
फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या मनगटावर महागडे घड्याळ.!
‘हम तो फकीर हैं…’ असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मनगटावर दिसणाऱ्या महागड्या घड्याळामुळे नवीन वाद उसळला आहे. त्यांच्या जुन्या भाषणांतील ‘फकीरी’ संदर्भातील वक्तव्ये सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत असून, त्याच दरम्यान मोदींनी घातलेल्या घड्याळाची किंमत चर्चेचा विषय ठरली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून पंतप्रधान मोदी जाहीर कार्यक्रमांमध्ये एक खास घड्याळ परिधान करताना दिसत आहेत. हे घड्याळ ‘जयपूर वॉच कंपनी’ या भारतीय ब्रँडचे असून ‘Roman Bag’ या सिरीजमधील आहे. त्याची बाजारभावातील किंमत अंदाजे 55 ते 60 हजार रुपयांपर्यंत आहे.
या घड्याळाचे खास वैशिष्ट्य म्हणजे डायलमध्ये बसवलेले 1947 सालचे एक रुपयाचे नाणे. या नाण्यावर ‘चालणारा वाघ’ कोरलेला असल्याने ते अत्यंत प्रीमियम आणि ऐतिहासिक मूल्य असलेले मानले जाते. या नाण्यामुळे घड्याळाला स्वदेशी ऐतिहासिक लुक मिळतो आणि याच कारणामुळे अनेकजण त्याला ‘कलेक्शन पीस’ म्हणतात.
मोदींच्या मनगटावरील हे घड्याळ पाहून सोशल मीडियावरून दोन भिन्न प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एक गट याला “स्वदेशी ब्रँडला दिलेले प्रोत्साहन” म्हणून पाहतो, तर दुसरा गट मोदींच्या पूर्वीच्या ‘फकीर’, ‘गरिबांसाठी लढण्याची ताकद’ या वक्तव्यांचा संदर्भ देत त्यांची टीका करतो. त्यामुळे या घड्याळाने राजकीय वादालादेखील उधाण आले आहे.
जयपूर वॉच कंपनी भारतातील प्रीमियम स्वदेशी घड्याळ ब्रँड म्हणून ओळखली जाते. पुरातन नाणी, ऐतिहासिक चिन्हे आणि हेरिटेज डिझाइन्स वापरून घड्याळे तयार करणे ही त्यांची खासियत आहे. या पार्श्वभूमीवर मोदींच्या मनगटावरील हे घड्याळ पुन्हा एकदा चर्चेत आले असून राजकारणात ‘इमेज’ आणि ‘सिंबॉलिझम’ किती महत्त्वाचे ठरतात हेही स्पष्ट झाले आहे.
● हे वाचा – हृदयविकाराबाबत पूर्वकल्पना देणारा स्टेथॅस्कोप ; अमरावतीच्या युवकाचे संशोधन
फकीर म्हणवून घेणाऱ्या मोदींच्या मनगटावर