माझा भाऊ…राया
मला आठवतयं तो कोरोनाचा भयंकर काळ होता.त्या दिवसात घराच्या बाहेर कुणी पडत नव्हतं.गावात जाता येत नव्हतं. म्हणून मी गळ घेऊन तळ्यावर मासे धरायला एकटाच जात होतो.मासा काही गळाला लागला नाही कधीच.पण नाद बेक्कार लागलेला होता.
एक दिवस असाच दुपारी भर उन्हात मी गळ घेऊन बाहेर पडलो.अखंड दिवस तिथं घालवत असल्यामुळे सोबत जेवण आणि पाण्याच्या दोन बाटल्या घेतल्या होत्या. जसं जसं मी तळ्याच्या दिशेने जवळ जाऊ लागलो तसं कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येऊ लागला.कुत्र्यांची काळवंड लागलेली असेल म्हणून फारसे लक्ष दिले नाही.मी बांध चढला.आणि बांधावर आलो तेव्हा पाहतो तर, एका माकडाला सात आठ कुत्र्यांनी गराडा घातला होता.ते माकड तसच बसून सगळ्या कुत्र्यांच्या अंगावर धाव घेऊ पाहत होतं.दात इचुकन अंगावर जाऊ पाहत होतं.पण त्याला जागेवरून हालता येत नव्हतं.
मी हातात दगड उचलून त्यांच्या दिशेने भिरकावला.कुत्री पळाली.पण माकड काही जागेवरून हालले नाही.भित भित त्याच्या जवळ गेलो.तरीही ते जागेवरून हालत नव्हतं.ते माझ्यावर दात इचकू लागलं.मी त्याच्या फार जवळ गेल्यावर लक्षात आलं त्याच्या दोन मांड्यांच्या मध्ये जखम झालेली होती.त्यामुळे त्याला नीट चालता बसता येत नव्हतं.मनात फार हळहळ झाली.का कुणास ठावूक पण पाठचा आपला धाकटा भाऊ असल्यासारखं वाटायला लागलं.मी फडक्यात बांधून चपात्या आणि तेल चटणी घेऊन आलो होतो.त्यावर कांदा ही होता.मी त्याच्या जवळ मांडी घालून बसलो.फडक्याची गाठ सोडली.त्यातली चपाती घेतली आणि थेट त्याच्या हातात दिली.त्यानेही ती न नाकारता घेतली.आणि खावू लागला.चार घास खाल्यानंतर त्याने त्याचा एक हात माझ्या मांडीवर ठेवला.मन गलबलून आलं.आणि अलगदपणे मी माझा एक हात त्याच्या खांद्यावर ठेवला.त्याने फार प्रेमाने माझ्याकडे पाहिलं.आणि परत मान खाली घालून चपाती खाऊ लागलं.कांदा त्याने हातात घेतला.त्याचा वास घेतला. पण कांदा त्याने खाल्ला नाही.माझी नजर सतत त्याच्या त्या जखमेवर जात होती.आणि आतल्या आत माझा हुंदका वर येऊ पाहत होता.त्याने पोटभर खाल्ल्यानंतर मी पाण्याची बाटली त्याच्या तोंडाला लावली.त्याने घटाघट पाणी पिल्यानंतर पुन्हा एकदा माझ्याकडे त्याची ती हळवी नजर वळली.त्याच्या गालावरून मी हात फिरवला.हळूहळू सरकत तो बाजूला एका दगडावर जाऊन बसला.
मी पाण्यात गळ टाकला होता.वातावरण शांत होतं.ते माकड माझ्याकडे एकटक पाहत बसलेलं होतं.मी मोबाईलवर गाणं लावलं.आणि गाणं होतं.”राया मला पावसात नेऊ नका.” भर उन्हात हे पावसाचं गाणं वाजायला लागलं.माकडाला बहुतेक गाणं आवडलं असावं.ते हळूहळू सरकत माझ्या पुन्हा जवळ आलं.आणि मोबाईल कडे पुन्हा एकटक पाहू लागलं.त्या गाण्यात राया हा शब्द आला की,माकड माझ्याकडे बघायचं आणि दात इचकायचं.माझ्या ते लक्षात आलं.आणि “ काय राया” म्हणून मी त्याच्या खांद्यावर हात टाकला. तस्स माकड मान खाली घालून लै सुंदर लाजलं.त्याचं ते गोड लाजण माझ्या काळजाच्या आरपार गेलं.तेवढ्यात गळाची काठी हलली.दोरीला झटका बसला.मी झटकन उभा राहिलो.आणि गळ वढला.पाणी खळखळ करायला लागलं. कवा नव्हं ती आज मासा गळाला लागलेला होता.लै आनंद झाला. मी माकडाला म्हणलं, “ राया लका मासा गळाला लागला.” बोलता बोलता त्याचं नामकरण कधी झाल कळलंच नाही.राया पण पाण्याकडे पाहून दात ईचुकन अंग हलवायला लागला.मी मासा बाहेर काढला.चांगला अर्धा किलोचा मासा होता.
मोकळ्या झालेल्या फडक्यात मी मासा बांधला.गळ खांद्यावर टाकला.मोबाईलवर गाणं सुरूच होतं.त्या गाण्या वरून त्या माकडाचं नाव मी राया ठेवलेलं होतं.त्याला ते आवडलं होतं.मी गाणं बंद केलं.मोबाईल खिशात टाकला.आणि त्याला म्हणलं. “ राया निघतो आता” आणि मी चालू लागलो.चार पावलं पुढं चालून आलो तर मागून माझा शर्ट रायाने वढून धरला होता.जोराने पायाने घसरत येऊन रायाने हाताने मला धरलं होतं.मी तिथून जाऊ नये या भावनेने राया माझ्याकडे हळव्या नजरेने पाहत होता.लांब उभी असलेली कुत्री त्याच्याकडे पाहत होती.राया त्यांना घाबरला होता.आणि त्याने मागून माझा शर्ट गच्च धरला होता.का कुणास ठावूक? पण माझा धाकटा भाऊ जर असला असता तर, तो ही असाच माझ्या मागे असला असता असं मनाला वाटलं.मी त्याच्या मुठीतुन माझा शर्ट सोडला.आणि मी माझ्या वडिलांना फोन केला. त्यांना सांगितलं “अण्णा सायकल घेऊन तळ्यावर या..अण्णा घाबरून म्हणाले काय झालं..?” मी फक्त इतकंच म्हणलं. “तुम्ही या पटकन काम आहे.आणि सायकल घेऊन या”
अण्णांची वाट बघत मी रायाजवळ बसून राहिलो.आम्ही एकमेकांना कुरवाळत राहिलो.बोलत राहिलो.थोड्या वेळाने अण्णा आले.त्यांना मी त्याला झालेली जखम दाखवली.माझे वडील ही फार हळहळले.आम्ही त्याला सायकलवर मागे बसवलं.अण्णांनी त्याला लहान मुलासारखे धरले.मी सायकल घेऊन चालू लागलो. चालताना मी अण्णांना सांगितलं “ याचं नाव राया आहे बरं का..? अण्णा म्हणाले,”नाव बी ठेवलं का याचं.” आण्णांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याला राया राया राया म्हणून गोंजारत राहिले..आणि मी सायकल धरून सावकाश चालू लागलो.
रायाला घेऊन आम्ही घरी आलो.आईने पाणी गरम करून दिलं.त्याची ती जखम मी कोमट पाण्याने धुतली. त्यावर अण्णांनी हळद लावली.राया शांत बसून राहिला.आणि तिथंच व्हरांड्यात झोपला.चार दिवस राया दारातून हलला नाही.रोज त्याची जखम मी धूत होतो.गरम गरम खायला.दूध प्यायला देत होतो.चार दिवसात रायाची जखम भरून आली.राया उड्या मारून खेळायला लागला.त्या काळात माणसं माणसाला शिवत नव्हती.अशा काळात राया भावासारखा माझ्या आयुष्यात आला होता.
राया पूर्ण बरा झालेला होता.आणि एक दिवस राया नजरे समोरून कुठ गायब झाला काही कळलंच नाही.राया त्याच्या जगात निघून गेला होता.त्याच्या आठवणीने मन पुन्हा भरून आलं.पण त्याने त्याच्या जमातीत सुखाने राहिलं पाहिजे तिथच त्याचं खरं जगणं आहे.अशी मनाची समजूत घालून मी घेतली.
एक महिना उलटून गेला होता.सकाळी सकाळी मी बाहेर चुलीवर पाणी तापवत बसलो होतो.आणि अचानक मागून माझं बनियन कुणीतरी ओढलं.मागे झटकन वळून बघितलं तर राया होता.माझ्याकडे पाहून दात इचकत होता.मी जोरात ओरडलो “राया आला,राया आला.” व्वा रे माझ्या पट्ट्या म्हणून त्याच्या खांद्यावर हात टाकला. घरातले सगळे बाहेर आले. पोरं अंथरुणातून उठून पळत बाहेर आली.राया सगळ्यांना भेटला. उड्या मारून दमला.आणि त्याच्या जागेवर बसला.मग गरमागरम दोन चपात्या माझ्या बायकोने बनवल्या.तिने चपातीला आज तूप लावलं.राया पोटभर जेवला.त्याची जखम झालेली जागा मी हाताने कुरवाळू लागलो.जखम कुठच नव्हती.तिथं लुसलुशीत केस आलेले होते.माझ्या मनगटावर रायाने त्याची मान घासली.माझ्याकडे पुन्हा त्याच नजरेने त्याने पाहिलं.आणि टणकन उडी मारून राया निघून गेला.
अधून मधून महिन्यातून दोन तीन वेळा राया असाच येत असतो.दारात खेळत असतो.मला मनभरून पाहत असतो.त्याच्या हक्काच्या दोन चपात्या त्या सुध्दा तूप लावलेल्या खात असतो.आणि निघून जात असतो.राया माकड असला तरीही, सख्ख्या भावासारखा वाटतो.नाती माणसाशीच जुळतात असं काहीही नसतं.हे तो सिद्ध करत असतो.
आज सकाळी सकाळी असाच खूप दिवसांनी राया आला.मन भरून आलं. पण पहिल्यासारखा आता जास्त वेळ थांबत नाही.दोन चपात्या दिल्या की, त्यातली अर्धीच खाऊन राहिलेली दीड चपाती घेऊन राया निघून जात असतो.मनाला वाटत राहतं आता त्याचं ही कुटुंब वाढलेलं असावं.त्याचाही आयुष्याचा जोडीदार त्याने निवडलेला असावा.उगाच कुणी हातातला घास सांभाळून घेऊन निघून जात नसतं.पण जाता जाता राया मला आणि माझ्या कुटुंबाला भरभरून आशिर्वाद देऊन जात असतो हे मात्र नक्की…राया मला विसरत नाही आणि मी रायाला विसरत नाही हेच आमचं भावा भावाचं लेकुरवाळे नातं…
( आज असाच प्रेमाने घेतलेला माझ्या भावाचा म्हणजे माझ्या रायाचा हा फोटो खास आपल्या स्वाधीन.)
– नितीन सुभाष चंदनशिवे.
मु.पो.कवठेमहांकाळ.
जि.सांगली.
070209 09521 ( आपली प्रतिक्रिया व्हाटसअप किंवा कॉल वर ही देऊ शकता.)
शेअर करू शकता.