Sunday, October 26

विकसित भारताचं नवं उड्डाण, नवी मुंबई विमानतळाचं मोदींकडून उद्घाटन; भूमिपुत्र दि. बा. पाटलांना आदरांजली!

“पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन करताना, दि. बा. पाटील यांना आदरांजली अर्पण करताना”

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भव्य उद्घाटन आज पार पडलं. या ऐतिहासिक क्षणी मोदींनी महाराष्ट्राचे सुपुत्र आणि जननेते दि. बा. पाटील यांचं नाव घेत त्यांना अभिवादन केलं. “दि. बा. पाटील यांनी सेवाभावाने समाजकार्य केलं, त्यांचं जीवन सर्वांना प्रेरणा देणारं आहे,” असे भावनिक शब्द मोदींनी उच्चारले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदींनी मराठीतून शुभेच्छा देत म्हणाले, “विजयादशमी झाली, कोजागिरी पौर्णिमा झाली आणि आता दहा दिवसांनी दिवाळी — तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा!” त्यानंतर त्यांनी मुंबई व महाराष्ट्राच्या विकासाचा गौरव करत म्हटलं, “आज मुंबईची दीर्घ प्रतिक्षा संपली आहे. मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे. हे एअरपोर्ट आशियातील सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी ठरेल.”

मुंबईला आता भूमिगत मेट्रो मिळाल्याचंही त्यांनी नमूद करत कामगार व अभियंत्यांचं अभिनंदन केलं. “विकसित भारताचं हे जिवंत प्रतीक आहे,” असे मोदी म्हणाले.

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशातील तरुणांसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचाही उल्लेख केला. “काही दिवसांपूर्वी ६० हजार कोटी रुपयांची पीएम स्कीम सुरू झाली आहे. आता शाळेत शिकणाऱ्या मुलांनाही ड्रोन, रोबोटिक्स आणि ग्रीन हायड्रोजनसारख्या नवतंत्रज्ञानाचं प्रशिक्षण मिळत आहे. हा काळ तरुणांसाठी संधीचा काळ आहे,” असं मोदींनी सांगितलं.

दि. बा. पाटील यांच्या नावावर या विमानतळाचं नामकरण झाल्याचा उल्लेख करत मोदींनी सांगितलं, “आज मला महाराष्ट्राचे सुपुत्र दिग्गज नेते दि. बा. पाटील यांची आठवण येते. त्यांनी सेवाभावाने काम केलं. त्यांचं कार्य आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.”

विकसित भारताच्या संकल्पनेवर बोलताना मोदींनी म्हटलं, “जेव्हा वंदे भारत ट्रेन धावते, बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू असतं, मोठे हायवे आणि बोगदे तयार होतात तेव्हा भारताची गती आणि प्रगती दोन्ही दिसतात. भारताच्या तरुणांच्या उड्डाणाला नवीन पंख मिळत आहेत.”

या कार्यक्रमात मोदींनी नवी मुंबई विमानतळाचं कमळाच्या आकारातील भव्य डिझाइन ‘भारतीय संस्कृतीचं प्रतीक’ असल्याचं सांगितलं. “हा प्रकल्प विकसित भारताचं प्रतीक आहे,” असं ते म्हणाले.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.