्रामगीतेत पहावयास मिळतो.

    भारतवर्षावर आजचे जे महाविनाशकारी संकट आले आहे,त्याच्या परिणामाचा विचार केला असता आपल्या संतांनी सांगितलेले विचार तेव्हाच्या आणि आताच्या काळाला किती अनुरुप व प्रबोधनकारी होते याची प्रचिती येते.महाराष्ट्रातील संतपरंपरेतील वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ह्यांनी लिहिलेल्या ग्रामगीतेतून त्याची प्रचीती येते. ग्रामगीतेत एकूण ४१ अध्याय लिहिले असून ऐकेक अध्याय मानवजातीचे हिताकरिताच लिहलेला आहे.आणि हे सर्व अध्याय लिहिण्याची स्फूर्ती त्यांना भगवंतानेच दिली असल्यामुळे भगवंताचीही असाच समाज निर्माण होवो ही अभिलाषा आपोआपच प्रकट होते.

    पूण्यक्षेत्र पंढरपुरी।बैसलो असता चंद्रभागेतिरी।
    स्फुरू लागली ऐसी अंतरी।विश्वाकार वृत्ति।।
    तेथे दृष्टांत होई अदभूत।कासया करावी विश्वाची मात?।
    प्रथम ग्रामगीताच हातात।घ्यावी म्हणे।।

    भगवंताची स्फूर्ती व गुरुकृपा हे जरी निमीत्त असले तरी तल्लख बुद्धीमत्ता,प्रचंड आकलनशक्ती,व गहन चिंतनातून त्यांनी ग्रामगीतेतला एकेक अध्याय जन्माला घातला. भारताला स्वातंत्र झाल्यानंतर लगेचच्याच काळात म्हणजे १९५५ साली हा युगग्रंथ लिहून प्रकाशित करण्यात आला.खरे म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात ह्या युगग्रंथानुसार भारत निर्माण करण्याची पर्वणी आपल्याला चालून आलेली व्होती.भारतीय राज्यकर्त्यांनी संतांचा वापर फक्त राजकारण साधण्यापुरताच करुन घेतला हे खेदाने म्हणावे लागते.भारतवर्षात अनेक अवतारी व युगद्रष्टे पुरुष होऊन गेले.त्या अवतारी व युगद्ष्ट्या पुरुषांपैकी श्री तुकडोजी महाराज हे शेवटचे पुरुष होत.कोणी ऐकतच नाही तर मग भगवंताने अवतार घेणे बंद केले असावे?

    ग्रामगीता हा नव्या युगाचा ग्रंथ आहे,त्यानुसार भारत देशाची वाटचाल अपेक्षित होती.वं.तुकडोजी महाराजांनी त्याकरिता सारा भारत देश पालथा घातला,किर्तन,प्रवचने व खंजेरीच्या माध्यमातून पोटतिडकीने प्रबोधन केले.अगदी राष्ट्रपती भवनापर्यंत खंजेरीचा निनाद करुन प्रबोधन केले.वयाच्या एकोनसाठ वर्षापर्यंतच्या प्रबोधनाचे सार पांडूरंगाच्या साक्षीने या ग्रामगीतेत आपल्या अंतस्थ हृदयातून लिहिले.

    ग्रामगीता माझे हृदय।त्यात बसले सदगुरुराय।
    बोध त्याचा प्रकाशमय।दिपवोनि सोडील ग्रामासि।।

    ग्रामगीतेच्या आतापर्यंत अनेक आवृत्या निघाल्या,अगदी शासनानेही आवृत्ती काढली.कर्मयोगी गाडगेबाबानेही ह्या ग्रामगीतेला वानोलं.अनेक थोर विचारवंत,साहित्यिक,धुरंधर राजकारणी ह्यांनीही ग्रामगीतेला वानोलं.ग्रामगीता ग्रंथातील प्रस्तावना व अभिप्राय पाहिले कि मन भरुन येते.परंतु ह्या ग्रामगीतेत वर्णन केल्याप्रमाणे आधुनिक भारताची रचना करण्यात सारेच कमी पडले.मनुष्याच्या जीवनातले जीवन जगण्याचे जे सुखालंकार आहे ते सर्व या ग्रामगीतेत आलेले आहे,देशभक्ती आहे,देशसेवा आहे,मानवसेवा आहे,मानवोध्दाराची सर्व अंगे अंतर्भूत आहे.येणाऱ्या सर्व अडचणीवर मात कशी करावयाची याचे योग्य ते विश्लेषण त्या त्या अध्यायात करण्यात आलेले आहे.ते सर्व ग्रामगीता वाचल्यावर कळते,म्हणून ग्रामगीता देव्हाऱ्या पुरती व घरापुरतीच मर्यादित न राहता संसदेत गेली पाहिजे,संसदेतून त्यातील बोधानुसार सर्व देशात आचरली जाईल असे कायदे झाले पाहिजेत.त्याने देश समृद्ध होईलच हे मात्र निश्चित कारण वं.तुकडोजी महाराजानंतर या कलियुगात युगद्रष्टा संत झाला नाही, होणे नाही.

● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!

    भारताला ललामभूत असलेल्या संस्काराचा,अध्यात्म व विज्ञानाचा अदभूत संयोग ग्रामगीतेत आहे.आपल्या राज्यकर्त्यांनी संत गाडगे बाबा व संत तुकडोजी महाराज हे फक्त स्वच्छता अभियान व उत्कृष्ट ग्राम पारितोषकापुरतेच मर्यादित ठेवले.चीन-भारत युद्धाच्या वेळी ह्याच संताने सीमेवर जाऊन भारतीय जवानांचा जोश वाढविला होता.अध्यात्मात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले होते.तेव्हाच जर या संताची दखल भारत घडविण्यासाठी घेतली असती तर भारत केव्हाच महासत्ता झाला झाला असता व जागतिक शांतता नांदण्यास मदत झाली असती.शहरांचा विकास करण्यातच आपल्या राज्यकर्त्यांनी धन्यता मानली.मागचा-पुढचा काहीच विचार न करता शहरे वाढू दिली.

    गाव हा विश्वाचा नकाशा।गावावरुन देशाची परीक्षा
    गावची भंगता अवदशा।येईल देशा।

    आता हरेक शहराची लोकसंख्या प्रचंड वाढली.आतापावेतो लहानमोठे व्हायरस आले,ते विज्ञानानं निभावून नेलं.परंतु आता जो व्हायरस आला आहे तो ह्या मोठमोठ्या शहरीकरणामुळे व शहरातल्या अनियंत्रित असलेल्या गर्दीमुळे आटोक्यात आणता आणता नाकी दम येत आहे.वं.तुकडोजी महारांजाची त्यावेळची हाक कोणी आईकली नाही.ग्रामगीतेचीही कोणी दखल घेतली नाही.जर दखल घेतली असती तर आताचा हा व्हायरस चुटकीसरशी आटोक्यात आणता आला असता व भारत देश हा एक आगळाच देश म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर हिऱ्यासारखा प्रकाशमान झालेला दिसला असता.अजूनही वेळ गेलेली नाही.ग्रामगीता हा ग्ंथ त्यांनी ग्रामनाथालाच का अर्पन केला त्याची प्रचिती आपणा सर्व देशवासियांना आता येतच आहे.आपण आपली खेडी स्वयंपूर्ण केली तरच भारताचा विकास हा खऱ्या अर्थाने विकास होईल हे त्यांनी जाणले होते,माझा जन्मदिवस माझ्या नावाने साजरा न करता ग्रामजयंती म्हणून साजरा करा असेही त्यांनी सुचविले होते.स्वातंत्योत्तर काळात गावाकडे विशेष लक्ष देऊन गावे स्वयंपूर्ण केली असती तर अनेक अडचणीवर मात करित आपला समृद्ध वारसा चांगल्या रितीने सांभाळता आला असता.

    -आबासाहेब कडू,
    अमरावती
    ९५११८४५८३७

Leave a comment