
मोठा दिलासा! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, शेतीकर्ज पुनर्गठनाची शक्यता
सोलापूर :ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात खरीप हंगाम पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील पावणेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून ४६ महसूल मंडलांमधील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर असलेली कर्जवसुली थांबवून शेतीकर्जाचे पुनर्गठन करावे, अशी मागणी सातत्याने होत आहे. उद्या (बुधवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर येत असून, या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील तब्बल १६ लाख शेतकऱ्यांकडे ३४ हजार कोटींची थकबाकी आहे. त्यापैकी फक्त सोलापूर जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांकडेच २,७०० कोटींची थकबाकी असल्याचे अधिकृत आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.
पूरस्थितीचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ व मराठवाड्यातील जालना, बुलडाणा, परभणी, नांदेड, यवतमाळ, वर्धा, धाराशिव, धुळे, बीड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अहमदनगर या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना बसला आहे.
काढणीला आलेले सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, मका या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेला असून रब्बी पेरणीही धोक्यात आली आहे. अनेक शेतकरी कुटुंबांना घर सोडून स्थळांतर करावे लागले आहे.
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसानभरपाई दिली जाईल. प्रशासनाला तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच बँकांच्या कर्जवसुलीबाबतही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ठोस निर्णय घेतला जाईल,” असे आश्वासन दिले.
यामुळे आता शेतकऱ्यांना कर्जवसुलीला स्थगिती आणि शेतीकर्जाच्या पुनर्गठनाचा मोठा दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोठी बातमी! पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबणार, …