स्त्री शिक्षणाचे प्रणेते – महात्मा फुले
_________________________
अंधश्रद्धेला कट्टर विरोध करणारे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारे, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे आद्य प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. महात्मा ज्योतिबा फुले म्हणजे एक चालते बोलते विद्यापीठ,संस्कारपीठ होते. त्यांनी भारतीय समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा समूह नष्ट करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ते नेहमी बहुजन समाजाच्या व शेतकऱ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून आपले कार्य करत होते
महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाला यशाच्या शिखरावर पोहोचविण्यात महात्मा फुलेंची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. स्त्री शिक्षणाचे मूर्तमेढ रोवणारा आद्य क्रांतिकारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा 1848 साली पुणे येथे भिडे यांच्या वाड्यात काढली. ते उत्कृष्ट मराठी लेखक, विचारवंत व समाज सुधारक होते. त्यांनी आपल्या पुरोगामी विचारांची निर्भीडपणे मांडणी केली स्वतःचे विचार आचरणात आणून समाजालाही त्याचा काही उपयोग व्हावा या दृष्टीने त्यांनी समाज सुधारण्यासाठी अतोनात प्रयत्न केले .
1873 साली महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. आणि त्याकाळी पुरोहितांकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारापासून समाजाची सुटका करण्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाचे काही नियम बनविले समाजातील तळागाळातील व्यक्तींना आपल्या हक्काची जाणीव करून दिली. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला. सत्यशोधक समाजाने पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीमध्ये मंगलाष्टके रचल्या गेली. समाजातील विषमता नष्ट करणे, तळागाळातील समाजापर्यंत हक्काचे शिक्षण पोहोचविणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. शिक्षणाशिवाय तरनोपाय नाही हे महात्मा फुलेंनी ओळखले होते. म्हणून त्यांचा स्त्री शिक्षणावर जास्त भर असायचा.शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी काही कविता रचल्या. महात्मा फुले म्हणायचे
विद्ये विनामती गेली !
मतीविना नीती गेली !
नितीविना गती गेली !!
गतीविना वित्त गेले !
वित्तविना शूद्र खचले !
इतके अनर्थ एका अविद्येने केले !!
ज्योतिरावांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन प्रथम स्त्री शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवली. सर्वप्रथम आपल्या पत्नीला त्यांनी शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले. आणि म्हणूनच सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून प्रसिद्ध झाल्या. पुढे सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षणाच्या या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिले. व स्त्री शिक्षणाची गंगा झपाट्याने वाहण्यास सुरुवात झाली महात्मा फुले यांना वाचनाची फार आवड होती. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, शिवाजी महाराजांनी केलेले कार्य वाचून प्रेरित झाले. शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे समाजातील उपेक्षितांसाठी कार्य केले. त्याचप्रमाणे बहुजन समाजाचे अज्ञान ,दारिद्र्य आणि समाजातील जातिभेद पाहून महात्मा फुले यांना अतिशय अस्वस्थ वाटत असे. सामाजिक परिस्थिती सुधारावी असा त्यांनी निश्चय केला. व बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यातील पहिली मुलींची शाळा हेच त्यांच्या कार्याचे केंद्र बनले. 1852 मध्ये त्यांनी अस्पृश्य मुलांच्या शिक्षणासाठी सुद्धा एक शाळा स्थापन केली. त्यांच्या या शाळेला सनातन्यांकडून नेहमी विरोध होत होता.पण ज्योतिराव आपल्या भूमिकेवर ठाम होते. ते म्हणायचे *कोणताही धर्म हा ईश्वराने निर्माण केला नाही आणि जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे.
मानवाने गुण्या गोविंदाने राहावे असे त्यांचे मत होते. त्याकाळी शेतकऱ्यांवर इंग्रजांकडून शेत सारा भरण्यासाठी दबाव आणला जायचा. पण ज्योतीरावांनी याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी *शेतकऱ्याचा आसूड* या आपल्या पुस्तकातून संपूर्ण शेतकऱ्याची विधारक परिस्थिती व वास्तवता समाजासमोर आणली. या पुस्तकांमध्ये त्यांनी आपला विशाल असा दृष्टिकोन मांडला. महात्मा ज्योतिबा फुले हे वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे, तत्त्वचिंतक असे व्यक्तिमत्व म्हणून जगासमोर आले. *सार्वजनिक सत्यधर्म* हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ त्यांनी समाजासमोर आणला. *दीनबंधू* नावाचे साप्ताहिक चालविले. या साप्ताहिकातूनही त्यांनी त्याकाळी असलेल्या विदारक परिस्थितीचे वर्णन व त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपायोजना आपल्या या साप्ताहिकातून समाजापुढे मांडल्या. त्यातून समाज जागृती होऊ लागली. त्यांनी आपला *गुलामगिरी* नावाचा ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीय लोकांना समर्पित केला. महात्मा ज्योतिबा फुले फक्त भारतीय समाजामध्ये नावारूपास आले नाही तर विदेशी लोकांच्या हृदयात सुद्धा त्यांनी आपले स्थान मिळविले. अशा या महान समाजसुधारकाची आज जयंती!!!! त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!!!!!
अविनाश अशोक गंजीवाले (स. शि.)
जि प प्राथमिक शाळा करजगाव पं स तिवसा जि अमरावती