
अकोला : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक जिल्ह्यांतील पिके वाहून गेली आहेत. उभ्या पिकांवर पाणी साचल्याने शेतकऱ्यांची दिवाळं जवळ आलं आहे. अशा संकटाच्या काळात सरकारकडून तातडीची मदत मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु अजूनही “ओला दुष्काळ” जाहीर करण्यात राज्य सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोला येथील आपल्या निवासस्थानी त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकरांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल करत सरकारवर जोरदार टीका केली.
सरकारचा नियम आणि शेतकऱ्यांचे प्रश्न
आंबेडकर म्हणाले, “ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय शासन कोणत्याही मदतीला परवानगी देऊ शकत नाही. पण नियम असा आहे की, पूर ओसरल्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना मदत मिळावी की नाही, यावर सरकारच्या निर्णयाचा खेळ सुरू आहे. सर्वेक्षणही झालेले नाही, आकडेवारी गोळा झालेली नाही, मग शेतकऱ्यांना दिलासा नेमका कधी मिळणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.त्यांच्या या विधानातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारची असंवेदनशीलता अधोरेखित झाली.
राजकीय पक्षांवर हल्ला
फक्त सरकारवरच नव्हे तर इतर राजकीय पक्षांवरही प्रकाश आंबेडकरांनी घणाघाती टीका केली. सातबारा कोरा करण्याची आणि कर्जमाफीची मागणी पुन्हा जोर धरत असताना, आंबेडकरांनी पक्षपाती राजकारणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “आज कर्जमाफीची मागणी करणारे, ते मुख्यमंत्री असताना काय करत होते?” असा सवाल उपस्थित करून त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
निवडणुकीतील संकेत
पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबतही स्पष्ट संकेत दिले. आंबेडकर म्हणाले, “भाजपला सोडून इतर कोणासोबतही स्थानिक पातळीवर युती करण्यासाठी आमच्या पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला मुभा दिली आहे. महायुतीतील शिंदे गटाची शिवसेना असो वा अजित पवारांचा राष्ट्रवादी गट, त्यांच्यासोबतही आम्हाला हरकत नाही.” या वक्तव्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या पुढील राजकीय धोरणाबाबत उत्सुकता वाढली आहे.
शेतकऱ्यांच्या आशा सरकारकडे
आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वेदना आणि असंतोष बाहेर पडला आहे. नुकसान झालेला शेतकरी दिवसेंदिवस हवालदिल होत आहे. पिकं गेली, कर्जाचा डोंगर वाढला, आणि आता मदतीसाठी सरकारकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना “ओला दुष्काळ” जाहीर होण्याचीच वाट बघावी लागत आहे.
सरकारने यावर तातडीने निर्णय घेऊन मदत जाहीर करावी, अन्यथा ग्रामीण भागातून सरकारविरोधात रोष उसळण्याची शक्यता असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
ओला दुष्काळ जाहीर करायला का वेळ लावतात ? प्रकाश आंबेडकरांची जोरदार टीका