नरेंद्र बोरकर : अपंगत्वावर मात
अपघातामध्ये एक पाय गमावल्यानंतरही माणसे फिनिक्स पक्षाप्रमाणे आयुष्यामध्ये उभी राहतात आणि आपल्या कर्तुत्वाने आपल्या मित्रमंडळीमध्ये कर्तृत्वाचा ठसा उमटवत असतात.अशी बरीचशी माणसे आपल्याला पाहायला मिळतील. आमच्या मित्रमंडळीमध्ये असाच एक माणूस आहे त्याचे नाव आहे नरेंद्र बोरकर. तो आमचा मित्र तर आहेच पण भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांचा वर्ग मित्र आहे . न्यायमूर्ती श्री भूषण गवई जेव्हा सुरुवातीला अमरावतीला ज्या फ्रेझरपुरा या भागामध्ये राहत होते त्याला लागून असलेल्या किशोरनगरमध्ये श्री नरेंद्र बोरकर यांचे राहणे होते. न्यायमूर्ती श्री भूषण गवई आणि नरेंद्र बोरकर यांनी अमरावतीच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयात डी बी एम हा कोर्स सोबतच केला. श्री गवईसाहेब यांच्याकडे तेव्हा फियाट कार होती. काही वेळा ते श्री बोरकर यांना घ्यायला यायचे व सोबत मिळून कॉलेजमध्ये जायचे. या मित्र परिवारामध्ये एक नाव अजून होते ते म्हणजे विजय आचलिया यांचे. श्री गवई साहेब आणि आचलिया एका बेंचवर आणि त्यांच्या मागे बोरकर असा बसण्याचा क्रम होता. परवा श्री भूषण गवईसाहेब जेव्हा अमरावतीला आले आणि दारापूरच्या कार्यक्रमात श्री नरेंद्र बोरकर त्यांना दिसला. तेव्हा आठवणीने त्यांनी जवळ बोलावले आणि फोटोग्राफरला फोटो काढायला सांगितले.
हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा
श्री नरेंद्र बोरकर सात एम डी एम एस डॉक्टरांना एकत्र करतो. ग्लोबल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारतो. प्रत्येक डॉक्टरला सगळ्या प्रकारच्या केबिन सगळ्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देतो. मा. लेडी गव्हर्नर व न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई गवई व खासदार डॉ.अनिल बोंडे यांना उद्घाटनाला बोलावतो. एका मोठ्या उपक्रमाचा उद्घाटन समारंभ घडवून आणतो. कुठेही आपले नाव नाही .कुठेही आपले गाव नाही. नाहीतर आजकाल प्रत्येक माणूस स्वतःच्या नावासाठी धडपडत असतो. सात एम डी एम एस डॉक्टरांना एकत्र आणणे म्हणजे सोपे काम निश्चितच नाही. पण नरेंद्र बोरकर यांनी ते सिद्ध करून दाखवले आहे .कारण पाय जरी तुटलेला असला तरी मन चंगा तो काठोप मे गंगा असे म्हणतात ना त्याप्रमाणे त्यांचे आहे .
कवी श्रेष्ठ सुरेश भटांचा 1980 साली आम्ही फार मोठा कार्यक्रम अमरावतीच्या नगर वाचनालय मध्ये घेतला होता. असा कार्यक्रम त्यापूर्वी व त्यानंतर महाराष्ट्रात झाला नाही.अमरावतीच्या इतिहासात या कार्यक्रमाची नोंद झाली. 1980 साली वर्तमानपत्राच्या पुरवण्या काढणे हा खूप मोठा प्रकार होता. फार तुरळक पुरवण्या निघायच्या. तेव्हा एका दैनिकाने चार पानांची व एका इंग्रजी दैनिकाने एक पानाची पुरवणी काढण्याचे ठरविले होते. मजकूर जुळून झाला होता . वर्तमानपत्रांना बातम्या जाहिराती सुरू होत्या.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
मी कार्यक्रमाचा मुख्य संयोजक होतो. कवी श्रेष्ठ श्री सुरेश भट यांचे जवळचे मित्र डॉ मोतीलाल राठी अरविंद ढवळे मीनाताई ढवळे रामदास भाई श्रॉफ वली सिद्दिकी दादा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण राबवत होतो. तेवढ्यात एक तरुण माझ्याजवळ आला. नरेंद्र बोरकर त्याचे नाव .तो म्हणाला सर मला माझ्या वर्तमान पत्रासाठी एक पृष्ठाची पुरवणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहिजे आहे. ते वर्तमानपत्र इंग्रजी होते. नागपूरवरून निघत होते.एका पानाचे तेव्हाचे रेट काय कमी नव्हते. कार्यक्रमाला तिकीट होते तीन रुपये. पण त्या तीन रुपयाला तेव्हा किंमत होती. मी चक्क नकार दिला. जाहिरातीची एवढे मोठे रक्कम उभारणे मला अशक्यप्राय वाटत होते .पण तो तरुण मागेच लागला आणि मला म्हणाला सर ही जर पुरवणी मला मिळाली ना तर माझी जिल्हा प्रतिनिधी ही नियुक्ती पक्की होते. स्पर्धेमध्ये अजून एक दोन लोक आहेत .पण कवी श्रेष्ठ श्री सुरेश भटांच्या कार्यक्रमाची पुरवणी आणेल त्याला जिल्हा प्रतिनिधी त्या दैनिकाचे नियुक्त केले जाणार आहे .सर माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. मी त्याच्या डोळ्याकडे पाहिले. आमचे पितामह व कवी श्रेष्ठ सुरेश भटांचे जिवलग मित्र डॉक्टर मोतीलाल राठी यांना फोन केला आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली. ते म्हणाले तथास्तु. झाले एका पानाची इंग्रजी दैनिकाची पुरवणी त्या तरुणाला मी दिली. आज तोच तरुण स्वतःच्या पायावर उभा राहिला एवढ्याच नव्हे तर कोट्यावधी रुपये खर्च करून त्याने ग्लोबल सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल उभारले आणि अनेकांना रोजगार दिला.
असे हे नरेंद्र बोरकर हे व्यक्तिमत्व आहे ़ रोज सकाळी लवकर उठणे . विद्यापीठात फिरायला जाणे. स्वतः गाडी चालवणे .एक पाय गेला असला तरी दुसऱ्या चांगल्या पायाच्या सहकार्याने व नकली पायाच्या आधाराने ते स्वतः चार चाकी गाडी चालवतात. अमरावती मधल्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होतात. अपंग आणि दिव्यांग असलेल्या व्यक्तींनी नरेंद्रचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. ज्या तरुणाला एका पानाची पुरवणी मिळवण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागले आज तोच तरुण अनेकांना पुरवण्या देणारा झाला आहे. मदत करणारा झाला आहे .परोपकारी झाला आहे.
सर्वात महत्त्वाचे नरेंद्र बोरकर तुम्हाला भेटले तर ते एका पायाने अपंग आहे हे तुम्हाला जाणवणारच नाही. सर्वांमध्ये मिसळणारा सर्वांशी प्रेमाने बोलणारा आणि अडचणीला सार्वजनिक कामात धावून जाणारा नरेंद्र बोरकर आमचा जवळचा मित्र आहे. रोज नियमितपणे तो आमच्या अमरावती विद्यापीठाची मॉर्निंग ग्रुपच्या क्लबला येतो .आमच्याबरोबर व्यायाम करतो हसतो गातो खेळतो .कुठेही आपल्या अपंग असल्याची जाणीव व भासू देत नाही. 18 एप्रिलला वाढदिवस आम्ही अमरावती विद्यापीठाच्या श्री संत गाडगेबाबा अध्यासनाच्या परिसरामध्ये साजरा करीत आहोत. त्यासाठी आम्ही सर्वांनी वाढदिवसानिमित्त झाडे विद्यापीठाला द्यायचे ठरवले आहे. कार्यक्रमाला मा. लेडी गव्हर्नर डॉक्टर श्रीमती कमलताई गवई तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे सहकारी व अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वेसर्वा श्री जनार्दन पंत बोथे तसेच श्री संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर दिलीप काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमातून इतरांना प्रेरणा मिळावी. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन या बाबींना उजाळा मिळावा सातत्याने ह्या गोष्टी सुरू राहाव्या या उदात्त हेतूने व इतरांना प्रेरणा मिळण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे नियोजन आम्ही केलेले आहे. आमचा हा मित्र मनाने अपंग नाही .शरीराने अपंगत्व येऊ शकते पण त्याने मात केली आहे.
प्रा. नरेशचंद्र काठोळे
जिजाऊ नगर अमरावती 9890967003