Tuesday, November 4

आयुष्याची फाईल, भावनांचे व्हायरस आणि जगण्याचा ‘रिस्टार्ट’.!

आयुष्याची फाईल आणि भावनांचे व्हायरस – जीवनाचा रिस्टार्ट, प्रेरणादायी मराठी लेख – गजानन हरणे, अकोला.

डिजिटल माणसाचं भावनिक हँग होणं ,आजचा माणूस डिजिटल जगात सर्वाधिक ‘कनेक्टेड’ आहे, पण भावनिकदृष्ट्या सर्वाधिक ‘डिस्कनेक्टेड’.स्मार्टफोन हातात असला तरी, मनाचं नेटवर्क वारंवार ‘नो सिग्नल’ दाखवतं. बाहेरून तो स्मार्ट, स्टायलिश आणि ‘अपडेटेड’ दिसतो, पण आतून त्याचं मन मंदावलेलं, थकलंलेलं, हँग झालेलं असतं.

असं का?कारण आयुष्याच्या फोल्डरमध्ये नकोशा फाईल्स साचल्या आहेत. तक्रारी, कटुता, ईर्षा, अपयशाच्या आठवणी, तुटलेल्या नात्यांचे स्क्रीनशॉट्स.या सगळ्या फाईल्सचा भार मनाच्या रॅमवर पडतो आणि आत्म्याची सिस्टीम संथ होते.माणूस स्वतःचा यूजर राहिलेला नाही, तर स्वतःच्या विचारांचा बळी झालेला आहे.अशा वेळी आवश्यक असतं  “मनाचा क्लीनअप आणि जीवनाचा रिस्टार्ट!” कर्म नियतीच्या सर्व्हरवरील खरी ओळख

“कुणी बघत नाही म्हणून मनाप्रमाणे वागावं”  हा विचार मोहक आहे, पण त्यात विनाश लपलेला आहे.कारण नियतीचा सर्व्हर नेहमी ऑन असतो. ती प्रत्येक कर्माचा डेटा सेव्ह करते.त्या सर्व्हरवर कोणतंही ‘लॉगआउट’नाही.माणूस कितीही बाहेरून परिपूर्ण दिसला तरी त्याच्या कर्मांची ‘हिस्टरी’ मिटत नाही.तीच त्याचं ओळखपत्र असते.नियतीचं गणित चुकत नाही ती ना रागावते, ना माफ करते, फक्त बिल पाठवते.आणि मग आयुष्याच्या स्क्रीनवर “Update Required” असा संदेश दिसतो.तो संकेत असतो  स्वतःचा ‘सॉफ्टवेअर अपडेट’ करण्याचा!कर्म हेच खरी ओळख. बाकी सर्व काही तात्पुरती फाईल्स आहेत.शब्दांचे बाण आणि आत्मकवच कधी कुणाच्या शब्दांनी मन थरथरतं.कधी एखाद्या कटू वाक्याने आत्मा दुखावतो.

आपण म्हणतो “त्याने माझं मन तोडलं.”पण खरं पाहता, आपल्या आत्मकवचात क्रॅक पडलेला असतो.जो स्वतःबद्दल दृढ असतो, त्याला बाहेरचं कुणी तोडू शकत नाही.कुणी काय म्हणालं यापेक्षा आपण स्वतःबद्दल काय विचार करतो हेच निर्णायक असतं.स्वतःचं जीवन सजवा, त्यात प्रसन्नता जोडा.कौतुक करणारे तुमच्या प्रकाशात न्हाऊन जातील,तर जळणारे त्याच प्रकाशात सावली शोधतील.त्यांच्या तापमानाने तुमचं ऊन मोजू नका.तुमची उर्जा तुमच्याच सकारात्मकतेत आहे.मनाच्या मेमरीचा ‘क्लीनअप मोड’जेव्हा फोन स्लो होतो, तेव्हा आपण ‘कॅशे क्लिअर’ करतो,‘अनवाँटेड अ‍ॅप्स’ डिलीट करतो, गॅलरीतील नकोसे फोटो काढून टाकतो.हे सगळं करून फोन झपाट्याने चालू लागतो.पण जेव्हा मन हळूहळू जड होतं, विचार ‘हँग’ होतात, दुःखाचे पॉपअप्स वारंवार झळकतात,तेव्हा आपण काय करतो?जुन्या जखमा पुन्हा उघडतो, जुन्या आठवणी पुन्हा रिवाइंड करतो,आणि स्वतःलाच त्रास देतो.मनात साचलेल्या नकारात्मक फाईल्स अपराधभाव, ईर्षा, अपयश, नकोसे लोक, अकारण ताण

या सगळ्यांचा ‘क्लीनअप’ केला पाहिजे.जे तुम्हाला ताप देतात, त्यांना मनातून डिलीट करा.जे दुःख देतात, त्यांना ‘रिसायकल बिन’मध्ये टाका.मन रिकामं झालं की, शांतीचं अ‍ॅप पुन्हा कार्यरत होतं.आणि माणूस पुन्हा ‘रिस्टार्ट’ होतो. ‘रिफ्रेश’ म्हणजे विसरणं नाही, समजून पुढे जाणं काहीजण सांगतात  “विसरून जा, पुढे चल.”पण विसरणं तात्पुरतं असतं; पुन्हा स्मृती येतात आणि दुखावत जातात.

त्याऐवजी समजून घेणं आणि मुक्त होणं हेच खरं डिलीट करणं आहे.जसं अ‍ॅप पूर्ण अनइन्स्टॉल केलं की त्याचं काही शिलक राहत नाही,तसंच एखादं दुःख मनातून समजून घेतल्यावर त्याचं अस्तित्व संपतं.त्याच वेळी माणूस नवा होतो.त्याच्या विचारांमध्ये, चेहऱ्यावर आणि कृतीत प्रसन्नतेचा प्रकाश झळकतो.मुक्तता ही विस्मरणातून नाही, तर समजुतीतून जन्म घेते.सतत ‘अपग्रेड’ होत राहा

आज जगाच्या वेगात राहण्यासाठी तांत्रिक अपडेट्स आवश्यक आहेत.पण भावनिक, वैचारिक, आणि सामाजिक अपडेट्सही तितकेच गरजेचे आहेत.मनाची ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ जुनी झाली की विचारही बग्स निर्माण करतात.त्यातून राग, अहंकार, मत्सर आणि कटुता या एरर मेसेजेस जन्म घेतात.म्हणून मन सतत अपडेट ठेवा.

नवीन विचार डाउनलोड करा, जुन्या पूर्वग्रहांना अनइन्स्टॉल करा,सकारात्मकता आणि प्रसन्नतेचं अ‍ॅप चालू ठेवा. जो माणूस स्वतःला वेळोवेळी सुधारतो, तोच खऱ्या अर्थाने ‘लाइफचा अपडेटेड व्हर्जन’ बनतो.आयुष्य जिथे थांबतं, तिथे दुःख सुरू होतं.आणि जिथे नवं शिकणं चालू राहतं, तिथे आनंद आपोआप मिळतो.सजगतेचं अँटीव्हायरस

जगात चांगुलपणा संपलाय” असं म्हणणारे लोक स्वतःकडे पाहायला विसरले आहेत.कारण चांगुलपणाची सुरुवात बाहेरून होत नाही, ती आतून होते.माणूस सजग असेल, तर तो वाईट काळातही प्रकाश शोधतो.सजगता म्हणजे मनावर नियंत्रण.शब्दांचा वापर शस्त्रासारखा नाही, तर औषधासारखा करा.कटुतेला प्रत्युत्तर न देता शांत राहणं ही कमजोरी नाही, ती उच्च बुद्धी आहे.मनातील शांतता हीच सर्वात प्रभावी अँटीव्हायरस सिस्टीम आहे.ती नकारात्मक विचारांच्या व्हायरसपासून आपल्याला वाचवते,आणि आत्म्याच्या प्रोसेसिंग स्पीडला स्थैर्य देते.स्वतःचा तांत्रिक तज्ज्ञ बनाजेव्हा मन थकतं, तेव्हा शब्द ओले होतात.जेव्हा मन रडतं, तेव्हा आठवणींचा डेटा फोडून पडतो.पण हाच क्षण माणसाच्या अंतर्मनातील तंत्रज्ञाला जागवतो.

तो स्वतःलाच म्हणतो “Clear History. Start Fresh.”हे तीन शब्द म्हणजे आत्मोद्धाराचं सूत्र आहे.कारण कोणी दुसरं तुमचं आयुष्य रिस्टार्ट करू शकत नाही तो बटण तुमच्याच हातात आहे.स्वतःचा तांत्रिक तज्ज्ञ बना.मन थकले की ‘रिबूट’ करा, आशा संपली की ‘रिफ्रेश’ करा,

आणि जिथे गरज वाटेल तिथे ‘अपडेट’ करा.जीवनाची सिस्टीम पुन्हा चालू होईल.पुन्हा एकदा ‘Live Mode ON’ कराआजचा काळ वेगवान आहे, पण माणूस भावनिकदृष्ट्या मंदावला आहे.त्याने नात्यांना, विचारांना, भावनांना जास्त डेटा दिला आणि आत्म्याला कमी स्पेस ठेवली.म्हणून आयुष्याची मेमरी स्वच्छ करा.नको ती माणसं, नको त्या भावना, नको त्या सल सगळं डिलीट करा.पुन्हा एकदा ‘Live Mode’ ऑन करा.कारण नव्या सुरुवातीसाठी जुनं मिटवणं आवश्यक असतं.

भूतकाळाच्या व्हायरसने वर्तमानाला संक्रमित होऊ देऊ नका.जीवन सुंदर आहे, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःचं ‘सिस्टम मेंटेनन्स’ करावं लागेल. कारण तुम्हीच तुमच्या आयुष्याचे अ‍ॅडमिन आहात.आणि आयुष्य हीच सर्वात सुंदर, सर्वात मौल्यवान अ‍ॅप्लिकेशन आहे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, खुद बदलो जग बदलेगा. तुझ आहे  तुझंपाशी पण तू ते विसरलाशी. आपल्या जीवनात आपण स्वतः परिवर्तन करू शकतो दुसरा कोणीही करू शकत नाही. हे जाने जाणलं तोच जीवनात परिवर्तन करू शकतो . पुढे जाऊ शकतो. यशस्वी होऊ शकतो.

जय जगत…….!

– गजानन कुसुम ओंकार हरणे

समाजसेवक, खडकी अकोला.

📞 संवाद : ९८२२९४२६२३

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.