‘रामा कलेक्टर झाला : ध्येयासाठी झपाटलेली वाटचाल’
युवा साहित्यिक अशोक पवार लिखित ‘…आणि रामा कलेक्टर झाला ‘ ही कादंबरी वाचण्यास नुकतीच हाती घेतली. सदर कादंबरीस आयकर उपायुक्त विष्णू औटी यांची आशयगर्भी प्रस्तावना मिळालेली असून ज्येष्ठ साहित्यिक, संजय पठाडे यांची वाचकांच्या काळजास हात घालणारी दमदार पाठराखण लाभलेली आहे. मुखपृष्ठ इतके बोलके आहे की, कादंबरीच्या अंतरंगात कोणकोणते सहस्य दडलेले आहे हे पाहण्यासाठी वाचकांचे मन क्षणात भरारी घेते.
मनात असलेली जिद्द धगधगत्या मशालीसारखी सदैव पेटती ठेवल्यास आलेल्या कोणत्याही संकटावर मात करण्यास दहा हत्तींचे बळ देवून जाते. परिस्थिती माणसाला अनेकदा निराश करू शकते, परंतु पराजीत करू शकत नाही. हा या कादंबरीचा मूळ गाभा आहे. जर आपल्या डोळ्यांत स्वप्न असेल आणि काळजात जिद्द असेल, तर कोणतीही अडचण यशाच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकत नाही. हा संदेश देण्यात ही कादंबरी सोळा आणे खरी ठरलेली दिसते. परिस्थितीला दोष न देता ती बदलता येऊ शकते. यासाठी मात्र प्रत्येकाने संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे याची अनुभूती वाचकाला कादंबरी वाचत असताना पानोपानी मिळत राहते.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
दारीद्रयाने मारलेली मगरमिठी थोडीशी सैल करावी म्हणून एक अवलिया तरून पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईत येतो. पोटा-पाण्यासाठी दिवसभर हातगाडी ओढता-ओढता रात्रशाळेत जाऊन शिक्षण पूर्ण करतो अन् आत्मविश्वास व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आलेल्या प्रत्येक आव्हानाशी धैर्याने मुकाबला करून कलेक्टर बनतो. या ध्येयप्राप्तीसाठी त्या युवकाने झपाटल्यावाणी केलेली धडपड म्हणजे ‘…आणि रामा कलेक्टर झाला’ होय.
ही कथा आहे पारनेरसारख्या दुष्काळी भागात जन्म घेऊन, खडतर परिस्थितीशी दोन हात करून यशाला गवसणी घालणाऱ्या रामाची. एक गरीब घरात जन्मलेला, हातगाडी ओढणारा रामा. शिक्षण हेच खरं हत्यार आहे, गरीबीला पराभूत करायचं असेल तर शिक्षणाचा कोयता हाती घ्यायलाच पाहिजे असे ठरवतो आणि यूपीएससीच्या रणांगणात उतरून अशक्य वाटणाऱ्या लढाईत दैदीप्यमान विजय मिळवितो.
…तत्पूर्वी लहान वयापासूनच शाळेत हुशार असलेल्या रामाची घरची परिस्थिती जेमतेम असल्यामुळे रामा शिक्षण अर्धवट सोडून आपला मित्र रंगासोबत मुंबईमध्ये हातगाडी ओढण्याचे काम करण्यासाठी येतो. श्रीकृष्णाप्रमाणे पाठीशी उभा असलेला रंगा सतत रामाला शिक्षण पूर्ण करण्यासाठी योग्य दिशा दाखवत राहतो. गरीबीचे साखळदंड तोडायचे असेल तर शिक्षण हाच त्यावरचा रामबाण उपाय आहे हे स्वप्न उराशी बाळगून रामा रात्रशाळेत प्रवेश घेतो. दिवसभर हातगाडी ओढण्याचे काम, रात्री अभ्यास अशी रामाची दिनचर्या सुरू होते. गरिबीमुळे अनेकदा उपाशीपोटी फुटपाथवर वर्तमानपत्र अंथरून झोपावं लागायचं, शाळेची फी भरणंसुद्धा कठीण होवून जायचं, पण या सगळ्या अडचणींवर मात करून रामाने शिक्षण सुरू ठेवलं. त्याला माहिती होतं की, आपलं भविष्य फक्त आणि फक्त शिक्षणानेच उजळू शकतं.
लेखकाने कादंबरीतील रामाचा संघर्ष व त्याची पिडा एवढ्या प्रभावीपणे मांडली आहे की, कादंबरी वाचत असताना वाचकांच्या पापण्यांच्या कडा केव्हा ओल्या होतात हेही समजत नाही. विषयानुरूप मांडणी, मांडणीतील खोली संवेदनशील मनाला स्पर्श करून जाते. पितळी, डाचरं, घसरा, वढाळ, बुचकुली, धपली, गदाळ, नस्तर, कोड्यास, इपाऱ्या असे अस्सल पारनेरी गावरान शब्दांचा साज कादंबरीवरील पकड अधीक घट्ट करते. प्रत्येक पात्राचे वर्णन, त्यांचा वावर वाचकांना आपल्या जवळचे वाटतात. सदैव सावलीसारखा पाठीशी उभा असणारा रंगा, बोलण्यात पटाईत असणारा डुल्या, बुजऱ्या स्वभावाची शेवंता, मायाळू अन् तितकाच हळवा जुबिनभाई, रामाच्या अभ्यासावर घारीसारखी नजर ठेवून विविध अडचणींना दूर ठेवण्याचा प्रयत्न करणारी रूसी, गरुड भरारी घेण्यासाठी पंखांना बळ देणारे अभिजित सर ही सर्व पात्रे वाचकांच्या डोळ्यांसमोर जिवंतपणे उभी करण्यात लेखक अशोक पवार निर्विवादपणे यशस्वी झाल्याचे दिसतते.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
ही कादंबरी एवढी मार्गदर्शक आहे की, जो कोणी या कादंबरीचे वाचन करील त्याच्या आयुष्यात कितीही काळाकुट्ट अंधार असला तरी त्याच्या मार्गात प्रकाशाचे किरण चमकल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र नक्की. जर तुमच्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर, जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही याचे आजची तरुण पिढी रामाकडून प्रेरणा घेऊ शकते. हातगाडी ओढणारा रामा कलेक्टर झाला हे केवळ रामाचं यश नसून ध्येयाशी एकनिष्ठ राहून प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ही कादंबरी प्रेरणादायी आहे.
परिस्थिती कितीही बिकट असली तरीही जिद्द, चिकाटी, शिक्षण आणि मेहनत यांचा चौकोण पूर्ण करणाऱ्या व्यक्तिस मोठ्ठं यश मिळवता येऊ शकतं. माणसाने हतबल न होता सदैव प्रयत्न करत राहीले पाहिजे असा मोलाचा संदेश देणारी ‘…आणि रामा कलेक्टर झाला’ ही कादंबरी आहे असे मला वाटते. ही कादंबरी साहित्यविश्वात ध्रुव ताऱ्याप्रमाणे आपले अढळ स्थान निर्माण करेल हा विश्वास वाटतो. लेखक अशोक पवार व ‘…आणि रामा कलेक्टर झाला’ या साहित्यकृतीस अनेकोत्तम सदिच्छा…!

–संदीप राठोड
निघोज, 9922663595
पुस्तक प्रकार- कादंबरी
शीर्षक- आणि रामा कलेक्टर झाला
लेखक- अशोक पवार
प्रकाशन- पारनेर साहित्य साधना
पृष्ठसंख्या- ३०८
किंमत- ३५० रु. मात्र
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
–बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
- नम्र निवेदन
“भयमुक्त आणि चाटुगिरीविरहित पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
–बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन
